|| हृता दुर्गुले

माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातून बारावीपर्यंत सायन्स पूर्ण केले. पण त्याच वेळी अभिनय क्षेत्र खुणावू लागल्याने मी बीएमएमला प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी कॉलेजात पाऊल ठेवताना मनात धाकधूक होती. कॉलेज लाइफविषयी अनेकांकडून चांगले-वाईट किस्से ऐकायला मिळाले होते. त्यामुळे एकीकडे कॉलेजला जायची उत्सुकता मनात होती तर दुसरीकडे, शाळेतल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून एकदम मोठय़ा आणि मोकळय़ा वातावरणात वावरतानाची भीतीही होती. पण नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले आणि मग महाविद्यालयीन जीवन रंजक वाटायला लागलं. बारावीपर्यंत सायन्सला असल्यामुळे बहुतांश वेळ अभ्यास, प्रॅक्टिकल, लेक्चर यांतच जायचा. त्यामुळे कॉलेजच्या सांस्कृतिक चळवळीत माझा सहभाग नगण्य होता. पण बीएमएमला प्रवेश घेतल्यानंतर मी हिरीरिने महाराष्ट्र उत्सव आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग घेऊ लागले. अर्थात कॉलेजात असताना नाटक करता आलंच नाही.

ध्रुवी, पूर्वा आणि अद्वैत यांच्या रूपात आयुष्यभराचे सोबत मला कॉलेजमध्येच लाभले. बीएमएमच्या पहिल्या वर्षांला आमची ओळख झाली आणि मग ही मैत्री इतकी घट्ट कशी बनली हे आम्हालाही उमगलं नाही. आज प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. रोज भेटणं तर सोडा, बोलणंही होत नाही. तरीही आमचे भावनिक बंध अतूट आहेत. अद्वैत तर माझ्या कुटुंबापैकीच एक बनला आहे. ज्यावेळी मला ‘फुलपाखरू’ ही मालिका मिळाली, त्यावेळी कॉलेजात लेक्चरना बसणं शक्य होत नसे. त्या काळात ध्रुवी आणि पूर्वाने मला अभ्यासात सर्वतोपरी मदत केली.

रुईयाला असणाऱ्या विद्यार्थ्यांची खाण्यापिण्याची चंगळ असते. मीही त्यातलीच एक. कॉलेजबाहेर खाण्याचे असंख्य पर्याय होते. त्यावेळी मी सूप, जंक फूड घ्यायचे. घरातून मिळणाऱ्या पॉकेटमनीतून पैशाचं व्यवस्थापन करून तिघी मैत्रिणींमध्ये मिळून एक डिश संपवण्यातही एक वेगळीच मजा होती. पण कॉलेजच्या कट्टय़ावरचा एक अनुभव आजही माझ्या मनात भीती निर्माण करतो. एक दिवस आम्ही असेच रुईया समोरच्या मैदानाच्या कट्टय़ावर बसलो होतो. तिथे क्रिकेटचा सराव नेहमीच सुरू असतो. अचानक एक सीझन बॉल माझ्या डोक्यात येऊन आदळला. क्षणभर मी सुन्नच झाले. नंतर मागे वळून पाहिले तर ती लहान मुले होती. त्यांना काही ओरडणं शक्यच नव्हतं. पण त्या दिवसानंतर मी कॉलेजच्या कट्टय़ाला रामराम ठोकला तो कायमचाच. अर्थात कॉलेजमधला तो कट्टा आजही सर्व विद्यार्थ्यांना खुणावत असतोच.

लेक्चर बुडवून कट्टय़ावर बसणे, फिरायला जाणे, सिनेमा पाहणे, इंडस्ट्रियल व्हिजिट या सर्व गमतींना मी मुकले आहे. २०व्या वर्षीच मालिकेत संधी मिळाल्यानंतर कॉलेजमधल्या अनेक गोष्टी मला करता आल्या नाहीत. पण अर्थात अभिनय हे माझे ध्येय असल्याने या गोष्टींची कधीही खंत वाटली नाही. कॉलेजमधल्या अनेक गमतीजमती करायच्या राहून गेल्या खऱ्या. पण ‘दादा एक गूड न्यूज आहे’ आणि ‘फुलपाखरू’च्या निमित्ताने भूमिकांतून कॉलेजचं जीवन अनुभवयाला मिळालं. सध्या तरी माझ्या कामातून मी महाविद्यालयीन जीवन जगत आहे.

शब्दांकन : मितेश जोशी