|| प्रा. योगेश अशोक हांडगे

प्रत्येक मोबाइल हँडसेटची विशिष्ट ओळख ठेवण्यासाठी ‘आयएमईआय’ क्रमांक त्याला दिला जातो. ‘इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेटिंटी’ अर्थात ‘आयएमईआय’ क्रमांक केवळ मोबाइलच नव्हे तर मोबाइल वापरकर्त्यांची ओळख जाणून घेण्यासाठी महत्त्वाचा असतो. नवीन मोबाइल खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम ‘*#06#’ डायल करून तुम्ही तुमच्या मोबाइलचा १५ अंकी ‘आयएमईआय’ क्रमांक जाणून घेऊ शकता. या क्रमांकाच्या मदतीने केवळ वापरकर्त्यांच्या मोबाइलचा शोध घेणेच शक्य होत नाही तर, त्याआधारे वापरकर्त्यांचा माग काढणेही शक्य होते. त्यामुळे सध्याच्या काळात तपासयंत्रणांसाठीही ‘आयएमईआय’ क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे.

हरवलेल्या मोबाइलचा शोध

हरवलेल्या वा चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी आपल्याला या मोबाइलचा ‘आयएमईआय’ क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. तो माहीत असल्यास तुम्ही तुमचा हरवलेला मोबाइल सहज शोधू शकता. विविध संकेतस्थळांवर अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असून त्याआधारे हरवलेल्या मोबाइलचे नेमके ठिकाण (लोकेशन) माहीत करून घेता येते.

मोबाइल चोरीबाबत चोरीची फिर्याद घेतल्यानंतर ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारे पोलिस तपास करतात. हा क्रमांक सध्या कोणत्या कंपनीच्या ‘सीम कार्ड’ वर वापरला जातो याचाच शोध घेतला जातो. मोबाइल वापरणारम्य़ाकडून कॉल केल्यानंतर तो कॉल संबंधित सेवा पुरवठादार कंपनीकडे नोंदवला जातो. या नोंदणीत मोबाइलचा आयएमईआय क्रमांक दिसतो. मोबाइल क्रमांक त्यातील सीमकार्ड बदलून नवा घेता येतो. मात्र आयएमईआय क्रमांक सहजासहजी बदलता येत नाही. त्यावरून चोरी गेलेल्या मोबाइलचा थांगपत्ता काढता येतो.

 ‘आयएमईआय’शी छेडछाड

‘आयएमईआय’ क्रमांकामुळे चोरीला गेलेला मोबाइलही लगेच ओळखता येत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत ‘आयएमईआय’ क्रमांकाचे क्लोनिंग करण्याच्या घटना वाढत आहे. विशेषत: चिनी मोबाइल कंपन्यांच्या मोबाइलमध्ये असा प्रकार सर्रासपणे होत असल्याचे आढळून आले होते. ही बाब केवळ वापरकर्त्यांसाठीच नव्हे तर, राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकत असल्याने मध्यंतरी अशा हँडसेटवर बंदीही घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही असे प्रकार सुरूच राहिल्याने दूरसंचार विभागाने ‘आयएमईआय’ क्रमांकाशी छेडछाड करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरवला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांचा कारावास आणि आर्थिक दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

नवीन नियम काय?

केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधिसूचनेनुसार ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रुल्स, २०१७’  हा नवा नियम सरकारने तयार केला आहे. त्यानुसार हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कोणत्याही मोबाइलच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमानुसार आयएमईआय क्रमांकात फेरफार करणाऱ्यास तसेच असा मोबाइल वापरणाऱ्यास आता शिक्षा होणार आहे. याशिवाय आयएमईआय क्रमांकात फेरफार करणारी संगणक प्रणाली तयार करनाराही  शिक्षेस पात्र ठरेल. मोबाइल हँडसेट उत्पादन करणाऱ्या कंपनीखेरीज दुसऱ्या कुणीही मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर काढून टाकल्यास, खोडून टाकल्यास किंवा बदलल्यास, फेरफार केल्यास ते बेकायदा व शिक्षेस पात्र आहे.

मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेला की सर्वप्रथम माहिती घेतली जाते ती ‘आयएमईआय’ क्रमांकाची. प्रत्येक हँडसेटचा ‘युनिक’ क्रमांक असलेल्या या क्रमांकावरून मोबाइलचा शोध घेणं सहज शक्य असतं. त्यामुळे गुन्हेगारी घटनांचा छडा लावताना पोलिसांसाठी आरोपींच्या मोबाइलचा ‘आयएमईआय’ क्रमांक उपयोगी ठरतो. अशा या ‘आयएमईआय’ क्रमांकाचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

छेडछाड कोण करतो?

मोबाइलच्या ‘आयएमईआय’ क्रमांकाशी होणारी छेडछाड प्रामुख्याने मोबाइल दुरुस्तीच्या अनधिकृत दुकानांमध्ये होत असते. अनेक दुकानांतून अशा प्रकारे ‘आयएमईआय’ क्रमांक बदलून दिले जात असल्याचेही आढळून आले आहे. अशा ठिकाणचे दुकानदार चोरी करून गोळा केलेल्या मोबाइलचे ‘आयएमईआय’ क्रमांक बदलून ते सर्वसामान्य ग्राहकांना विकतात. बदललेल्या या विशेष क्रमांकामुळे चोरीचे फोन मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे पोलिसांना शक्य होत नाही.

handgeyogesh@gmail.com

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)