08 March 2021

News Flash

गुडघेदुखी

गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. उतारवयात हाडांची झीज होते.

काळजी उतारवयातली : डॉ. नीलम रेडकर

आपल्या प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. उतारवयात हाडांची झीज होते. त्यामुळे सांधेदुखी सुरू होते. शरीरातील हाडे आणि सांधे महत्त्वाची भूमिका बजावतात. उतारवयात होणारा गुडघेदुखीचा त्रास हा ‘ऑस्टियोआर्थरायटिस’मुळे होतो. या लेखात आपण ऑस्टियोआर्थरायटिसमुळे होणाऱ्या गुडघेदुखीबाबत जाणून घेणार आहोत.

ऑस्टियोआर्थरायटिस म्हणजे काय?

ऑस्टियोआर्थरायटिसमुळे होणाऱ्या सांधेदुखीमध्ये प्रामुख्याने गुडघे, नितंब, मानेचे व पाठीचे मणके यांच्यातील सांध्यांमधील हाडांची झीज होते. आपले गुडघे आपल्या शरीराचे वजन तोलून धरत असल्यामुळे या आजारामुळे होणाऱ्या गुडघेदुखीमुळे अनेक रुग्ण त्रस्त होतात.

गुडघा हा तीन हाडे, गुडघ्याची वाटी व संधिबंधांनी तयार होतो. सांध्यांची हालचाल सहज व्हावी म्हणून हाडाच्या टोकांना कार्टिलेज आवरण असते. या आजारात कार्टिलेजची झीज आधी सुरू होते आणि जसा हा आजार बळावतो तसा सायनोव्हियम व हाडांचीही झीज होते आणि हळूहळू गुडघेदुखीची समस्या सुरू होते.

गुडघीदुखीची कारणे-

  •  स्थूलतेचे वाढणारे प्रमाण
  •  गुडघ्यावर अतिभार टाकणाऱ्या क्रिया
  •  वयोमानानुसार होणारी हाडांची झीज व ठिसूळता
  • आनुवंशिकता, हाडांमध्ये जन्मजात विकृती
  •  गुडघ्यांना लागलेला मार किंवा जंतूचा प्रादुर्भाव
  •  पूर्ण दिवस उभ्याने काम करण्याच्या सवयीमुळे गुडघ्यांच्या हालचालींना न मिळणारा वाव.
  •  चुकीची व्यायाम पद्धत.
  • वजन वाहण्याचे काम.

गुडघेदुखीवरील उपचार व घ्यावयाची काळजी – गुडघेदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना व उतरताना किंवा खाली बसल्यावर उठताना. कधी कधी तर हालचालीत कटकट आवाज येतो. वेळीच योग्य ती काळजी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

व्यायाम – गुडघेदुखीच्या समस्येवर व्यायाम हा निश्चितच चांगला उपाय आहे. व्यायामामुळे स्नायू अधिक बळकट होतात आणि सांधे लवचीक होतात. गुडघ्याचे व्यायाम हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. कारण चुकीच्या व्यायाम पद्धतीमुळे गुडघेदुखीची समस्या वाढू शकते. वाढलेले वजन कमी करण्यासाठीही व्यायामाची गरज आहे. तसेच व्यायामामुळे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. गुडघेदुखीसाठी भाररहित व्यायाम करावे. जसे की खुर्चीवर बसून पाय सरळ वर-खाली करणे. हे दिवसातून ४-५वेळा करावे. व्यायामामुळे गुडघ्याभोवतालच्या स्नायूंना बळकटी येते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

आहार- आहारात कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. आहारात दूध-दह्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. दूध-दही आवडत नसेल तर सोयाबीनचे पदार्थ खा. आहारात अंडय़ांच्याही समावेश करा. अंडय़ाच्या पांढऱ्या भागात कॅल्शिअम असते तर पिवळय़ा भागात ड जीवनसत्त्व असते. अळशीच्या बियाही हाडांना मजबुती देण्याचे काम करतात.

घ्यावयाची काळजी

गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांनी भारतीय पद्धतीचे शौचालय न वापरता कमोड किंवा खुर्चीचा वापर करा.

उंच टाचांच्या चपला वापरणे टाळा.

चालताना काठीचा वापर करा. त्यामुळे काही भार गुडघ्यांऐजवी काठीवर विभागला जाईल.

वजन नियंत्रित ठेवा.

वैद्यकीय उपचार- गुडघा खूप दुखत असल्यास गुडघ्यात स्टेरॉइडची इंजेक्शन दिल्याने तात्पुरता महिनाभर आराम मिळतो. मात्र वारंवार हे इंजेक्शन घेतल्याने नुकसान होते.

हाडांच्या कार्टिलेजची झीज भरून काढणारी औषधे उपलब्ध आहेत. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर टाळा. सर्व उपाय थकले तर सांधेरोपणाची शस्त्रक्रिया हा खर्चीक उपाय आहे. यामध्ये कृत्रिम सांधा वापरला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:53 am

Web Title: knee pain akp 94
Next Stories
1 वाढत्या वजनावरील उपाय
2 दिवाळीत वाहन उद्योग सावरला..पण आव्हान कायम
3 व्हिंटेज वॉर : ही गाडी कुणाची?
Just Now!
X