वैभव भाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटार क्षेत्रातील बहुतेक जाणकार पहिली सुपरकार असल्याचा बहुमान ‘म्युरा’ला देतात. वादग्रस्त का असेना परंतु पहिली सुपरकार निर्माण करण्याचे श्रेय लॅम्बॉर्गिनीलाच जाते. लॅम्बॉर्गिनी सातत्याने त्यांच्या खास शैलीत वेगाचा रांगडा आनंद देणाऱ्या सुपरकार बाजारात दाखल करीत आहेत.  परंतु अलीकडे लॅम्बॉर्गिनीने निर्माण केलेल्या गाडय़ांमध्ये थक्क करते ती ‘सेसटो एलेमेंटो’च.

सुपरकार हा मोटार विश्वातील जाणकारांसाठी सर्वाधिक कुतूहलाचा आणि मोटार कंपन्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय. शक्तिशाली इंजिन, अप्रतिम डिझाइन, आणि वेगाचा नवा पायंडा घालण्याचे काम या सुपरकार करीत असतात. सुपरकारची निर्मिती करताना कार कंपन्यांच्या डिझाइनिंग, अभियांत्रिकी आणि सुरक्षा यंत्रणेच्या कौशल्याची कसोटी लागते. सुपरकार हा शब्द एखाद्या कंपनीच्या मर्यादित संख्येत निर्माण केलेल्या मोटारी, बॉडी आणि इंजिनमध्ये बदल केलेल्या मोटारी यासाठी वापरला जातो, तर काही लहान मोटार कंपन्याही ग्राहकांना भुरळ पाडण्यासाठी आपल्या महागडय़ा गाडय़ांचा सुपरकार म्हणून उल्लेख करतात.

इंजिनची क्षमता वाढविण्यासाठी केले जाणारे बदल आणि डिझाइनमध्ये परिपूर्णता आणण्याचे काम इंजिनीअर करतच असतात. मोठय़ा प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यासाठी तेवढय़ा ताकदीचे इंजिन आवश्यक असते. वजनदार इंजिन सांभाळण्यासाठी गाडीचे मोनोकॉक, चॅसी,आणि बॉडी दणकट असणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी आणि गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी ८०च्या दशकात एक उपाय समोर आला तो कार्बन फायबरचा. गाडीचे काही भाग कार्बन फायबरने तयार केल्याने गाडीचे वजन कमी होते आणि गाडी अधिक दणकट होते. हे ८०च्या दशकातील रेसकार निर्मात्यांना कळून चुकले तेव्हापासून फाम्र्युला वन कारमध्ये आणि लेमान्स शर्यतींमध्ये भाग घेणऱ्या गाडय़ांमध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात येऊ लागला. त्यानंतर स्ट्रीट लीगल म्हणजे रस्त्यावर धावण्यासाठी मान्यता असणाऱ्या सुपरकारमध्ये कार्बन फायबरच्या वापरास सुरुवात झाली. याच कार्बन फायबरचा एक नायाब आविष्कार ‘लॅम्बॉर्गिनी’ने प्रोटोटाइप स्वरूपात जगासमोर आणला.

‘सेसटो एलेमेंटो’ या इटालियन शब्दांचे मराठीत भाषांतर होते ‘सहावा घटक’. आवर्त सारणीच्या तक्त्यातील (पिरिऑडिक टेबल) सहावा घटक म्हणजे कार्बन. या गाडीत कार्बन फायबरचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आल्याने हे नाव या गाडीला देण्यात आले आहे. लॅम्बॉर्गिनीने ही मोटार २०१०च्या पॅरीस ऑटो शोमध्ये जगासमोर आणली. लोकप्रिय मर्चिअलागेची जागा घेणारी कार लॅम्बॉर्गिनी बाजारात आणणार आहे, अशी त्या वेळी चर्चा होती. परंतु असे न करता पूर्णत: नवी कार बाजारात दाखल करीत लॅम्बॉर्गिनीने एक सुखद धक्का दिला. ही गाडी आकाराने गलार्डोसारखीच असली, तरी वजनाने केवळ ९९९ किलो एवढीच आहे. कारची बॉडी प्लास्टिक आणि कार्बनच्या मिश्रणातून तयार केली असून हे तंत्रज्ञान लॅम्बॉर्गिनी आणि बोइंगने मिळून विकसित केले आहे. हलक्या बॉडीमुळे आकारसमान असूनही सेसटो एलेमेंटोचे वजन गलार्डो एलपी५६०४ च्या दोनतृतीयांश एवढे आहे.

गाडीचे दमदार इंजिन, आकर्षक डिझाइन, भारावून टाकणाऱ्या वेगासह ३० कोटी रुपये ही चक्रावून टाकणारी किंमत मग आता प्रश्न राहतो तर या गाडीचे इंटिरिअर कसे? लॅम्बॉर्गिनीने वेगासाठी या गाडीत अकल्पित असा त्याग केला आहे. गाडीत बसल्यावर लक्झरी कारप्रमाणे मोठा टच डिस्प्ले, दणदणीत स्टिरीओ किंवा उच्च प्रतीचे लेदर डॅशबोर्डची अपेक्षा करत असाल तर नक्कीच तुमचा हिरमोड होणार. गाडीला डशबोर्ड नसून केवळ स्टेअिरग आणि त्यावर एक डिस्प्ले युनिट आहे. त्यामुळे या गाडीत बसल्यावर कोणालाही नॅसकार किंवा रॅली रेसिंग कारमध्ये बसल्याचा भास होईल. वाऱ्याच्या वेगाने जाणाऱ्या या गाडीत लोकांना हवा खाण्यासाठी वातानुकूलन यंत्रणादेखील नाही. आश्चर्य म्हणजे गाडीला सीट्सदेखील नाहीत. गाडीच्या मोनोकॉकध्ये सीट्ससाठी पोकळी बनविण्यात आली आहे. त्यावर चालक आणि बाजूला पॅसेंजरसाठी सीटकुशन लावण्यात आले आहेत. या साजाविनाही या सुपरकारचे गारूड लोकांच्या मनावर आहे. सेसटो बाजारात दाखल झाल्यावर तिच्या टेस्ट ड्राइव्हसाठी अनेक कार शो संचालक आणि मोटारतज्ज्ञांच्या उडय़ा पडल्या. बहुतेकांनी ही गाडी चालविण्याचा अनुभव अतूलनीय असल्याचा उल्लेख केला.

साहजिकच गाडीच्या डिझाइनमुळे रस्त्यावर चालविण्यासाठी या गाडीला परवानगी मिळणे कठीणच असल्याने ही केवळ रेसट्रकवरच पळवण्यास मान्यता आहे. परंतु लॅम्बॉर्गिनीच्या या प्रयत्नामुळे अशा प्रकारच्या मर्यादित संख्येने निर्माण होणाऱ्या सुपरकार आपल्याला कधीतरी रस्त्यावर धावतानाही दिसतील अशी आशा पल्लवित झाली आहे.

दमदार इंजिन

गलार्डो आणि सेसटोमधील अजून एक समानता म्हणजे त्यांचे इंजिन. ‘गलार्डो सुपरलेगेरा’चे इंजिन या गाडीसाठी वापरण्यात आले आहे. ५.२ लिटरचे व्ही १० इंजिन ५७० पीएस (५६२ हॉर्सपॉवर) आणि ५४० एनएम टार्क निर्माण करते. गाडीत ऑल व्हील ड्राइव्ह यंत्रणा आहे. सहा गेअरचे ट्रान्समिशन असणाऱ्या या कारची चॅसी, रिम्स आणि सस्पेंशनचे भाग कार्बन फायबरपासून तयार करण्यात आले आहेत. ही गाडी ० ते १०० किमी प्रतितास एवढा वेग केवळ २.५ सेकंदामध्ये गाठत असल्याचा दावा लॅम्बॉर्गिनीकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वजन ते ऊर्जा गुणोत्तर हे उल्लेखनीय १.७५ किलो प्रतिहॉर्सपावर एवढे आहे. तर ताशी ३३८ किमी हा या गाडीचा टॉपस्पीड आहे. वजन कमी असून ही सेसटोची रस्त्यावरील पकड मजबूत राहावी आणि गाडी चालविण्यास सोपी असावी यासाठी कंपनीने विशेष मेहनत घेतली आहे.

मर्यादित संख्या

२०११ ते २०१२ या काळात केवळ २० सेसटो एलेमेंटोची निर्मिती करण्यात आली असल्याने अतिशय दुर्मीळ सुपरकारपैकी ही एक आहे. या २० गाडय़ांची विक्रीदेखील झाली आहे.

२०१३मध्ये लॅम्बॉर्गिनीची विनेनो बाजारात दाखल झाली, तोपर्यंत सेसटो ही लॅम्बॉर्गिनीची सर्वात महागडी गाडी होती. तिची किंमत ४.५ दशलक्ष डॉलर म्हणजेच तीस कोटी रुपयांहून अधिक होती.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lamborghini sesto elemento car reviews
First published on: 28-07-2018 at 02:03 IST