29 March 2020

News Flash

घरचा आयुर्वेद : अजीर्ण

विष्टबद्धाजीर्ण- पोट फुगणे (वायू धरणे), मलावरोध, अंग दुखणे अशी लक्षणे यात दिसतात.

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक  ayurvijay7@gmail.com

अजीर्ण किंवा अपचन हा वरवर वाटणारा साधा वाटणारा आजार असला तरी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले तर तो अधिक वाढून त्रासदायक ठरू शकतो. मुख्यत: शरीरप्रकृती आणि खाण्यापिण्याच्या विविध सवयी या दोन कारणांमुळे निर्माण होणारा हा त्रास होत असल्याच्या तक्रारी बहुतांश लोक करत असतात. सणासुदीच्या निमित्ताने होणारी खाण्यापिण्यातील रेलचेल तसेच एरव्हीच्याही रोजच्या काही घातक सवयी अपचनाचा त्रास निर्माण करतात. आयुर्वेदशास्त्रात या विकारांची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचारांची दिशा यांचे विस्तृत वर्णन केले आहे.

मुळात अपचन का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. अपचन होण्याची अनेक कारणे आहेत. एकदा जेवण केल्यावर किंवा काही खाल्लय़ावर ते पचण्यापूर्वी दुसरे काहीतरी खाणे, हे या अपचनाचे एक महत्त्वाचे कारण होय. दोन खाण्यांमध्ये किमान अडीच ते तीन तासांचे अंतर असले पाहिजे, असे आयुर्वेद सांगतो. परंतु त्यापेक्षा कमी अंतर या खाण्यांमध्ये असल्यास पूर्वीचे अन्नही नीट पचत नाही आणि पुन्हा नवीन अन्नाचा ताण पचनसंस्थेवर पडतो. पचायला जड असलेले अन्न सतत आहारात असणे हेसुद्धा या अपचनाचे मोठे कारण ठरू शकते. उदा. मांसाहार, बटाटे, उसळी यासारखे पदार्थ नेहमी खाण्यात असले तर अपचनाचा त्रास हमखास होतो. अतिशय पाणी पिणे हेदेखील अपचनाचे एक प्रमुख कारण आयुर्वेदाने सांगितलेले आहे. अनेकांना पाणी अधिक प्रमाणात पिण्याची उगाचच सवय असते. विशेषत: थंड पाणी हे प्रमाणापेक्षा अधिक घेतल्यास आपला अग्नी मंद करते (पचनशक्ती कमी होते.) नेहमी खाण्यात नसलेला किंवा शरीराला सहन न होणारा एखादा पदार्थ खाण्यात-पिण्यात आला तरी अपचनाचा त्रास होऊ  शकतो. एकाग्र चित्ताने जेवण न करणे हा घटकसुद्धा अपचनाला कारण ठरू शकतो.

जेवण करताना टी.व्ही. बघण्याची सवय अनेकांच्या बाबतीत अजीर्ण निर्माण करते, असे अनेक रुग्णांच्या एकूण सवयींचा अभ्यास केला असता दिसून येत आहे. तात्पर्य असे की, जेवताना आपले मन हे जेवणाकडेच असले पाहिजे. त्यावेळेस इतर गोष्टींकडे (म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे टी.व्ही. किवा पेपर, पुस्तक वाचून) रममाण होऊ  नये. कारण तसे केल्यास पचनाच्या विकृती संभवतात. पचनाच्या विकृती निर्माण होण्यामध्ये काही मानसिक कारणेही भूमिका बजावतात, असे आयुर्वेदीय ग्रंथकारांनी नमूद केलेले आहे. त्यामध्ये क्रोध किंवा राग या घटकाचा जवळचा संबंध आहे. म्हणून जेवण हे शांत चित्ताने करावे अन्यथा अन्न अंगी लागत नाही. या विविध कारणांनी निर्माण होणाऱ्या अजीर्ण किंवा अपचनाच्या लक्षणांनुसार विविध प्रकार आयुर्वेदाने वर्णिलेले आहेत. त्यामध्ये आमाजीर्ण, विष्टब्धाजीर्ण, विद्जाग्धर्ण असे मुख्य प्रकार आहेत. हे मुख्य प्रकार आपल्या शरीरात असलेल्या वात, पित्त, कफ या दोष घटकांच्या विकृतीनुसार पडलेले आहेत. या सर्व प्रकारांची लक्षणे वेगवेगळी असतात आणि त्यानुसार त्यांची चिकित्सा ठरवावी लागते. हा मुद्दा येथे जाणीवपूर्वक मांडण्याचे कारण असे की, अपचनाचा त्रास होतो म्हणून एक विशिष्ट औषध अनेकांच्या खाण्यामध्ये असते. पण प्रत्यक्षात मात्र अजीर्णाच्या (अपचनाच्या) लक्षणांनुसार चिकित्सा करावी लागते. आणि हे आयुर्वेदीय चिकित्सेचे एक वैशिष्ट आहे.

या प्रत्येक प्रकारात लक्षणे खालीलप्रमाणे दिसतात.

* विदग्धाजीर्ण – चक्कर येणे, तहान लागणे, दाह होणे, अधिक घाम येणे, आंबट ढेकर येणे ही लक्षणे यात दिसतात. यात पित्तदोषाचे अधिक्य असते.

*  अमाजीर्ण- यामध्ये मळमळ होणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंडाला चव नसणे, पोट जड होणे अशी लक्षणे दिसतात. यात कफदोषाचे अधिक्य असते.

*  विष्टबद्धाजीर्ण- पोट फुगणे (वायू धरणे), मलावरोध, अंग दुखणे अशी लक्षणे यात दिसतात. यात वातदोषाचे अधिक्य असते.

* चिकित्सा : या वरील प्रकारानुसार वेगवेगळी चिकित्साही द्यावी लागते.

उदा. आमाजीर्णात आमपाचकवटीचा उपयोग होतो. विदग्धाजीर्णात शंखवटीचा उपयोग होतो तर विष्टबद्धाजीर्णात गंधर्वहरितकीसारख्या काही औषधांचा उपयोग होतो. अर्थात ही औषधे वैद्यच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2019 3:48 am

Web Title: indigestion treatment symptoms causes zws 70
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : मूगडाळ भजी
2 योगस्नेह : पूर्वोत्तनासन
3 रेनोची नवी डस्टर
Just Now!
X