|| दिशा खातू, मानसी जोशी

२०१९ हे निवडणुकांचे वर्ष आहे. आधी लोकसभा आणि पाठोपाठ सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे आतापासूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. राष्ट्रीय मतदाता दिन हा २५ जानेवारी रोजी असतो. या निमित्त तरुणाईचा काय कल आहे ते जाणून घेऊ या.

सुट्टी नव्हे, अधिकार

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीत मतदार असण्याचा मान निराळाच, एक तरुण मतदार या नात्याने, निवडणुकीचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे राहुल भिसे याने सांगितले. निवडणुकीच्या निमित्ताने मला माझ्या मताचा उपयोग करता येतो, जो या क्षेत्राचे भविष्य ठरवतो. निवडणुकांप्रति तरुणांमध्ये फारसे आकर्षण काही वाटत नाही, ते निर्माण व्हायला हवे, त्यात मतदान करण्याची शिस्त रुजायला हवी याकरिता समाजमाध्यवार नानाविध उपक्रम होतात. पण ते महाविद्यालय स्तरावरही व्हायला हवेत, असे तो म्हणाला. उमेदवारांना नाकारण्याचा अधिकारी म्हणजे नोटा या पर्यायाची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची नाही, असे तो म्हणाला. आता व्हीव्हीपीएटी हे एक योग्य आणि महत्त्वाचे पाऊल आहे, मतदारास तत्क्षणी दिलेल्या मताची पाहणी करता येते. एकूणच, मतदान दिन हा सुट्टीचा नसून, जबाबदारीचा आहे. सर्वांनी मतदान करावे, असे राहुल म्हणाला.

समाजमाध्यमांवर प्रचार

सध्याची तरुण पिढी ही जर वेगळ्या विचारांची आहे. अध्र्यापेक्षा जास्त या देशात तरुण वर्ग आहे. तरुणाईचा निवडणुकीकडे  बघण्याचा दृष्टिकोन बदलेला आहे. मी येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप उत्सुक आहे. करण या देशाचा तरुण वर्ग या देशाचे उद्याचे भविष्य घडवू शकतो हे माझे ठाम मत आहे. त्यामुळे तरुणांनी पैशांच्या मागे न जाता चांगल्या आणि कर्तव्याची जाणीव असलेल्या उमेदवाराला आपले मत द्यावे, असे वेदांत थत्तेचे याने सांगितले. निवडणुका जवळ आल्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर आरोप प्रति आरोप होतात. हे पाहणे तितकच रंजक आणि अभ्यासाचे असेल. समाजमाध्यमाववर एका नेत्याला त्याच्या एका वक्तव्यामुळे कसे ट्रोल करतात हा माझ्यासाठी आवडीचा विषय असेल, असे वेदांत म्हणाला.

मताआधी विचार

मी १८ वर्षांनंतर नियमितपणे मतदान केले आहे. मतदान ही विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. सध्याची वाढलेली महागाई घरगुती गॅस, वीज देयके, भाज्या-धान्यांचे वाढते भाव हे लक्षात घेऊन मी मतदान करणार आहे. अशावेळी जर उमेदवार योग्य वाटला नाही तर मी नक्कीच नोटाचा वापर करेन. कोणाला घाबरून, लाच घेऊन मत देऊन स्वत:चा तात्पुरता फायदा करून घेण्यापेक्षा भविष्याचा विचार करून योग्य मत द्यावे असे स्पष्ट मत श्वेता शिरवळकर हिने मांडले.

पक्षातील लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, भाषणबाजी करतात, आश्वासने देतात या सगळ्यात मात्र काम करायचे विसरून जातात. त्यामुळे विचार पूर्वक मत देणार असल्याचो श्वेता म्हणाली.

विरोधी पक्षाला मत

२०१४ मध्ये भाजप सरकारला बहुमत मिळाले. पण त्यानंतर काहींचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे विरोधकांकडेही कल झुकत आहे. भाजप सरकारचे अनेक निर्णय अभ्यासपूर्वक नसल्यामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. नोटाबंदीच्या काळात लोकांचे झालेले हाल त्यातून निष्पन्न काहीच निघाले नाही. प्रयोग करावेत, पण ते अभ्यासपूर्वक झाले तर त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील, असे राहुल गुप्ता म्हणाला. त्यामुळे मी विरोधी पक्षाला मत देणार आहे. आम्ही संकुल, वस्त्या, महाविद्यालयांजवळ नव मतदारांना अर्ज भरण्यासाठी मदत करतो, त्यांना मतांचे महत्त्व पटवून देतो. सध्या विलेपार्लेमध्ये हे कार्य सुरू आहे, असे राहुलने सांगितले.

प्रचारतंत्राला भुलू नका

निवडणुकीत प्रचारतंत्र प्रभावी मानले जाते. मतदारांना आकर्षिक करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. पण तरुण यापासून सावध आहेत. पक्षश्रेष्ठी, पक्ष प्रमुख यांचे चेहरे, विचार, प्रचार तंत्राच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आपल्या प्रभागात कोण उभे राहिले आहे त्याचे कार्य, शिक्षण पाहून मी मतदान करणार. जर उभ्या राहिलेली एक ही व्यक्ती समाधानकारक नसेल तर नोटाचा पर्याय स्वीकारणार असल्याचे प्रसाद थोरवे याने स्पष्ट म्हटले.

तुम्ही योग्य नाही..

नोटा म्हणजे मत फुकट जाणे नव्हे, तर आपले मत मांडणे आणि निवडणुकीला उभे राहिलेल्यांना सांगणे की तुम्ही योग्य नाही. निवडून येण्याचे एक तंत्र बनले आहे. नागरिकांनी जागरूकतेने हे तंत्र मोडीत काढले पाहिजे. विकसनशील कामाला महत्त्व देऊन मत दिले पाहिजे. प्रचार तंत्रात अडकल्यावर सामान्य गुंडालाही मत देतात. त्यामुळे प्रचार तंत्राला भुलले नाही पाहिजे, असे प्रसादने सांगितले.

तरुणांच्या देशा..

१. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. सर्वात जुने लोकशाही राज्य इ. स. पूर्व ४३० मधल्या प्राचीन ग्रीकचे अथेन्स हे मानले जाते. त्या काळात रोम आणि इतर संघराज्यांनीदेखील लोकशाहीचे महत्त्व जाणून त्यांनी लोकशाही राज्याची स्थापना केली होती.

२. नंतरच्या काळात मात्र हुकूमशाही, गुलामगिरीचे चित्र मोठय़ा प्रमाणात दिसून येते. याच पारतंत्र्यानंतर सर्व राष्ट्रांनी स्वीकारलेल्या लोकशाहीला आधुनिक लोकशाही असे म्हटले जाते. स्वतंत्र भारतात २५ जानेवारी १९५१ रोजी हिमाचल प्रदेशच्या चिनी तहसील कार्यालयात पहिले मतदान झाले.

३. भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन एम. बी. हनिफा यांनी बनवली आहे. भारतीय इलेक्शन कमिशनने १९८९ साली यास स्वीकृती दिली. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी वापरण्याजोगे मशिनचे रूपांतरण केले. यात आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचा मोठा वाटा होता. भारतात १९९९ पासून ईव्हीएम वापरण्यास सुरुवात झाली. मात्र २०१४ च्या निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर व्होटिंग व्हेरीफिकेशन पेपर ऑडीट ट्रेलचा वापर केला गेला होता.

४. भारतातील तरुण मतदार वाढत आहे. १८ ते २० वर्षे वयोगटातील सुमारे अडीच कोटी नव मतदारांची नोंदणी झाल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून जाहीर झाले आहे. याशिवाय गेल्या काही निवडणुकांपासून नियमित मतदान करणारे तरुणही आहेत. तरुणांकडे समाजमाध्यमांसारखे प्रभावी हत्यार आहे. तरुण हा विचारशील आहे, त्यांना सामाजिक भान आहे, त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी निवडणुकीनिमित्त विचारांचे विविध कंगोरे उलगडून दाखवले. राजकारणाबद्दलची अनास्था, परिवर्तनाचा आशावाद, आपली जबाबदारी यावर ते भरभरून बोलले.