मयूर मोरे, माहिती तंत्रज्ञान अभियंता

मी मूळचा सातारा जिल्ह्य़ातील वाई तालुक्यातील एका छोटय़ाशा खेडेगावातला. पहिली ते सहावी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर सातवी ते दहावीसाठी शारदाश्रम आश्रमशाळेत गेलो. तेथून नवीन प्रवासाला सुरुवात झाली. एरव्ही प्रत्येक गोष्टीसाठी आईवडिलांवर अवलंबून असणारा मी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकलो. अभ्यासाला बस म्हणून कोणी सांगणारं नव्हतं. त्यामुळे आपोआपच अभ्यासाचं महत्त्व पटू लागलं. आजारी पडलो तर बघणारं कोणी नव्हतं त्यामुळे व्यायाम करून स्वत:ची काळजी घेऊ  लागलो. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊ लागलो. भरपूर वाचनामध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं.

दहावीला सर्वोत्तम गुण मिळाल्यानंतर खूप काही करण्याची क्षमता आहे. आत्मविश्वस वाढला आणि जबाबदारीही कळली. पुढे कोल्हापूर येथील महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षणानिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागांत फिरत असल्याने नवनवीन माणसं भेटत गेली. विचारांची देवाणघेवाण झाली. नवनवीन शोध आपणही लावू शकतो या विचाराचा शोध लागला. लहानपणापासून घरात मिळालेले संस्कार वेगळे होते आणि आता समाज माझ्यावर करत असलेले संस्कार वेगळे होते. पूर्वी मी मुलींशी फार बोलायचो नाही. मात्र हळूहळू हे सवयीचं झालं. कोणत्याही गोष्टीकडे तटस्थ नजरेने पाहायला शिकलो. पुरोगामी विचारांशी ओळख झाली. माझ्यातल्या सुप्त गुणांची ओळख झाली.

याच काळात भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, चाणक्यनीती, जीवनचरित्रे आणि अनेक कादंबऱ्या वाचनात आल्या. यामुळे जीवनाविषयीचा दृष्टिकोन बदलला. पुढे भारतीय छात्र संसदेत पुणे आणि मुंबई विद्यापीठाचे युवा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. गेल्या महिन्यात इंडोनेशिया येथे ‘एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या सर्व मंचावर वावारत असताना जगभरातल्या समवयीन व्यक्तींशी संबंध आला. त्यातून जगाच्या विकासात आपण कसे योगदान देऊ  शकतो या दृष्टीने अधिक व्यापक विचार करायला शिकलो.

आपल्यातील सुप्त गुणांना जर वाव दिला तर आपण आपली वेगळी ओळख जगात निर्माण करू शकतो  जिद्द, चिकाटी आणि न थकता परिश्रम केले तर आपण नक्कीच खूप मोठय़ा यशोशिखरावर पोचू शकतो. कामामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर जर मात केली तर आपण भीतिमुक्त होतो आणि अशक्य वाटणारम्य़ा गोष्टी सहज शक्य होऊन जातात. वर्तमानामध्ये घेतले जाणारे निर्णयच आपले भविष्य घडवतात.