भारतीय शास्त्रीय संगीत ही कलाच नव्हे, तर भारताला मिळालेले एक वरदान आहे. रागांचे विविध प्रकार असून सूर, थाट, जाती, गाण्याची वेळ, पकड, बंदिश आणि तिचा ताल या गोष्टी लक्षात घेऊन शास्त्रीय संगीताची आराधना करण्यात येते. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्ये ही त्या त्या शास्त्रीय संगीतातील विशेष उपप्रकारांमधून ओळखली जातात. गायन परंपरेत अलौकिक ठेवा असणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना हजर राहून ते संगीत ऐकणे हे पूर्वी एक प्रकारे श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. या मैफलींना महाराष्ट्रातील साहित्यिकांसह राजकारण्यांपासून ते इतर निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. मात्र जसजसा काळ पुढे सरकू लागला, माहिती तंत्रज्ञानसह बाजारपेठांमध्ये बदल होऊ लागले, तसतसे भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफली कमी होऊ लागल्या. मात्र सध्या शास्त्रीय संगीताच्या मैफली, त्याचे चाहते, शिकणाऱ्यांचा ओढा हा दिवसेंदिवस अधिक वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते. खासकरून आजच्या रॅप, जॅझ आणि रॉक यासारख्या पाश्चात्त्य संगीतासोबतच आजचा तरुण शास्त्रीय संगीताकडे वळत आहे. केवळ गानसेन म्हणून नाही तर शास्त्रीय संगीतासाठी उत्तम कानसेन होण्याचादेखील आजचा तरुण प्रयत्न करत आहे, अशाच शास्त्रीय संगीत शिकण्यासोबत ऐकण्यासही प्राधान्य देणाऱ्या तरुणाईशी साधलेला हा संवाद..

वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतकारांकडून सध्या खास तरुणांसाठी शास्त्रीय संगीताच्या शिकवणी वर्गाचे आयोजन केले जात आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी शास्त्रीय संगीताच्या स्पर्धामध्ये आवर्जून सहभागी होत आहेत. फेसबूक, युटय़ूब, इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांद्वारे तरुण पिढी शास्त्रीय संगीतावर व्यक्त होत आहे. शास्त्रीय संगीत गाणारे तरुण त्यांच्या गातानाच्या व्हिडीओ समाजमाध्यमावर आवर्जून प्रसारित करत आहेत. या संगीताचा तरुण श्रोता रसिक वर्ग आपल्या आवडत्या शास्त्रीय संगीत गायकाचे फोटो, त्याचे व्हिडीओ हे त्यांच्या व्हॉटस् अ‍ॅप, तसेच इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवत आहे.

अथांग सुरांचा शोध

शास्त्रीय संगीत या कलेचा अभ्यास समुद्राइतका खोलवर आहे. संगीतातील प्रत्येक रागाचा, तालाचा सखोल अभ्यास केल्यानेच विशारद ही पदवी पटकावता येते. ही मेहनत नवी पिढीदेखील घेत असल्याने भारताच्या या पारंपरिक कलेचा सुयोग्य उद्धार होत असल्याचे मत जितेंद्र तुपे यांनी व्यक्त केले. तरुण वर्गातील पालकदेखील शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देत असल्याने तरुणांमध्ये याविषयी वेगळा हुरूप आहे. भारतीय शास्त्रीय संगीत कला फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता नव्या पिढीने जगभरात प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रीय संगीत ही कला प्रत्येक संगीतप्रेमींना आपलीशी वाटत असल्याचे जितेंद्र तुपे यांनी व्यक्त केले.

-जीतेंद्र तुपे, शास्त्रीय संगीत विशारद, ठाणे

चिंतनास मदत

जलदगतीने पुढे सरकणाऱ्या या संगीताच्या दुनियेत वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आपल्याला ऐकायला मिळते त्यात वेगवेगळे रॅप, जॅझ, सुफी असे अनेक प्रकार आपण ऐकतो. एक संगीतप्रेमी म्हणून आपण सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला हवे आणि ते गायलादेखील हवे. एकीकडे पाश्चात्त्य संगीत ऐकण्यास प्राधान्य देत असताना दुसरीकडे मला शास्त्रीय संगीत ऐकणेही तितकेच जवळचे आणि निखळ आनंद देणारे वाटते. तरुण पिढीवर शास्त्रीय संगीत जपण्याची जबाबदारी आहे. शास्त्रीय संगीत बरेच काही शिकवते. शास्त्रीय संगीतामुळे चिंतन होण्यास मदत होते.

-क्षितिजा घाणेकर, बदलापूर

कायमच दर्जेदार

शास्त्रीय संगीत ऐकून मन:शांती लाभते. हे संगीत एक प्रकारचे चिंतन आहे आणि ते शिकण्यासाठी ध्यास हवा. आपल्या भारतभूमीची संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य मानून प्रत्येक तरुणाने ते आत्मसात करायला हवे. शास्त्रीय संगीतही संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून या संगीतातील लयबद्धता आणि पावित्र्य ही सध्याच्या नव्या रॅप आणि रॉक संगीतापेक्षा कायमच दर्जात्मक ठरलेली आहे. शास्त्रीय संगीत हे जगभरात नावाजलेले असून त्या ठिकाणी शास्त्रीय संगीत शिकवले जाते, ते गायले जाते आणि आत्मसातही केले जाते, भारताच्या नव्या पिढीने ही परंपरागत शास्त्रीय संगीताची कला जोपासणे खूप गरजेचे आहे.

-मृणाल विचारे, ठाणे

तरुण पिढीचे आलाप

पिढीच्या विचारसरणीनुसार गाणी आणि संगीत प्रकाराची आवडही बदलत जात होती. परंतु अचानक कायापालट होऊन रॅप संगीताची हवा असणाऱ्या भारतातील तरुण पिढीचा कल पुन्हा पारंपरिक शास्त्रीय संगीत प्रकाराकडे वळल्याचे दिसून येते. आज विविध महाविद्यालयांमध्ये मोठे महोत्सव साजरे केले जात असताना यामध्ये शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेला किंबहुना त्यासंबंधित कार्यक्रमाला आवर्जून प्राधान्य दिले जाते. तरुण पिढी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाकडे आकर्षित होऊन त्याचा संपूर्ण अभ्यास करून ‘विशारद’ ही पदवी मिळवत आहे. यावेळी कित्येक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तरुण पिढी रागातील आलाप आणि तान सादर करताना आढळून येत आहे. आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवा जतन करत आहे.

-भाग्यश्री शिवदे, गोवंडी

निव्वळ ऐकणंही सुंदर

शास्त्रीय संगीत आवर्जून शिकायला हवे अशी कला आहे. अनेकदा शास्त्रीय संगीतातील सूर, ताल, राग याचा अभ्यास नसेल तरी शास्त्रीय संगीत ऐकून श्रोता मंत्रमुग्ध होतो. कानाला सुमधुर शास्त्रीय संगीत ऐकणे हा छंद आहे. पाश्चिमात्य रॅप संगीतासोबतच शास्त्रीय संगीत या परंपरागत कलेची आवड प्रत्येक भारतीयाला असावी आणि ती आज अनेकांमध्ये असल्याचेही निदर्शनास येते. भारताची नवी पिढी या नात्याने शास्त्रीय संगीतासह सर्व पारंपरिक कलांना जोपासून त्यांचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे कर्तव्य आहे. सध्या पाश्चिमात्य संगीतासोबतच शास्त्रीय संगीतांच्या मैफलींचेही प्रमाण वाढले आहे.

-कुलदीप पथरावे, ठाणे

अनमोल ठेवा

संगीतात कितीही नवीन प्रकार आले, तरी भारतीय शास्त्रीय संगीताची छाप कायम प्रत्येक संगीत रसिकाच्या मनावर आहे. शास्त्रीय संगीत सादर करण्याच्या तुलनेत ते ऐकून श्रोता जास्त तृप्त होत असतो. भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी पुढील पिढीसाठी ठेवलेल्या अनेक अनमोल ठेव्यातील शास्त्रीय संगीत हा एक ठेवा आहे. शास्त्रीय संगीत ही कला भारताचा अभिमान असून ती कला तरुण पिढीने जपणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीसोबतच भारतीय परंपरेला विकसित करणे खूप महत्त्वाचे ठरत असल्याने शास्त्रीय संगीताला पुढे आणण्यासाठी आज तरुण पिढी प्रयत्न करत आहे.

-भाग्यश्री भट, कल्याण