क्षणिक घातक आनंद देणाऱ्या आणि सुखी आयुष्याचा पूर्णपणे बीमोड करणाऱ्या अमली पदार्थाच्या व्यसनाचा विळखा हा तरुणाईभोवती दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संपूर्ण देशभरात ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर अमली पदार्थाची छुप्या पद्धतीने आयात आणि निर्यात केली जाते ज्यात १२ ते २८ वर्षे वयोगटातील तरुणाईचा सर्वाधिक वाटा असल्याचे या विषयाशी संबंधित विविध संशोधनांतून समोर आले आहे. या अमली पदार्थाची किंमत ही आवाक्याबाहेर असते असा समजदेखील अनेक सामान्य नागरिकांमध्ये आहे. प्रत्यक्षात मात्र अगदी दहा रुपयांपासून ते लाख रुपयांना मिळणाऱ्या या अमली पदार्थाचे व्यवहार चालतात आणि तरुणाई ही नशा करण्यासाठी वाट्टेल ते करत असल्याची अनेक उदाहरणे समाजात आपल्याला ऐकायला मिळतात. अमली पदार्थामुळे व्यसनाधीन झालेल्या तसेच आयुष्य नामोहरम होण्याच्या अगोदरच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे अमली पदार्थाच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या आणि अशा व्यक्तीच्या कायम संपर्कात राहिलेल्या अशा तरुणाईशी साधलेला हा संवाद.

अमली पदार्थाच्या विळख्यात स्वत:ला झोकून दिलेल्या आणि पेशाने रॅपर असलेल्या निखिलचे अनुभव अनेकांचे डोळे उघडण्यास भाग पाडणार आहेत. त्याच्या मते अमली पदार्थाची व्यसनाधीनता ही मुळात अयोग्य मानसिकता आणि वाईट संगतीमधून वाढीस लागते. अमली पदार्थ न घेणाऱ्या तरुणांना आजकाल मित्रपरिवाराकडून चिडवण्यात येते. एखादा व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करत नसेल तर, तू जुन्या काळातला आहे, असे बोलून त्याची निंदा केली जाते, त्याला हिणावले जाते आणि चिडवणाऱ्या मित्रांचे तोंड बंद करण्यासाठी तो एकदाच, पहिल्यांदाच अमली पदार्थाचे सेवन करतो. मात्र हे ‘एकदा’ त्याचे पुढे ‘कायम’ होऊन जाऊन तो अमली पदार्थाच्या आहारी जातो. निखिलच्या बाबतीतही असेच झाल्याचे तो सांगतो. निखिलच्या संपर्कात कोणी नवखा अमली पदार्थाच्या आहारी जाणारा व्यक्ती आढळल्यास तो त्याला अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करतो. कारण निखिलच्या मते त्या घटकांच्या अमलात राहणाऱ्या आणि त्याच जगात वावरणाऱ्या व्यक्तीला पुन्हा आभासी विश्वातून वस्तुस्थितीमध्ये आणणे प्रचंड कठीण असते. तुला पुन्हा काळाने मागे नेल्यास तू तुझे निर्णय आणि सवयी बदलशील का, असे विचारल्यावर क्षणार्धात निखिलने होकार दिला. निखिलने सांगितले की प्रत्येक अमली घटकाला पाचारण करण्यापूर्वी तो इंटरनेटच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती काढत असे आणि त्याबद्दल जाणून घेतल्यावर तो ते घटक घेत असे. असे करता करता निखिल अमली पदार्थाचा व्यसनाधीन झाला. या व्यसनाधीनतेच्या काळात निखिलने अनेक मित्रांना गमावले. स्वत:च्या शारीरिक आरोग्यासह निखिलने आयुष्यातील महत्त्वाचा वेळही वाया घालवला; पण तो सध्या सावरतोय. अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्या विळख्यातून दूर राहण्यासाठी मार्गदर्शनही घेत असल्याचे निखिलने सांगितले.

पेशाने छायाचित्रकार असलेला मुंबईतील अर्णव घोष हा या अमली पदार्थ व्यसनांच्या प्रवासामधील परतीची वाट धरलेला तरुण. प्रचंड मोठय़ा आव्हानांना स्वत:च स्वीकारून त्याने स्वत:मध्ये घडवलेला बदल वाखाणण्याजोगा आहे. शालेय जगतापासून लाभलेल्या वाईट संगतीमुळे आणि काही चुकीच्या समजुतींमुळे अमली पदार्थानी अर्णववर गारूड केले होते. आजूबाजूला जेव्हा इतर लोक वारंवार एखादे वाईट कृत्य करत असतात तेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मनाचा ताबा सुटून आपल्यावरदेखील तसे संस्कार होत असतात; किंबहुना आपण ते वाईट संस्कार करवून घेतो. अर्णवच्या बाबतीतही अशीच गोष्ट घडली. पहिल्यांदा अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी अर्णवला कोणीही आग्रह केला नव्हता. मात्र आपण हे करायला हवे, अशी इच्छा मनात निर्माण झाल्याने अर्णवने अमली पदार्थाचे सेवन केले आणि तो अमली पदार्थाच्या आहारी गेला. अमली पदार्थाच्या अमलात असताना अर्णवला तो जे करायचा आणि वागायचा तेच बरोबर वाटायचे. इतरांवर चिडचिड करणे आणि वस्तू फेकून मारण्याचे प्रमाणदेखील वाढत गेल्याचे अर्णवने सांगितले. काही काळानंतर आपण अमली पदार्थाच्या जगतात खूप सुखी आहोत असे भासायला सुरुवात झाली होती, असेही त्याने सांगितले; पण प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य वेळ येते आणि अर्णवची अशीच एक योग्य वेळ आली. छायाचित्रणाच्या कामकाजादरम्यान अर्णवची भेट एका अनोळखी व्यक्तीसोबत झाली. अर्णवने अमली पदार्थाचा मार्ग सोडावा यासाठी त्या व्यक्तीने सांगितलेल्या एका वाक्याची अशी काही जादू झाली की, त्या दिवसापासून अर्णवमध्ये अद्भुत फरक जाणवू लागला. ‘‘आयुष्य हे चालतच राहणार आहे, मात्र तू तुझे आयुष्य इतर सामान्य व्यक्तीप्रमाणे जगायचे की कायम नशेतच जगायचे आहे हे ते तूच ठरव.’’ या वाक्याने अमली पदार्थापासून दूर राहण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे अर्णवने सांगितले.

चिखलातले कमळ या शब्दरचनेला अनुसरून असणाऱ्या अजय भिवसानेचा अनुभव जरूर जाणून घेण्यासारखा आहे. आपला मित्रपरिवार अमली पदार्थाच्या विळख्यात असताना स्वत: मात्र कटाक्षाने त्यापासून तो दूर राहिला. अमली पदार्थाच्या आहारी गेल्यानंतर मानसिक आणि शारीरीक होणारे बदल अजयने मित्रांच्या माध्यमातून जवळून अनुभवले आहेत. अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आपल्या मित्रांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ  नये यासाठी अजयने स्वत:हून अनेक प्रयत्नदेखील केले. परिणामी मित्राचा सल्ला चुकीचा असून तो त्याच्या फायद्यासाठी आपल्याला अमली पदार्थापासून दूर ठेवत असल्याचा गैरसमज अजयच्या मित्रांनी करून घेतला आणि व्यसनाधीन झालेल्या अजयच्या मित्रांनी अजयशी संबंध तोडले. अमली पदार्थाचे सेवन सुरू असताना त्यांच्या हातातून अमली पदार्थ हिसकावून ते दूर फेकून दिल्यास लहान मुलाच्या मानसिकतेप्रमाणे व्यसनाधीन व्यक्ती हातपाय आपटत आणि चिडत असल्याचे अजय सांगतो. अजयच्या मते अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणाला मिळालेली संगत आणि त्याची विचारसरणी जास्त महत्त्वाची असते. तरुणाई ही सुरुवातीला मजा म्हणून अमली पदार्थाचे सेवन करू लागते. मात्र नंतर तो त्याच्या मते तणाव घालवण्यासाठी अमली पदार्थाच्या आहारी जातो. प्रत्यक्षात मात्र तणाव घालवण्यासाठी अमली पदार्थ हा पर्यायच मुळी नसून याविषयी मोठे समज-गैरसमज पसरवले जात असल्याचे अजयने  सांगितले.

विपणन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संदीप शर्माने याच विषयाबाबत अनेक पैलू उलगडले. वयाच्या अवघ्या पंधरा ते सोळा वर्षांपासून अमली पदार्थाचे व्यसन जडलेल्या संदीपलादेखील यातून बाहेर पडताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अमली पदार्थाची सवय लागण्याकरिता बाकीच्या इतर घटकांसोबत आपणही तितकेच स्वत: जबाबदार असतो असे संदीपचे मत आहे. जवळपास चार ते पाच वर्षे या विळख्यात राहून कुठे तरी आपण चुकतोय हे जाणवायला संदीपला सुरुवात झाली. मात्र त्याच्या विळख्यातून बाहेर पडतानाच २०१८ साली वाढदिवसाच्या दिवशी संदीपला मित्रांकडून धोक्याने अमली पदार्थ भरवण्यात आले. मात्र पुन्हा कठोर निर्धार करून, अगम्य इच्छाशक्ती बाळगून विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. वाईट संगत जशी लागू शकते तशी चांगली संगत लागणे हेदेखील आपल्याच हातात असल्याचे संदीपने सांगितले. त्यामुळेच त्याने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या मित्रमंडळींची निवड केली. अधिक वेळ तो अशा मित्रांमध्ये घालवू लागला. वेळप्रसंगी याबद्दल डॉक्टरांसोबत चर्चा करून, मार्गदर्शन घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही त्याने केला आणि त्याच्या मेहनतीला फळ आले.

आज अमली पदार्थाच्या व्यसनातून संदीप मुक्त झाला आहे. आपण जास्त प्रगत आहोत आणि आपला दर्जा इतरांपेक्षा वेगळा आहे हे दाखवून देण्यासाठी तरुणाई अमली पदार्थाची निवड करत असते, असा गैरसमज अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांमध्ये असल्याचे संदीपने सांगितले.

नुकतेच अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेला आशीष हा तरुण नव्या महाविद्यालयात नव्या मित्रांमध्ये रुळायला लागतो. मात्र रुळणे होत नाही तोच आशीष महाविद्यालयात येऊन वाईट संगतींमुळे अमली पदार्थाच्या आहारी गेला. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आशीष महाविद्यालयात येऊन जोमाने पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र एकदा मित्रांच्या आग्रहाखातर आशीष महाविद्यालयात न जाता परस्पर मित्रांसोबत पार्टी करायला गेला आणि त्याच वेळी तो अमली पदार्थाच्या आहारी गेला. सुरुवातीला केवळ चित्रपटांमध्येच नाव ऐकल्याने अशा अतिशय घातक आणि अधिक किमतीच्या अमली पदार्थाचा अनुभव घेण्याची इच्छा आशीषमध्ये निर्माण झाली, मात्र मित्रांच्या आग्रहाने आशीषच्या संयमाचे बंध तोडले आणि तो पुढे अमली पदार्थाच्या आहारी गेला. कुटुंबीयांशी खोटे बोलणे, चिडचिड करणे, एकटे राहणे असे प्रकार वाढून आशीष अमली पदार्थ व्यसनांच्या विळख्यात जखडून गेला.

  संकलन – शामल भंडारे