डॉ. प्रमोद त्रिपाठी

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग कायमच करत असतो. या प्रयोगांमध्ये आहार आणि व्यायामाचा प्रामुख्याने समावेश असतो. परंतु ताणतणाव, झोप या गोष्टींचा विचार फार कमी वेळा केला जातो. अलीकडे निद्रानाश या आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे ठळकपणे निदर्शनास येते.

झोप म्हणजे काय?

शरीराच्या अनेक क्रियांप्रमाणेच झोप हीदेखील एक क्रिया आहे. या अवस्थेमध्ये बाह्य़जाणिवा कमी होतात. ज्ञानेंद्रियांकडून आलेले संकेत मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. झोपेमध्ये जागृतावस्थेमधील शरीराची प्रतिक्रिया कमी होते. थोडक्यात झोपेमध्ये तुमचे शरीर दुरुस्ती (रिपेअर)चे काम करते.झोपेची विभागणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली जाते. त्यात एक असा टप्पाही असतो ज्यात आपण खूप गाढ झोपतो.

एकदा झोप आली की झोपेच्या अवस्थेशी संबंधित हार्मोन्स स्रवले जातात. उदाहरणार्थ, झोपेच्या खोल टप्प्यात ग्रोथ हार्मोन्स (इन्सुलिन) आणि प्रोलॅक्टिन स्रवले जातात.  कॉर्टिसॉल (तणावाचा हॉर्मोन्स) सकाळी जास्त प्रमाणात असते आणि संध्याकाळी कमी प्रमाणात असते. सामान्यत: झोपेमध्ये लेप्टिन हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते व ते मेंदूला शरीरात भरपूर ऊर्जा आहे आणि काही खाण्याची गरज नाही असे संकेत देते. या उलट ग्रेलिन हॉर्मोन्स शरीराला भुकेची जाणीव करून देण्यासाठी कारणीभूत असते. झोप पुरेशी न घेतल्यामुळे लेप्टिन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि ग्रेलिनचे प्रमाण वाढते व त्यामुळे आवश्यकतेपेक्षाही अधिक खाल्ले जाते. गरज नसताना जास्त खाल्लय़ामुळे लठ्ठपणा किंवा अपचनाचा त्रास वाढण्याचा संभव असतो. अपुरी झोप झाल्याने हॉर्मोन्सचे संतुलन बिघडू शकते व त्याचा एक परिणाम मधुमेह देखील असू शकतो.

जगभरात झोपेवर झालेल्या संशोधनानुसार, झोप पुरेशी न घेतल्यामुळे हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) इत्यादींचा धोका निर्माण होऊ  शकतो. झोप आणि मेंदूच्या कार्यात जवळचं नातं आहे हे देखील आता सिद्ध झालं आहे. पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीला वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी असतो, असेही काही संशोधनातून मांडले आहे.

निद्रानाश हा मानसिक असंतुलनाचा पहिला टप्पा असू शकतो.  मानसिक असंतुलनामुळे अति खाणे, लठ्ठपणा, मधुमेहाची बाधा होण्याचा संभव अधिक असतो. झोपेच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे हे जितके खरे आहे तितकेच अधिकाधिक लोक आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात आहेत हेही खरे आहे.

किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. लहान मुलांसाठी हेच प्रमाण ९ तासांचे असते. पण यापेक्षा कमी झोप असेल तर त्यामागे मधुमेह हे एक कारण असू शकते.

चांगली झोप लागण्यासाठी हे करून पाहा –

  • सध्या मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या इलेक्ट्रॉनिक पडद्यांचा झोपेवर खूप परिणाम होतो. यामधून येणारा प्रकाश मेंदूला अजूनही दिवस आहे असा संकेत देतो. त्यामुळेही मग निद्रानाशाचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. झोपेच्या काही वेळे आधीपासून यांचा वापर टाळावा.
  • चांगल्या झोपेसाठी नियमित चिंतन किंवा ध्यानधारणा देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे मानसिक शांतता मिळते, विचारात स्पष्टता येते, ज्यामुळे झोप येण्यासाठी मदत होते.
  • रात्रीचे जेवण कमी करावे किंवा आहार थोडा हलका असावा.
  • सायंकाळी ६ नंतर पाणी कमी प्यावे किंवा तहान भागेल एवढेच प्यावे. जेणे करून त्याचा फायदा रात्रीच्या झोपेत होईल. वारंवार लघवीला जाण्याची गरज भासणार नाही आणि झोपमोड होण्याची शक्यता कमी होते.
  • पुरेशी झोप केवळ शरीराच्याच नव्हे तर मनाच्या स्वास्थ्यासाठीही गरजेची आहे. त्यामुळे झोपेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.