15 September 2019

News Flash

शैलीदार, उठावदार सेल्टोस

सेल्टोसमध्ये कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी ‘टेक लाइन’ आणि युवा कारप्रेमींसाठी ‘जीटी लाइन’ असे दोन प्रकार आहेत.

(संग्रहित छायाचित्र )

बापू बैलकर

‘किया’ने आपली बहुप्रतीक्षित मध्यम आकारातील ‘एसयूव्ही’ गुरुवारी अखेर बाजारात आणली. भारतातील संपूर्ण मध्यम आकारातील-एसयूव्ही विभागाची व्याख्या ‘सेल्टोस’ बदलेल असा कंपनीचा दावा असून दर्जेदार सुविधा, शक्तिशाली इंजिन, सुरक्षेची काळजी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (यूव्हीओ) वापर यामुळे सेल्टोस ग्राहकांना सुखद अनुभव देईल असा कंपनीला विश्वास आहे.

वाहन उद्योग सध्या मोठय़ा आर्थिक मंदीतून जात आहे. खरेदीदारांच्या निरुत्साहाचा फटका बसत आहे. त्यात वित्तीय कंपन्यांनी नवीन कर्ज वितरण बंद केले आहे. त्याचा परिणाम म्हणून वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात तंत्रस्नेही वर्गाच्या आशा-आकांक्षांना गवसनी घालत काही देशी-विदेशी वाहन कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत तसेच जास्तीत जास्त सुविधा असलेल्या मोटारी बाजारात आणल्या. यात महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई आणि निसान भारतीय कंपन्यांसह एमजी मोटर (मॉरिस गॅरेजेस) या कंपन्यांनी या वर्षांत वैशिष्टय़पूर्ण ‘एसयूव्ही’ प्रदर्शित केल्या आहेत. पेट्रोल, डिझेल या दोन्ही पर्यायांसह दमदार इंजिन, दिसायला आकर्षक, आरामदायी व अत्याधुनिक तंत्राचा वापर यात करण्यात आला असून लांबच्या प्रवासासाठी उपयुक्तता लक्षात घेत या मोटारी ग्राहकांच्या आकांक्षांना हात घालत आहेत. सुरक्षेची विशेष काळजी घेतल्याचेही दिसून येत आहे. यामुळे वाहन बाजारात मंदीचे ढग गरजत असताना ‘एसयूव्ही’च्या विक्रीने या उद्योगाला हात दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कोरियन कंपनी ‘किया’ने आशा परिस्थितीत भारतात वाहन उद्योगात पदार्पण करीत आपली पहिली मध्यम आकारातील ‘किया सेल्टोस’ ही  ‘एसयूव्ही’ गुरुवारी मुंबईत दाखल केली. गेली वर्षभर या कारची चर्चा सुरू होती. तिने प्रत्यक्ष बाजारात येण्यापूर्वीच ३५ हजार नोंदणीचा पल्ला गाठला असून ग्राहकांना ‘कनेक्टीव्हीटी’ प्रकारात पूर्णपणे नवीन अनुभव देण्याचा दावा कंपनीने केला आहे. यात ‘यूव्हीओ’ या तंत्रज्ञानाचा वापर केला असून ही कार दर्जेदार सुविधा, वैशिष्टय़पूर्ण रचना, शक्तिशाली इंजिनांचे पर्याय यामुळे भारतीय ग्राहकांना सुखद अनुभव देईल असा त्यांना विश्वास आहे.

सेल्टोस ही गाडी ‘बीएस ४’ नियमांची पूर्तता करणारी असून, पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारांत तसेच मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. सिक्स-स्पीड मॅन्युअल/ सेव्हन स्पीड डीसीटीसह स्मार्टस्ट्रीम, १.४ पिकअप पेट्रोल इंजिनमध्ये सेल्टोस उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सिक्स स्पीड मॅन्युअल/सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि सिक्स स्पीड मॅन्युअल/आयव्हीटीसह स्मार्टस्ट्रीम १.५ पेट्रोल इंजिनमध्येही ही गाडी उपलब्ध आहे. याशिवाय सर्व इंजिन्स ‘बीएस-४’  नियमांची पूर्तता करणारी आहेत. त्यामुळे पुढील वर्षी लागू होणारे पर्यावरणा संदर्भातील नियमही पूर्ण करणारी सेल्टोस ही या विभागातील पहिली कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सेल्टोसमध्ये कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी ‘टेक लाइन’ आणि युवा कारप्रेमींसाठी ‘जीटी लाइन’ असे दोन प्रकार आहेत. ८ इंची हेड्स-अप-डिसप्ले, १०.२५ इंची एचडी टचस्क्रीन, हाय-टेक साउंड मूड लॅम्प, रिअर शेड कर्टन व रिव्हर्स कॅमेऱ्यामुळे चालकाला ३६० अंशात गाडी तपासता येते.

जगातील पहिला कनेक्टेड एअर-प्यूरिफायर, गाडीसोबत वायरलेस व अखंडित जोडलेले राहण्यासाठी ३७ सुविधांनी युक्त अशी स्वत: विकसित केलेली अतिप्रगत ‘यूव्हीओ’ कनेक्ट प्रणाली आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टम आणि यांसारख्या अनेक अव्वल दर्जाच्या व स्मार्ट सुविधा दिल्या आहेत. याशिवाय ईएससी, व्हीएसम, ६ एअरबॅग्ज, एएचएसएस-प्रगत हाय स्ट्रेंग्थ व्हील याद्वारे सुरक्षेची काळजी घेतली आहे. सेल्टोस आठ रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या गाडीचे स्वागतमूल्य सुरुवातीच्या स्तरावरील पेट्रोल स्मार्टस्ट्रीम जी १.५ एचटीई गाडीसाठी ९.६९ लाख रुपये (एक्स शोरूम संपूर्ण भारतासाठी) व सर्वोच्च स्तरावरील गाडीसाठी १५.९९  लाख रुपये (एक्स-शोरूम संपूर्ण भारतासाठी) आहे.

सुलभ खरेदी प्रक्रिया

कार खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘किया’ने भारतातील आठ अग्रगण्य बँकांसोबत करार केले आहेत. यामुळे ग्राहकांना सर्वात आकर्षक वित्तसहाय्य, कमी व्याजदरांत तसेच परतफेडीच्या इच्छित कालावधीसह मिळू शकेल असा दावा आहे. ग्राहकांसाठी ‘ऑनलाइन खरेदी प्रक्रिया’ विकसित केली आहे. देशातील दोन अग्रगण्य बँकांनी ग्राहकांना पूर्णपणे ऑनलाइन वित्तपुरवठय़ाचा पर्याय देण्यासाठी कंपनीसोबत करार केला आहे.

तत्काळ सेवा

सेल्टोससाठी ‘किया’ मोटर्सच्या सर्वसमावेशक ‘प्रॉमिस टू केअर’ सेवा देण्यात येणार आहे. भारतातील १६० शहरांमध्ये ३६५ दालने उभारले असून सुट्टय़ा भागांच्या विक्रीसाठी चेन्नई, नवी मुंबई, दिल्ली व कोलकाता या चार ठिकाणी गोदामे उभारण्यात आले आहेत. ‘सेल्टोस’वर तीन वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी अमर्यादित किलोमीटर्ससाठी दिली जाते. त्याचप्रमाणे ही वॉरंटी पाच वर्षांपर्यंत विस्तारण्याचा पर्यायही ग्राहकांना दिला जातो. यामध्ये तीन वर्षांसाठी दिवसरात्र सेवा पुरवली जाणार आहे.  त्याचप्रमाणे एकदा मोफत दुरुस्तीची सुविधा देण्यासाठी ‘स्क्रॅच केअर’ पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

किंमत

पेट्रोल (स्मार्टस्ट्रीम जी १.५)

* एचटीई ९.६९ लाख, एचटीके ९.९९,लाख एचटीकेप्लस ११.१९ लाख, एचटीएक्स १२.७९ लाख, एचटीएक्स(आयव्हीटी ) १३.७९ लाख.

पेट्रोल (जीटी लाइन स्मार्टस्ट्रीम १.४ टी जीडीआय)

* एचटीई १३.४९ लाख, एचटीके १४.९९लाख, एचटीके (७ डीसीटी ) १५.९९लाख , एचटीके प्लस १५.९९ लाख.

डिझेल (१.५ सीआरडीआय व्हीजीटी)

* एचटीई ९.९९ लाख, एचटीके ११.१९ लाख, एचटीके प्लस १२.१९ लाख, एचटीके प्लस (६ एटी ) १३.१९ लाख,  एचटीएक्स डीजल १३.७९ लाख, एचटीएक्स प्लस १४.९९ लाख, एचटीएक्स पीआय (६ ऐटी ) १५.९९ लाख.

यूव्हीओ’ कनेक्ट

ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये यूव्हीओ कनेक्ट नावाची एक कनेक्टिव्हिटी प्रणाली आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या पाच श्रेणीअंतर्गत ३७ फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, ८ -स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

गाडीची वैशिष्टय़े

* ‘यूव्हीओ’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

*  किंमत ९.६९ पासून १५.९९ लाखांपर्यंत

*  टेक आणि जीटी दोन प्रकार

*  सात रंगांचे पर्याय

*  ‘बीएस ४’ नियमांची पूर्तता

*  आत्तापर्यंत ३२,०३५ वाहनांची पूर्वनोंदणी

* इंजिन क्षमता : डिझेल १४९३ सीसी

*  पेट्रोल : १४९७  व १३५३ सीसी

* बूटस्पेस : ४३३ लीटर

*  इंधन क्षमता : ५० लीटर

*  ब्रेक : डिस्क

*  साईज : लांबी : ४३१५ मिलीमीटर, रुंदी : १८०० मिलीमीटर, उंची : १६२० मिलीमीटर

व्हीलबेस : २६१० मिलीमीटर

bapu.bailkar@gmail.com

First Published on August 24, 2019 12:13 am

Web Title: kia seltos suv abn 97