News Flash

शिकविता भाषा, बोले कसा पाही!

चांगले मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच या मुलांचा भाषिक विकास चांगला होतो. कर्णाबधिर मुलांचा भाषाविकास होणे आवश्यक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अर्चना कोठावदे

मूल कर्णबधिर आहे म्हटल्यावर पालक त्याच्याशी अजिबात बोलत नाहीत. खाणाखुणांचा वापर वाढतो. मग कसा होणार भाषा विकास? एकदा का चांगले, भारी श्रवणयंत्र दिले की आपले काम झाले. चांगले मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच या मुलांचा भाषिक विकास चांगला होतो. कर्णाबधिर मुलांचा भाषाविकास होणे आवश्यक आहे.

सर्वसामान्य ऐकू येणारे मूल भाषा कशी शिकते? तर ऐकून. म्हणजे फक्त एक एक शब्द समोरून बोलला जाणार आणि मूल त्याची पुनरावृत्ती करणार. याला भाषा शिकणे असे म्हणत नाहीत. पुन्हा पुन्हा भाषा कानावर पडते, ती भाषा योग्य वेळी म्हणजेच घडणाऱ्या घटनेच्या वेळी किंवा घडणाऱ्या प्रसंगानुसार त्या मुलाच्या समोर येते, त्याच्या कानावर पडते, त्यातून त्याचा त्या मुलाला अर्थबोध होत असतो. यातही पुनरावृत्ती होत असते आणि नंतर मूल गरजेनुसार एक एक शब्द स्वत:हून बोलू लागते, याला भाषा शिकणे असे म्हणतात. ही भाषा शिकण्याची नैसर्गिक पत आहे.

जेव्हा मूल कर्णबधिर असते, तेव्हा त्याचा भाषा ऐकण्याचा अवयवच (कान) बाधित असतो. पण निरुपयोगी नसतो. प्रत्येक कर्णबधिर मुलात थोडय़ा न थोडक्या स्वरूपात उर्वरित श्रवणशक्ती असते. या उर्वरित श्रवणशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा. त्यासाठी कर्णबधिर मुलाची श्रवण चाचणी करून त्यास योग्य असणाऱ्या श्रवणयंत्राचा चांगला उपयोग होतो. आज तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की, बाजारात अनेक प्रकारचे श्रवणयंत्र उपलब्ध आहेत. फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते की, अशा परिस्थितीत पालक खूप गोंधळतात. त्यांना काय चांगले, काय बरोबर हे पटकन कळत नाही. कधी कधी कर्णबधिरांच्या भाषा विकासाविषयी जुजबी माहिती असणाऱ्या लोकांना या विकसित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची इतकी इच्छा होते की ते कल्पना करतात, एखादा बोलणारा रोबोट कर्णबधिरांच्या समोर ठेवला की, ते आपोआप भाषा शिकतील. इतके सोपे असते का ऐकू न येणाऱ्याला भाषा शिकवणे? आज कर्णबधिरांचे शिक्षक २५-३० वर्षांचा अनुभव असूनही वर सांगितल्याप्रमाणे तीन, चार वर्षे मुलावर मेहनत घेतात, तेव्हा मूल बोलून संपर्क साधण्याचा प्रयत्न करते.

मूल कर्णबधिर आहे म्हटल्यावर पालक त्याच्याशी अजिबात बोलत नाहीत. खाणाखुणांचा वापर वाढतो. मग कसा होणार भाषा विकास? एकदा का चांगले, भारी श्रवणयंत्र दिले की आपले काम झाले. आता मूल त्याचे त्याचे ऐकणार आणि त्याची भाषा आपोआप वाढणार असे नसते. अगदी लहान वयात म्हणजे वय वर्षे एकच्या आत योग्य यंत्र मिळाले, लगेच चांगले मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच त्या मुलाचा भाषिक विकास चांगला होतो. पण आपल्या देशात या सर्व बाबतीत हवी तशी जनजागृती झालेली नाही. जितकी लवकर या ‘कर्णबधिरत्व’ अपंगत्वाविषयी जनजागृती होईल, तितकी लवकर कर्णबधिरांची प्रगती होईल.

आपल्या मुलासाठी श्रवणयंत्र घेताना पालकांनी खूप घाई करू नये. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार यंत्र घ्यावे. कारण असेही अनुभव आले आहेत की, कधी कधी पालक घाबरून घरदार, जमीन विकून टाकतात. मग सगळीच परिस्थिती खालावते. मुलांनाही वेळ देऊ  शकत नाहीत. मग त्या श्रवणयंत्राचा काहीच उपयोग नाही. मुलाला यंत्र लावून त्याच्याशी खूप बोलायला हवे. यंत्र कोणत्याही कंपनीचे असले तरी चालेल, पण त्या यंत्राची चार दिवस चाचणी घ्यायला हवी. चार दिवस पूर्ण वेळ यंत्र लावून मुलाला ऐकवण्याचा प्रयत्न करावा. यंत्र घेताना दोन प्रकारे विचार केला जाऊ शकतो.

याआधी मुलाने कधीच श्रवणयंत्र लावले नसेल तर..

असे असेल तर मुलाला आधी श्रवणयंत्र लावण्याचा अनुभव द्यायला हवा. अशा वेळी कधी कधी मूल सुरुवातीला खूप वेळ यंत्र लावायला तयार नसते. त्याला यंत्र लावून आवाज ऐकवायला हवा. आवाजाची ओळख द्यावी लागते. त्याला वेगवेगळे आवाज ऐकवावे लागतात. मूल आवाज ऐकते की नाही ते बघायचे. आवाज ऐकवताना त्याच्या मागे उभे राहून ऐकवावे. किंवा मूल तुमच्या तोंडाकडे बघणार नाही किंवा जे साधन वाजवायचे आहे ते तो वाजवताना बघणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. वेगवेगळे आवाज ऐकवल्यावर ते इकडे-तिकडे बघते का? किंवा वेगळ्या एखाद्या प्रकारे प्रतिसाद देते का, याचे निरीक्षण करायला हवे. मुलांचे प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. बाबाबा.., काकाका.. आणि पक्षी, प्राणी यांचे आवाज तोंडाने काढून ऐकवा. हे सर्व जर तो करत असेल तर पुढची पायरी म्हणजे आपण आणि मूल यांच्यातील थोडे अंतर  वाढवून बघायचे. असा प्रतिसाद मिळत असेल तर ते यंत्र त्याच्यासाठी योग्य आहे, असे समजू शकतो.

याआधी मुलाला श्रवणयंत्रामधून ऐकण्याची सवय असेल तर..

अशा वेळी मुलांना कधी कधी या नवीन श्रवणयंत्राने ऐकण्याची सवय व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. पण मुले यंत्राची सवय असल्या कारणाने यंत्र पूर्ण वेळ लावायला तयार असतात. मूल आधीच्या यंत्राने ऐकू शकत असलेल्या सर्व गोष्टी त्याला ऐकवाव्यात. अर्थातच मुलाच्या भाषिक विकासाच्या पातळीनुसार. नंतर त्याला जो भाग आधी ऐकू येत नव्हता तो ऐकवून बघावा. आधीपेक्षा काही वेगळे भाषेतील नवीन बारकावे त्याला समजतात का, किंवा जे तुम्हाला अपेक्षित आहे ते पुन्हा पुन्हा ऐकवावे आणि छोटी छोटी चाचणी घ्यावी. सरावाने तो ऐकू शकतो का ते तपासावे. अशा प्रकारे यंत्र योग्य आहे की नाही हे आपण ठरवू शकतो.

जेव्हा श्रवणयंत्र घेतात तेव्हा ते यंत्र कसे वापरावे, त्या यंत्राची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जाते. त्याप्रमाणेच यंत्र हाताळावे. एकदा का कर्णबधिरत्वाचे निदान झाले की, त्याला योग्य यंत्र मिळणे आवश्यक असते. यंत्र लावल्यानंतर पालकांनी आपल्या मुलाचा जन्म झाला असे समजावे आणि प्रत्येक सर्वसामान्य ऐकू येणाऱ्या बाळाच्या आईप्रमाणे त्या मुलाशी बोलावे. सतत बडबड करत राहावे. असे एक ते दीड वर्ष झाल्यावर त्याची बडबड सुरू होते. तेव्हा पालकांनी आपले काम बरोबर चालले आहे, असे समजावे. हे करताना पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. आवाज ऐकण्याकडे त्याचे लक्ष वेधावे. आवाज ऐकण्याची सवय लागल्यावर ती बाळ बडबड शब्दांवर आणावी. मुलांनाही शब्दात बोलण्यास मार्गदर्शन करावे. असे हळूहळू वाक्यांवर आणावे. मग त्या वाक्यांचा अर्थ समजून घेणे, योग्य वेळी योग्य ते वाक्य बनवणे व वापरणे, हे मुलांना शिकवायला हवे. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे हे सर्व करताना कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा, चिडचिड किंवा जबरदस्ती मुलांवर होणार नाही, याची काळजी घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 12:11 am

Web Title: language development of deaf children abn 97
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : ज्वारी उपमा
2 योगस्नेह : आकर्ण धनुरासन
3 आजारांचे कुतूहल : कार्पल टनेल सिंड्रोम
Just Now!
X