News Flash

बचतीची दिवाळी

सणांच्या निमित्ताने आणि त्यातही दिवाळीनिमित्ताने केली जाणारी खरेदी ही माझ्या मते एक कला आहे.

बचतीची दिवाळी
(संग्रहित छायाचित्र)

तरुणाईचं एक असतं की खरेदीत हात सैल सोडूनच प्रत्येक वस्तूला हात घालायचा. हौसेला मोल नसतं. म्हणूनच कधीकधी खिसा खाली करूनच घरी यायचं! पण दिवाळीतला हा शिरस्ता अलीकडे थोडा बदललाय. नवनव्या ब्रँड्सचे कपडे, दागिने, इलेट्रॉनिक वस्तूंचं आकर्षण दिवसेंदिवस कमी होतं, खरेदी दिवाळीतच का? ती कधीही करू, असा कल तरुणाईत वाढू लागला आहे. यासाठी खर्चापेक्षा बचत वा मग गुंतवणूक असे पर्याय निवडले जाऊ लागलेत.

केवळ सोपस्कार

सातत्याने खरेदीवर येणाऱ्या सवलतींमुळे विशेष सण-समारंभाच्या निमित्ताने खरेदी करण्याकडे मोझी ओढ नाही. याशिवाय माझ्यासारख्या तरुण पिढीतही काहीशी अशीच धारणा निर्माण झाली आहे. लहानपणी सणांच्या पाश्र्वभूमीवर असणारा खरेदीचा उत्साह वयाचा एका टप्प्यानंतर मावळला आहे. केवळ सोपस्कार म्हणून दिवाळीत खरेदी करण्याकडे सध्या तरी माझा कल आहे.

 -पूजा मोरे

ट्रेंडनुसार खरेदी

दिवाळीत खरेदीचे अप्रूप माझ्याबाबतीत तरी कायम आहे. आता गरजेनुसार मला हवे तसे कपडे मी खरेदी करतेच. कपडय़ांसह दागिन्यांमध्ये बदलता ट्रेंड मला भुरळ घालतो. तेव्हा मी खरेदीला प्राधान्य देतेच. आता दिवाळीआधी मला आवडलेला ड्रेस मी खरेदी केला आणि दिवाळीत तसाच ड्रेस जर का दुकानात वा ऑनलाइन असेल तर मी स्वत:ला ‘नाही’ असे बजावते! घरात आई-बाबांच्या आग्रहाखातर कपडय़ांची खरेदी होते, हा भाग वेगळा.

-निशा चव्हाण

खरेदी ही एक कला..

सणांच्या निमित्ताने आणि त्यातही दिवाळीनिमित्ताने केली जाणारी खरेदी ही माझ्या मते एक कला आहे. साडय़ांच्या दुकानात जाऊन तेथील पारंपरिक बैठय़ा बैठकीवर बसून घरातील स्त्रियांसाठी साडी खरेदी करण्याचा उत्साह निराळा आहे. मात्र आता ऑनलाइन खरेदीच्या जगात खरेदीची मजा नाहीशी झाली आहे. अगदी प्रजासत्ताक दिनापासून पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर खरेदी संकेतस्थळांवर सवलतींचा प्रवाह असतोच. त्यामुळे बऱ्याचदा अशा वेळीच खरेदीची हौस आमच्या तरुण पिढीकडून भागवली जाते. पूर्वी आपली खरेदीची विशेषत: कपडे खरेदीची दुकाने ठरलेली असायची. त्याच दुकानातून जाऊन विशिष्ट वस्तू खरेदी करण्याकडे कल असायचा. त्यात आता बदल झालाय. गरज आणि आर्थिक उपलब्धतेनुसार खरेदी ही संकल्पनाच आता अस्तित्वात राहिलेली नाही.

-नीलेश अडसूळ

सवलतींच्या लाटेवर स्वार

दिवाळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अधिक सवलती असतात. त्यामुळे खरेदीचा जोर असतोच. सवलत हा त्यातील उत्साहाचा भाग. बऱ्याचदा मी सवलतींकडे डोळे लावून बसलेलो असतो. मोबाइल हा यात सर्वात आघाडीवर असतो. सवलतींच्या लाटेवर स्वार होऊन जी खरेदी होते, ती मग भले दोनदा का असेना, ती केली जाते. सण हे निमित्त आहे. तरीही वस्तूची गरज अधिक महत्त्वाची आहे.

-अभिषेक पाष्टे

गुंतवणुकीवर भर

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर पूर्वीसारखा खरेदीचा उत्साह आता राहिलेला नाही. खरेदीच्या गरजांमध्ये बदल होत आहेत. पूर्वी केवळ दिवाळी, वाढदिवस वा एखाद्या विशेष समारंभाच्या निमित्ताने खरेदी केली जात होती. मात्र आता महिन्यातून किमान दोन वेळा तरी कपडय़ांसह काही नकली दागिन्यांची (इमिटेशन ज्वेलरी) खरेदी होते. त्यामुळे सणानिमित्ताने विशेष काही खरेदी करावे असे वाटत नाही. सणांच्या दिवसात खरेदी संकेतस्थळावर मोठय़ा सवलती मिळतात. अशा वेळी केवळ सवलत मिळत असल्याने ती करायची. त्यामागे खरेदीच्या उत्साहाचे वलय नसते. मी तर नेहमी गुंतवणुकीवर भर देते.

-अपर्णा कांबळे

संकलन : अक्षय मांडवकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2018 4:44 am

Web Title: investment in diwali festival
Next Stories
1 मस्त मॉकटेल : पॅशन फ्रूट कूलर
2 हॅचबॅक की सेडान?
3 लॅण्ड रोव्हरचा थरारक अनुभव
Just Now!
X