22 November 2019

News Flash

सुरक्षित रक्तदानासाठी..

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा रक्तदान जनजागृतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे

नुकताच जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने रक्तदान कोणी करावे, कोणी करू नये, रक्तदान करताना काय खबरदारी घ्यावी, रुग्णाला सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचे रक्त मिळावे यासाठी काय करावे याबाबतची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात आणि पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.

रक्तदानाची गरज आणि वस्तुस्थिती

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात सांगतात, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. ‘सर्वाना सुरक्षित रक्त’ ही यंदाच्या जागतिक रक्तदाता दिवसाची संकल्पना आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तसंकलनासंबंधी माहिती देण्यात आली आहे. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख एवढी आहे. त्याच्या एक टक्का म्हणजे ११ लाख २३ हजार युनिट रक्तसंकलन राज्याला स्वयंपूर्ण बनवते, असे मानल्यास २०१८ या वर्षी तब्बल १६ लाख ५६ हजार युनिट रक्त संकलित झाले आहे. हे चित्र समाधानकारक आहे, मात्र ते तसेच कायम राहण्यासाठी स्वयंप्रेरणेतून रक्तदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत राहणे महत्त्वाचे आहे. रुग्णाला गरज असेल तेव्हा रक्तदान होणे, एप्रिल, मे, जून या काळात असलेल्या रक्तटंचाईच्या काळात तसेच राज्यात सर्व ठिकाणी रक्ताची गरज समान पूर्ण होईल एवढय़ा प्रमाणात रक्तदान व्हावे यासाठी पुरेशी जनजागृती होणे आवश्यक आहे.

सुरक्षित रक्त आणि नॅट तपासणी

‘नाको’च्या नव्या अहवालानुसार, दूषित रक्त चढवल्याने २०१८-१९ या एका वर्षांत भारतात सुमारे १३०० व्यक्तींना एचआयव्ही संसर्गाची लागण झाली असून महाराष्ट्रात ही संख्या १६९ आहे. दूषित रक्तातून होणारे संसर्ग टाळण्यासाठी, तसेच प्रत्येक रुग्णाला सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रक्त तपासणीच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. निरोगी व्यक्तीला दूषित रक्त दिले गेल्यास होणाऱ्या संसर्गावर उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा ताण आरोग्य यंत्रणांवर येतो. म्हणून प्रत्येक गरजू रुग्णाला अधिकाधिक सुरक्षित आणि निरोगी रक्त मिळावे यासाठी नॅट तपासणी हा पर्याय अवलंबणे शक्य आहे. महाराष्ट्रातील रक्तदात्यांमध्ये एचआयव्ही आणि एचबीव्ही संसर्ग आढळण्याचे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा अधिक आहे. नॅट तपासणीमुळे प्रत्येक वेळी रक्तदान करणाऱ्या दात्याच्या रक्ताची तपासणी होणार असून हे रक्त एचआयव्ही, हिपेटायटिस किंवा इतर संसर्गाने दूषित झालेले नाही याची खात्री करता येणार आहे.

रक्तदात्याने आपली सुरक्षा कशी पाहावी?

राज्यात सध्याच्या घडीला अस्तित्वात असलेल्या सर्व ब्लडबँक या नोंदणीकृत आहेत. त्यामुळे रक्तदान करणे संपूर्ण सुरक्षित आहे. बदलत्या काळाबरोबर रक्तदानामध्ये नवीन ट्रेंड येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन करणाऱ्या फिरत्या व्हॅन हा नवीन ट्रेंड दिसून येतो. रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य अथवा राष्ट्रीय रक्त संकलन परिषदेची मान्यता घेतलेल्या अशा अनेक व्हॅन राज्यातील शहरी भागांमध्ये दिसतात. तेथे रक्तदान करणे संपूर्ण सुरक्षित आहे. कोठेही रक्तदान करताना ब्लड बँकेकडे एमबीबीएस डॉक्टर, नर्स आणि तंत्रज्ञ आहेत याची खात्री करावी. प्राथमिक स्वच्छता पाळली जाते की नाही हे पाहावे.

महिला आणि रक्तदान

रक्तदान करणाऱ्या दात्यांबद्दल बोलताना सहसा महिलांबद्दल स्वतंत्रपणे बोलले जात नाही, मात्र त्यांचे रक्तदानाचे प्रमाणही समाधानकारक आहे. महिलांनी मासिक पाळीच्या काळात रक्तदान करावे की करू नये याबाबत समज-गैरसमज आहेत, मात्र नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार महिलांनी प्रत्यक्ष मासिक पाळीचे दिवस सोडल्यास रक्तदान करण्यास हरकत नाही. दर चार महिन्यांनी महिलांनी रक्तदान करावे. खरे तर मासिक पाळीच्या काळात रक्तदान करण्याने काही दुष्परिणाम होतात असे सिद्ध झालेले नाही, मात्र भारतातील महिलांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून त्या कोळात रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो.

समाजमाध्यमे आणि रक्तदान चळवळ

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा रक्तदान जनजागृतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. रक्तपेढय़ांकडून त्याचा प्रभावी वापर होतो. प्रत्येक रक्तगटाच्या रक्तदात्यांचे गट सोशल मीडियावर कार्यरत असून रक्ताची गरज, तसेच इतर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी त्याचा वापर उपयुक्त ठरतो.

हे आजार असतील तर..

मधुमेह, हायपरटेन्शन आणि थायरॉइड असल्यास रक्तदान करू नये असा सल्ला जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिला जात असे. मात्र नवीन माहितीनुसार या आजारांवर औषधोपचार घेऊन नियंत्रण मिळवलेले नागरिक रक्तदान करू शकतात. मधुमेह, थायरॉइड आणि हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांनी रक्तदान करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ते योग्य ठरेल.

रक्तदान कोणी करावे?

रक्तदान कोणी करावे याबाबत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने नुकत्याच नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. अठरा ते पासष्ट या वयोगटातील निरोगी महिला आणि पुरुष हे रक्तदान करण्यासाठी योग्य असतात. ४५ किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या व्यक्ती तीन महिन्यांतून एकदा ३५० मिली रक्त देऊ शकतात. ज्यांचे वजन ५५ किलोपेक्षा जास्त आहे अशा निरोगी व्यक्तींनी तीन महिन्यांतून एकदा ४५० मिली रक्तदान करणे संपूर्ण सुरक्षित आहे. ४५० मिली रक्तदान केल्यामुळे रुग्णाला कमीतकमी रक्तसंक्रमणातून अधिकाधिक रक्त मिळू शकेल, त्यातून त्याच्या जिवाला असलेला धोका टळेल हे रक्तदात्याने लक्षात घ्यावे. वयाच्या साठीपूर्वी ज्यांनी रक्तदान केले आहे, त्यांनीच साठीनंतर रक्तदान करणे सुरू ठेवावे.

शब्दांकन : भक्ती बिसुरे

First Published on June 18, 2019 3:04 am

Web Title: information about safe blood donation
Just Now!
X