|| ओंकार भिडे

पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे-साचलेले पाणी, ओला रस्ता अशा परिस्थितीत दुचाकी, कार चालविताना विशेष दक्षता घेणे आवश्यक असते. योग्य सावधगिरी न घेतल्यास कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच पावसाळ्यात वाहन चालविताना काय केले पाहिजे, याचा हा आढावा..

कडक उन्हाळ्यानंतर पावसाचा शिडकावा अन् त्यानंतर येणारा मान्सून नेहमीच आल्हाददायक वातावरण निर्माण करतो. मित्र-मैत्रिणींसोबत वर्षांसहलीचा आनंद वेगळाच असतो आणि या वर्षी कुठे-कुठे जायचे, याचे बेत आखणे सुरू होते.

उजाड डोंगरमाथ्याला टेकलेले मेघ, चहूकडे पसरलेली हिरवाईची झालर अन् पावसाची संततधार. तसेच, अधून मधून डोंगरावरून ओघळणारे फेसाळ पाणी हे पावसाळ्यातील वातावरण प्रसन्न करते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून वर्षां सहलींचा आनंद घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पण, या आनंदावर कोणतेही विरजण पडू नये, यासाठी विशेषत: प्रवास करण्याआधी काही काळजी घेणे आवश्यक आहे. मान्सूनमध्ये लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी दुचाकी सर्वात असुरक्षित वाहन आहे. कारण, दुचाकी पावसाळ्यात घसरण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे दुचाकीवरून वर्षांसहलीचा बेत आखला असल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

काय तपासावे?

  • दुचाकीचा टायर गुळगुळीत झाला नाही ना वा त्यावरली ग्रिप कमी झाली नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे. अजूनही रिमच्या मोटरसायकल बाजारात आहेत. मॅग व्हीलच्या तुलनेत रिमची अलाइनमेंट लवकर जाते. त्यामुळे चाक एका विशिष्ट पद्धतीने फिरत नाही. परिणामी, बॅलन्स होत नाही. त्यामुळेच रिमची अलाइनमेंट तपासावी. तसेच, मॅग व्हीलही याला अपवाद नाही. म्हणूनच मॅग व्हीलही तपासावे आणि गरज असल्यास बॅलिन्सग लगेचच करावे. बॅलिन्सग केल्यामुळे रस्त्यावर पकड राहणे अधिक सुलभ होते.
  • पावसाळ्यात स्पार्कप्लगला पाणी लागल्याने वा आद्र्रतेमुळे वाहन सुरू होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळेच आपल्याकडे एक एक्स्ट्रा कापड ठेवावे व ते भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. याचा उपयोग स्पार्क प्लग कोरडा करण्यास होतो. तसेच, टूल किटही सोबत असावे.
  • पावसाळ्यात चिखल उडू नये यासाठी मडफ्लॅप लावून घ्यावी. मात्र, इंजिनच्या पुढील बाजूस लावण्यात येणारे प्लॅस्टिक कोटेड करोगेट बॉक्सचे आयताकृती कव्हर लावू नये. यामुळे इंजिनवर परिणाम होतो.
  • डिस्क ब्रेक असल्यास ब्रेक ऑइल लेव्हल योग्य आहे ना, हे तपासावे. कारण ऑइल लेव्हलवर ब्रेकचा परिणाम अवलंबून असतो. तसेच, पुढील आणि मागील ब्रेक व्यवस्थित लागतो ना, याचीही तपासणी करावी.
  • दुचाकी जशी घसरते तशी कारही पावसाळ्यात घसरते. पण, फारच कमी जणांना माहीत आहे. त्यामुळेच कारही योग्य वेगाने चालविणे गरजेचे आहे. पावसात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून जोरात कार न नेण्याचा मोह न झाल्यास नवल. कारण, झुर्ररकरून वेगानं कार चालविण्याची मजा नक्कीच मिळते. पण, पावसाळ्यात वेगाने कार चालविणे जिवावर बेतू शकते. कारण पावसात कारदेखील घसरते यालाच हायड्रोप्लेनिंग म्हणतात. हायड्रोप्लेनिंग म्हणजे काय?
  • हवा उन्हाळ्यात प्रसरण पावते आणि त्यामुळे पावसळ्यात टायरमधील हवेचा दाब तपासण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण, आपण अनेकवेळा पंपावर वा रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातून हवेचा दाब तपासतो. पण, प्रत्येक वाहनासाठी हवेचा दाब वेगळा असतो. त्यामुळे आपल्या वाहनासाठी हवेचा दाब किती आवश्यक आहे, हे जाणून घेऊन तेवढाच दाब टायरमध्ये आहे ना, याची तपासणी हवा भरताना स्वत: करावी. प्रत्येक कंपन्यांकडून चेन कव्हरवर पुढील व मागील चाकांत किती हवेचा दाब असला पाहिजे, याचा उल्लेख असलेले स्टिकर लावलेले असतात. तसेच, मॅन्युअलमध्येही असते.
  • नवीन दुचाकींना ऑटो हेडलॅम्पची सुविधा आहे. पण, जुन्या दुचाकींना अशी सुविधा नाही. पावसाचा जोर अधिक असल्यास वा धुके असल्यास अशा वेळी हेडलॅम्प लावण्यामुळे दृश्यमानता वाढते. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी दिवे व्यवस्थित लागत आहेत ना, हे तपासावे.