ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

गेल्या रविवारी झालेल्या भारत-बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दीपक चहरने हॅट्ट्रिक मिळवली. परंतु दीपकपूर्वीही अनेक भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक मिळवण्याची किमया साधली आहे. अशाच निवडक भारतीय हॅट्ट्रिकवीरांचा घेतलेला आढावा.

भारताचे अन्य हॅट्ट्रिकवीर

दीपक चहर, चेतन शर्मा आणि हरभजन सिंग या तिघांव्यतिरिक्त आणखी पाच म्हणजेच एकूण आठ भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत हॅट्ट्रिक मिळवली आहे. कपिल देवने १९९१च्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत ईडन गार्डन्सवर हॅट्ट्रिक मिळवली होती. तर २००६मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात इरफान पठाणने  पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक मिळवली होती. कुलदीप यादवने २०१७मध्ये ईडन गार्डन्सवरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात, तर मोहम्मद शमीने या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक मिळवण्याची किमया साधली होती. तर  जसप्रीत बुमराने ऑगस्ट २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिक मिळवली होती. एकंदर आतापर्यंत कसोटीत तीन, एकदिवसीय सामन्यांमध्ये चार आणि ट्वेन्टी-२०मध्ये एका भारतीय गोलंदाजाने हॅट्ट्रिक मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

चेतन शर्माला पहिला मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून (कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०) भारतातर्फे पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा मान वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांना जातो. १९८७च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध नागपूरला झालेल्या एकदिवसीय सामन्यात चेतन यांनी केन रुदरफोर्ड, इआन स्मिथ आणि इव्हन चॅटफिल्ड या तिघांचाही त्रिफळा उडवून हॅट्ट्रिक साजरी केली होती. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासातीलसुद्धा ही पहिलीच हॅट्ट्रिक ठरली होती. भारताने हा सामना नऊ गडी राखून आरामात जिंकला.

चहरचा दुहेरी कहर

साहजिकच हॅट्ट्रिकवीरांच्या मालिकेतील सर्वाधिक ताजे उदाहरण म्हणजे २७ वर्षीय उदयोन्मुख वेगवान गोलंदाज दीपक चहर. बांगलादेशविरुद्ध नागपूरला झालेल्या या लढतीत चहरने डावातील अनुक्रमे १८व्या षटकातील अखेरच्या आणि २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर बळी मिळवून ट्वेन्टी-२०मध्ये भारतातर्फे हॅट्ट्रिक मिळवणारा पहिला गोलंदाज ठरण्याचा मान मिळवला. शफिऊल इस्लाम, मुस्तफिजूर रेहमान आणि अमनिुल इस्लाम यांना चहरने बाद केल्यामुळे भारताने ३० धावांनी यश संपादन केले. विशेष म्हणजे हा पराक्रम केल्यानंतरही दीपक शांत बसला नाही. मंगळवारीच मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील विदर्भविरुद्धच्या सामन्यातसुद्धा त्याने डावातील १३व्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर फलंदाजांना बाद करून तीन दिवसांत चक्क दुसऱ्यांदा हॅट्ट्रिक मिळवण्याचा अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला.

हरभजनच्या फिरकीपुढे कांगारुंना गिरकी

२००१मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेली भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सर्वानाच राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या अतुलनीय खेळीमुळे आठवते. परंतु त्याच कसोटीत फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा हॅट्ट्रिक मिळवून सर्वाचे लक्ष वेधले होते. या कसोटीच्या पहिल्या डावात हरभजनने रिकी पाँटिंग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांचे बळी मिळवून कसोटी प्रकारात भारतातर्फे हॅट्ट्रिक मिळवणारा पहिला गोलंदाज ठरण्याचा विक्रम रचला. भारताने ही कसोटी १७१ धावांनी जिंकली.