करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com  टाळेबंदीच्या काळात घरात बसून करायचे काय याचे फार छान उत्तर अनेक लहानग्यांनी शोधले आहे. कुणी भातुकलीत रमले तर कुणी रंगात. कुणी स्वयंपाकाचे धडे गिरवते आहे तर कुणी वाचनात दंग आहे..

1 ) मी रावी पांडे, इयत्ता तिसरीत शिकते. सी एम इंटरनॅशनल स्कूल, पुणे या शाळेत शिकते. करोनामुळे मिळालेल्या या सुटय़ांमध्ये मी चित्र काढते आहे. वसुंधरादिनानिमित्त मी काढलेले एक चित्र

2)  मी अभिमान आयरे, डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल, अलिबाग या शाळेत शिकतो. चित्रकला हा माझा आवडता छंद आहे. करोनामुळे मिळालेल्या या सुट्टीमध्ये मी माझा हा छंद जोपासत आहे. मी चित्रकलेत खूप प्रयोग करून पाहत असतो. त्यामुळे माझी चित्रकला सुधारते आहे आणि वेळही मजेत जातो आहे.

 घरी राहा, वाचा, शिका..

दररोज ऑफिसला जाण्यासाठी घडय़ाळाच्या काटय़ांवर पळणारे आई-वडील लॉकडाऊनच्या काळात मात्र मला भरपूर वेळ देत आहेत. त्यांच्या जोडीला आजोबाही आहेत. त्यामुळे एकत्र राहण्याचा आनंद अनुभवण्यास मिळत आहे. रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग आजोबा सांगत आहेत. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होण्यास याचा उपयोग होत आहे. वाचनाची गोडी लागली आहे. पुस्तकांसारखा दुसरा मित्र कोणीही नाही. या सुट्टय़ांचा आणि असलेल्या वेळेचा सदुपयोग करून पंचतंत्र, इसापनीतीच्या गोष्टी वाचत किंवा ऐकत आहे. क्रिएटिव्ह गोष्टी करण्यात गुंग आहे. चित्र काढणं किंवा हस्तकलेत गुंतून राहत आहे. दररोज एक टास्क घेऊन त्यात मन रमवते. स्वावलंबनाची सवय लावून घेत आहे. या काळात घरातील अनेक छोटय़ा कामांत मदत करते. हसतखेळत त्यातील काही गोष्टी शिकते. आपलं जेवणाचं ताट बेसिनमध्ये ठेवणं, केर काढणं, कपडय़ांच्या घडय़ा करणं अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून सुरुवात केली. आई-बाबांचे लहानपणीचे अनुभव ऐकले, यामुळे वेळ मजेत जातो. एखादा नवा छंद जोपासण्यासाठी किंवा काहीतरी नवं शिकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. घरकामात छोटय़ा छोटय़ा कामांतून दिवस-रात्र किचनमध्ये राबणाऱ्या आईला सध्या दिलासा मिळत आहे. घरातच बैठे खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. तर घरातच व्यायाम, कसरती सुरू ठेवण्यावर भर देत आहे. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, ल्युडो यांसारखे घरगुती बैठे खेळ रंगू लागले आहेत.

– आरोही गांधी, इयत्ता : पाचवी, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे

बाललीलांत रमलो

डॉ. कृष्णा गायकवाडमुक्ताईनगर : करोनाने साऱ्यांनाच घरात बंदिस्त के ले आहे. पण आमच्या घरात तीन तीन मुले असल्याने आम्हाला कं टाळा येत नाही. या टाळेबंदीदरम्यान  माझ्या दोन्ही भावांच्या मुली ऋतुजा (इयत्ता— सातवी) व श्रद्धा (इयत्ता – सहावी) या शिक्षणासाठी माझ्याच घरी राहतात. या दोघींसोबत खेळायला माझा दीड वर्षांचा मुलगा अर्णवही आहे. तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा सांगतात. मराठी, हिंदी, इंग्रजी कविता म्हणतात. या दोघी आपली पुस्तके  त्याला देतात आणि गाणी शिकवतात, कविता शिकवतात. ताईसारखा अभ्यास करताना अर्णवलाही खूप मजा येते. छान टाळ्या वाजवत, खिदळत हा अभ्यास चाललेला असतो. या तिघांच्या बाललीला पाहताना आमचाही वेळ छान जात आहे. पण या दोघींच्या एका प्रश्नाचे उत्तर देणे मात्र मला कठीण जात आहे, तो प्रश्न म्हणजे, काका शाळा
केव्हा सुरू होणार? या दोघींच्या त्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर लवकरच सापडो, हीच प्रार्थना.

ताजी भाजी आणि भातुकली

विवेक चव्हाणशहापूर, ठाणे : आता इतके  दिवस झाल्यामुळे टाळेबंदी काहीशी सरावाची झाली आहे. माझी मुलगीही खेळण्यासाठी बाहेर जात नाही. घरातच तिच्या चिमुकल्या तंबूत सारा संसार मांडून खेळते आहे. तिचा पाचवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास आम्ही दोघे घेत असतो. सोबत स्वयंपाकाचे आणि  विज्ञानातीलही सोपे प्रयोग सुरू आहेत. मी शिक्षक आहे. आश्रमशाळेतील माझ्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सॅपच्या माध्यमातून शिकवत असतो.  आदिवासी  विभागाच्या  स्नेहसेतू  कार्यक्रमातून  १ मेपासून शहापूर  प्रकल्पातील  विविध  आश्रमशाळेतील  पालक  आणि  विद्यार्थ्यांशी  संपर्क  करून  संवाद  साधत  आहे. भाजीपाल्याची समस्या सोडवण्यासाठी घरीच मेथीच्या भाजीची लागवड करत आहोत. ५-६ दिवसांतून एकदा ताजी भाजी मिळते.

गणरायाला विनंती

हर्ष आणि हर्षिता, ठाणे : आमचे नाव हर्ष आणि हर्षिता आहे. आता आम्ही पाचवीत जाणार आहोत. आम्हाला शाळेतून अचानक करोनाची सुट्टी मिळाली आणि परीक्षा पण होणार नाही हे समजल्यावर तर फारच आनंद झाला. आम्ही खूप मजा केली, खेळलो, सिनेमा बघितला, उशिरापर्यंत लोळलो.  इतकी मोठी सुट्टी मिळाली म्हणून आधी आम्हाला मजा वाटली, पण नंतर कं टाळा आला. तेवढय़ात आईने सांगितले की, तुमचे ऑनलाइन शाळेचे, डान्सचे आणि तबल्याचे क्लासेस सुरू होणार आहे. पहिल्यांदा ऑनलाइन क्लास करताना खूप मजा वाटली. शाळेच्या मित्र-मैत्रिणी आणि टीचरना बघून मस्त वाटले. आईने आम्हाला नीट समजावून सांगितले का घरी राहायचे ते, मग घरीच राहून बऱ्याच गोष्टी शिकलो. रोज सकाळी उठल्यावर आम्ही गच्चीवर व्यायाम करतो, थोडा वेळ खेळतो. रोज रात्री आमच्या लाडक्या बाप्पाला सांगतो, हा करोना जाऊ दे. टाळेबंदी संपू दे आणि आम्हाला आजी आजोबांकडे जायला मिळू दे.