29 October 2020

News Flash

नियमांची नवलाई!

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यातील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेली लढत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे गाजली.

|| ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ‘पॉवर प्लेयर’नामक नव्या आकर्षक नियमाचा समावेश करण्यात येणार असल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. परंतु मुळात मात्र वेळेअभावी २०२०च्या ‘आयपीएल’मध्ये ‘पॉवर प्लेयर’चा समावेश नाकारण्यात आला असून अन्य काही आकर्षक नव्या नियमांविषयी मात्र विचारविनिमय सुरू आहे. त्याच पाश्र्वभूमीवर ‘आयपीएल’बरोबरच क्रिकेटमधील आणखी काही मनोरंजक नियमांचा घेतलेला आढावा.

‘नो-बॉल’साठी विशेष पंच

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यातील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेली लढत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे गाजली. अखेरच्या चेंडूवर बेंगळुरुला विजयासाठी सात धावांची आवश्यकता असताना लसिथ मलिंगाने टाकलेला चेंडू नो-बॉल असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले, परंतु मैदानावरील पंचांना ही चूक लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. त्यामुळे या चुकीतून बोध घेत यंदा गव्हर्निग कौन्सिल ‘आयपीएल’मध्ये फक्त नो-बॉलसाठी विशेष पंचांची नेमणूक करण्याची शक्यता आहे. हा पंच मैदानावर असेल की मैदानाबाहेर हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, गोलंदाजाने फेकलेला चेंडू किती उंचीवरून गेला, याकडेही तो बारीक लक्ष ठेवणार आहे.

‘पॉवर प्लेयर’ म्हणजे नक्की काय?

२०२०च्या ‘आयपीएल’मध्ये ‘पॉवर प्लेयर’चा नियम नाकारण्यात आला असला तरी हा नियम नक्की काय आहे, असा प्रश्न तुम्हा सर्वानाच पडला असेल. ‘पॉवर प्लेयर’मध्ये प्रत्येक संघ ११ ऐवजी १५ खेळाडूंचा चमू जाहीर करणार. त्यानंतर सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाज बाद झाल्यानंतर अथवा एखादे षटक संपल्यानंतर केव्हाही ड्रेसिंगरूममध्ये बसलेला राखीव फलंदाज अथवा गोलंदाज मैदानावर खेळण्यासाठी येऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या वेळी तुम्हाला सहा चेंडूंत २० धावांची आवश्यकता असताना आंद्रे रसेल तुमच्या अंतिम संघात नसला, परंतु त्याचा १५ खेळाडूंत समावेश असला तरी तुम्ही त्याला फलंदाजीला पाठवू शकता. त्याचप्रमाणे गोलंदाजीच्या वेळी शेवटच्या षटकात तुम्हाला सहा-सात धावांचा बचाव करावयाचा असल्यास तुम्ही जसप्रीत बुमराच्या हाती चेंडू सोपवू शकता. एकंदर गरजेनुसार आवश्यक त्या खेळाडूचा वापर करून तुम्ही सामन्याचे रूपडे पालटू शकता. आगामी मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत या नियमाची चाचपडताळणी होण्याची शक्यता आहे.

हेल्मेटला लागून झेल पकडल्यास फलंदाज बाद

कोणत्याही फलंदाजाने टोलवलेला चेंडू एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून त्यानेच अथवा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास आता फलंदाजाला बाद दिले जाणार आहे. यापूर्वी, असा झेल गृहीत धरला जात नव्हता. परंतु या नियमामुळे फलंदाजांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

टोन टप्पे चेंडू टाकल्यास नो-बॉल

क्रिकेटमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या मनोरंजक नियमांपैकी हा एक नियम. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजापर्यंत दोन टप्पे पडून गेल्यास पंच त्या चेंडूला थेट नो-बॉल घोषित करू शकतात. त्यामुळे गोलंदाजांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

क्रिकेटपटूंनाही लाल कार्ड

फुटबॉलमध्ये एखाद्या खेळाडूने नियमभंग केल्यास अथवा पंचांशी हुज्जत घातल्यास पंचांनी त्या खेळाडूला लाल कार्ड (मैदानाबाहेर जाण्याचे चिन्ह) दाखवल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. परंतु आता ‘आयपीएल’ किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही शिस्त आणि खेळभावनेचे पालन न करणाऱ्यांना मैदानावरील पंच लाल कार्ड दाखवू शकतात. ‘आयसीसी’च्या नियम क्रमांक चारच्या १.३ कलमानुसार पंचांना हा हक्क देण्यात आला असून क्षेत्ररक्षकाने ‘फेक फिल्डिंग’ म्हणजेच चेंडू पकडलेला नसतानाही फलंदाजाला बाचकवण्यासाठी तो फेकण्याची कृती केल्यास पंच त्या खेळाडूला दंड ठोठावू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 2:03 am

Web Title: ipl rule off the field akp 94
Next Stories
1 जीवन जगण्याची नशा..
2 चिकन पेरी पेरी
3 लेक्चर बुडवून थेट तालमीला हजेरी
Just Now!
X