घरातल्या घरात

आपल्या दिवाणखान्यातील भिंतीवर एखादं ‘लाइफसाइज’ पोस्टर किंवा पेंटिग असलं की दिवाणखाना एकदम सजून जातो. मात्र, कधी कधी या चार भिंतींपैकी एखादी भिंत रिकामी राहिली की, अवघ्या दिवाणखान्याची शोभा जाते. याचा अर्थ चारही भिंतींवर खच्चून काही ना काही टांगावं किंवा चिकटवावं, असा नव्हे. या सजावटीचा स्वस्त आणि आटोपशीर पर्याय म्हणजे आइस्क्रीम कांडय़ांचे ‘शेल्फ’.

साहित्य

आइस्क्रीम कांडय़ांचे पाकिट (बाजारात सहज उपलब्ध), फेव्हिकॉल किंवा हॉट ग्लू गन, रंग.

कृती

बाजारात तुम्हाला रंगबिरंगी आइस्क्रीम कांडय़ा ज्याला ‘पॉपसिकल स्टिक्स’ म्हणतात, त्यांचे पाकिट सहज मिळेल. या कांडय़ा घेऊन त्या षटकोनी आकारात एकमेकांवर चिकटवा. कांडीच्या एका टोकावर हॉट ग्लू लावून त्यावर दुसऱ्या कांडीचे एक टोक अशा प्रकारे सहा कांडय़ा चिकटवल्या की षटकोनी आकाराचा एक सांगाडा तयार होईल. अशा प्रकारे या कांडय़ा एकमेकांवर षटकोनी आकारात चिकटवत राहिल्यास त्यांचा एक जाडसर थर तयार होईल. तुम्हाला ‘शेल्फ’मध्ये जी वस्तू (फुलदाणी, फोटोफ्रेम) ठेवायची आहे, त्या वस्तूच्या उंची आणि वजनानुसार जाड आणि मोठा षटकोनी सांगाडा तयार करा. आवश्यक वाटल्यास त्यावर भिंतीच्या रंगसंगतीला पूरक रंग चढवा आणि त्यात वस्तू ठेवून दिवाणखान्याची शोभा वाढवा.

( सौजन्य: http://www.diyncrafts.com)