News Flash

कावीळ

पित्तदोष बिघडवण्यास मदत करणारे आहार-विहारातील घटक हे कावीळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात

संग्रहित छायाचित्र

घरचा आयुर्वेद : वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

कावीळ या व्याधीला आयुर्वेदाने ‘कामला’ असे संबोधले आहे. अनेक गैरसमजांनी वेढलेला हा रोग वेळीच आटोक्यात न आल्यास मात्र धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच हा रोग झाल्यास वेळीच योग्य उपचार करून घेणे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे तो होऊ  नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी काविळीची कारणे, सामान्य लक्षणे आणि शास्त्रीय उपचारांच्या दिशा समजून घेणे उचित ठरेल. आयुर्वेदाने काविळीच्या संदर्भातील या सर्व घटकांचे वर्णन केलेले आहे. यावरूनच अतिशय प्राचीन काळापासून या रोगाचे अस्तित्व असल्याचा नित्कर्ष काढता येतो.

आयुर्वेदीय वर्णन

वात, पित्त आणि कफ हे तीन घटक शरीराचे कार्य चालवतात. त्यांच्यामध्ये असमतोल निर्माण झाल्यास मात्र शरीरामध्ये रोगांची निर्मिती होते. कावीळ हा रोग या तीन घटकांपैकी प्रामुख्याने पित्तदोषाच्या विकृतीमुळे निर्माण होतो. प्राकृत स्थितीत असताना शरीरात बाहेरून घेतलेल्या घटकांचे पचन करण्याचे कार्य पित्तदोषाला करावे लागते. काविळीमध्ये नेमके हेच कार्य बिघडते. त्यामुळेच कावीळ हा पचनसंस्थेशी संबंधित रोग आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

काविळीची कारणे –

पित्तदोष बिघडवण्यास मदत करणारे आहार-विहारातील घटक हे कावीळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. पांडुरोग झालेल्या व्यक्तीने तीक्ष्ण, उष्ण मसालेदार अशा पदार्थाचे सेवन अधिक प्रमाणात केले तर कावीळ निर्माण होण्याची शक्यता असते. एरव्ही पित्तदोषाला बिघडवणारे घटक कावीळ निर्माण करू शकतात. या रोगामध्ये पित्ताचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढते. त्यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. या पित्तामुळे अनेकांना ओकारीचा त्रास होतो. रक्तामध्येही पित्ताचे प्रमाण वाढून त्वचेला, नखांना, डोळ्यांना पिवळसर रंग येतो. लघवीचा रंग पिवळा होतो. भूक लागत नाही. पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे होणाऱ्या या काविळीला बहुपित्ताकामला असे आयुर्वेदात म्हटले आहे.

काविळीचा दुसरा प्रकार पाहायला मिळतो, त्यास ‘ऑबस्ट्रेक्टिव्ह जेनेडियस’ म्हटले जाते. यामध्ये पित्तनलिकेमध्ये अवरोध निर्माण झाल्यामुळे पित्त आतडय़ांमध्ये पोहोचू शकत नाही. रोग्याच्या मळाला पांढरा रंग येतो.

काविळीला प्रतिबंध

पित्तदोष वाढवणाऱ्या घटकांचे सेवन न करणे, जागरण, मद्यपान अशा गोष्टींना फाटा देणे, दूषित पाण्याचे सेवन न करणे हे सर्व कावीळ प्रतिबंधक उपाय आहेत. काविळीवरील उपचारासंदर्भात अनेकांच्या मनात गैरसमज आढळतात. त्यामुळे अनेक बिगरवैद्यकीय उपचारांचा अवलंब करतात. कावीळ सुरुवातीलाच योग्य उपचारांनी नियंत्रणात आणली पाहिजे, अन्यथा ती आरोग्यदृष्टय़ा धोकादायक ठरू शकते. आयुर्वेदाने काविळीवरील विविध उपचार सांगितले आहेत. वाढलेले पित्त कमी होण्यासाठी विरेचन चिकित्सा यामध्ये महत्त्वाची ठरते. कुटकी ही वनस्पती यामध्ये अतिशय उपयोगी पडणारी आहे. त्याचप्रमाणे आवळ्याचा रस

काविळीत उपयोगी पडतो. काविळीची शंका आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. भुईआवळा या वनस्पतीवर वैद्यकशास्त्रज्ञांनी संशोधन करून काविळीचे कारण मानलेल्या विषाणूवर या वनस्पतीचा उपयोग होतो, असे सिद्ध केले आहे. अशा प्रकारचे संशोधन इतर अनेक आयुर्वेदीय द्रव्यांवर होण्याची आवश्यकता आहे.

वर वर्णन केलेली चिकित्सा काविळीच्या पहिल्या प्रकारात उपयोगी पडते. पित्तमार्गात अडथळा निर्माण झाल्याने होणाऱ्या काविळीत ही अडथळा दूर करणारी औषधे वापरून मग पित्तशामक द्रव्ये आयुर्वेदानुसार वापरावी लागतात.

काही वेळा यावर शस्त्रक्रियाही करावी लागते. काविळीवर उपचार करणारे अनेक परंपरागत वैदू आपल्या देशाच्या ग्रामीण भागामध्ये आढळतात. त्यांच्या उपचारांचाही शास्त्रीय अभ्यास करण्याची वेळ आली आहे.  ayurvijay7@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:23 am

Web Title: jaundice ayurveda
Next Stories
1 पीसीओएस
2 ब्रोकोली उसळ
3 शैलीदार, उठावदार सेल्टोस
Just Now!
X