व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

लॅम्बॉर्गिनीने गुरुवारी हुराकान इवो स्पायडर या त्यांच्या नव्या सुपरकारचे भारतात अनावरण केले. हुराकानला एक नव्या अवतारात बाजारात दाखल केले आहे. या गाडीच्या मदतीने लॅम्बॉर्गिनी भारतातील त्यांची यशस्वी वाटचाल अधोरेखित करू इच्छित आहे.

भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता सुपरकारचे आपल्या देशात काय भवितव्य या प्रश्नाचे उत्तर सुपरकारच्या विक्रीच्या आकडेवारीतून मिळत आहे. २०१३ पासून लॅम्बॉर्गिनीने दर वर्षी अधिकाधिक गाडय़ा विकून भारताला एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून विकसित केले आहे. २०१८ मध्ये लॅम्बॉर्गिनीच्या उरूस, अव्हेंटोडोर आणि हुराकान या तिन्ही मॉडेल्सच्या १,३०१ गाडय़ांची विक्री झाली. २०१९ मध्ये आत्तापर्यंत १,१८४ गाडय़ांची विक्री झाली असून हा आकडा वर्षांखेरीस वाढण्याचा कंपनीचा विश्वास आहे.

लॅम्बॉर्गिनीच्या हुराकान इवो स्पायडर या गाडीत सेव्हन स्पीड डय़ुअल क्लच ऑटोमॅटिक गियर बॉक्स आहे. वेग आणि ताकद हे कुठल्याही सुपर कारच्या श्रेष्ठतेचे मापदंड आहे. आणि लॅम्बॉर्गिनी ही जन्मापासूनच वेगाचा आणि सुपरकार चालवण्याचा थरार देण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. लॅम्बॉर्गिनीचे हेच रांगडेपण या गाडीच्या लोकप्रियतेचे गमक आहे. स्पायडर ही ० ते १०० किमी प्रति तास हे अंतर अवघ्या ३. १ सेकंदांमध्ये गाठते. तर ०-२०० किमी प्रतितास हे अंतर ९.३ सेकंदांमध्ये गाठते. गाडीचा टॉप स्पीड ३२५ किमी प्रति तास आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

लॅम्बॉर्गिनी हा जगातील प्रतिष्ठित कार ब्रँडपैकी एक असून हुराकान इवो स्पायडरला भारतीय बाजारपेठेत दाखल करून उद्योगाचा विस्तार करण्यास आम्ही प्रयत्नशील असल्याचे, आशिया पॅसिफिकमधील ऑटोमोबिली लॅम्बॉर्गिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅटिओ ओर्टेन्झी यांनी सांगितले. हुराकान इवो या श्रेणीला भारतात पदार्पण केल्यापासूनच ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

गाडी चालवण्याचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. डायनामिका वोइकोलो इंटेग्राटा या तंत्रज्ञानाचा वापर या गाडीत करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान गाडीच्या मेंदूप्रमाणे काम करते. रिअर व्हील स्टेरिंग आणि फॉर व्हील टॉर्क व्हेक्टरिंग प्रणाली हे केंद्रीय प्रक्रिया एककाद्वारे (सीपीयू) नियंत्रित केली जाते. एलडीव्हीआय यंत्रणा बाहेरील वातावरणानुसार चालकाच्या गरजेप्रमाणे सस्पेन्शन आणि ऑल व्हील ड्राइव्हमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे स्टेरिंग व्हील, वेग, गियर आणि ड्रायविंग मोड निर्धारित केले आहेत. त्या सर्व सेटिंगचे विश्लेषण करून त्यानुसार गाडी चालू असतानाच ड्रायव्हिंगमध्ये बदल केले जातात. हे यंत्रणा गाडीची प्रतिसाद क्षमता वाढवते असे  कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गाडीत स्ट्राडा, स्पोर्ट आणि कोरसा हे तीन मोड देण्यात आले आहेत. सामान्य रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी स्ट्राडा मोड, अधिक दमदार कार्यक्षमतेसाठी स्पोर्ट्स मोड, आणि रेसिंगचा अनुभव घेण्यासाठी कोरसा हा मोड देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हुराकान इवो स्पायडरमध्ये इलेक्ट्रॉनिक पावर स्टिअरिंग प्रणाली (ईपीएस) देण्यात आले आहे. या स्टिअरिंग प्रणाली कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हिंग शैलीनुसार स्वत:मध्ये बदल करते. या प्रणालीमुळे चालकाला गाडी चालवणे आणि तिच्या हाताळणीच्या क्षमतेचा फायदा घेण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. इवो स्पायडरमध्ये सुधारित एरोडायनामिक्स दिले आहेत. गाडीचे छत लागले असले किंवा छत खाली असले तरी गाडीच्या एरोडायनामिक्सवर कोणताच परिणाम होत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हुराकान एवो स्पायडरचे इंटिरियर इतर सुपरकार कुपे सारखे आहे. सीटला एलकांतारा आणि कार्बन स्किन देण्यात आली होती. डॅशबोर्ड आणि सीटसाठी वेगवेगळे लेदर मटेरियलदेखील उपलब्ध आहे. गाडीत ८.४ इंचांची इंफोटेन्मेंट यंत्रणा देण्यात आली आहे.  त्या सह मल्टिमीडिया सपोर्ट, स्मार्टफोन इंटिग्रेशन, वेब रेडिओ, व्हॉइस कमांड या सोयी गाडीत देण्यात आल्या आहेत. चालकाच्या ड्रायव्हिंग सुधारण्यासाठी टेलिमेन्टरी सिस्टीम अंतर्गत दोन कॅमेरेदेखील बसवण्यात आले आहेत. चार कोटींची भलीमोठी किंमत लावून बाजारात आलेली ही सुपरकार कंबरडे मोडलेल्या भारतीय मोटार बाजारात काय कमाल करते का ते पाहावे लागेल.

वैशिष्टय़े

  • नव्या हुराकान एवो स्पायडरमध्ये ५.२ लिटरचे व्ही १० इंजिन आहे. या इंजिनमधून
  • ८००० आरपीएम वर ६३० बीएचपी ऊर्जा निर्माण होते.
  • हुराकान एवोचे प्रतिरूप असलेली स्पायडर ओपन टॉप म्हणजे कन्व्हर्टेबल आहे.
  • वर्षांच्या सुरुवातीलाच लॅम्बॉर्गिनीने हुराकान इवो बाजारात दाखल केली होती.
  • हुराकान इवो श्रेणीतील या वर्षांतील हे दुसरे मॉडेल आहे.
  • गाडीची एक्स शोरूम किंमत ही ४.१ कोटी रुपये एवढी आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com