18 November 2019

News Flash

भाषाज्ञान अ‍ॅपवर

सध्या मोबाइलवर असे अनेक अ‍ॅप आले आहेत जे वेगवेगळय़ा भाषांचे शिक्षण, उच्चार, व्याकरण यांचे ज्ञान देतात.

‘भाषा शुद्ध नसेल तर विचारही दूषित बनतात’ असे म्हटले जाते. वाचन आणि सातत्याने लिखाण केल्याने भाषा शुद्ध होते. परंतु, अलीकडच्या काळात तरुण पिढीचा जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर व्हिडीओ पाहण्यात किंवा गाणी ऐकण्यात जातो. त्यामुळे त्यांचे भाषाज्ञानही कमकुवत होत चालले आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी, भाषेचे योग्य ज्ञान असणे आवश्यकच असते. शुद्धलेखन, व्याकरण यांचे योग्य ज्ञान असले की भाषेत आपोआप गोडी निर्माण होते. विशेष म्हणजे, हे करण्यासाठी तुम्हाला जाडजूड पुस्तकांचा आधार घेण्याची गरज नाही. सध्या मोबाइलवर असे अनेक अ‍ॅप आले आहेत जे वेगवेगळय़ा भाषांचे शिक्षण, उच्चार, व्याकरण यांचे ज्ञान देतात. अशाच काही अ‍ॅपविषयी..

‘शुद्धलेखन ठेवा मोबाइलमध्ये’

प्रत्येकास आपल्या भाषेची लिपी, तिचे उच्चार, लेखन यासंबंधीचे किमान प्राथमिक स्वरूपाचे तरी ज्ञान असले पाहिजे. हे ज्ञान नसेल, तर भाषेतील शब्दांचे उच्चारण व लेखन यात चुका होतात. आपण जे लिहितो ते शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले आहेत. यांनाच शुद्धलेखनाचे नियम असे आपण म्हणतो. ज्यांना शब्दांचा वापर योग्यरीत्या करून खरोखर शुद्ध भाषेत लिहायचे आहे, अशांसाठी ‘शुद्धलेखन ठेवा मोबाइलमध्ये’ हे नवे अ‍ॅप उपलब्ध झाले आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वर्षे काम करणारे व्याकरणाचे अभ्यासक अरुण फडके यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या अ‍ॅपमध्ये तब्बल अकरा हजार मराठी शब्दांची माहिती दिली आहे. ऱ्हस्व किंवा दीर्घ, विसर्ग असणे किंवा नसणे, लेखनसाम्य असले तरी अर्थभिन्नता असणे, योग्य पर्यायी लेखन असणे अशा अनेक प्रकारच्या शब्दांची माहिती अ‍ॅपमध्ये ठळकपणे सांगण्यात आली आहे. ज्या शब्दांचे लेखन हमखास चुकते, अशा शब्दांची यादीही दिली आहे. तसेच हे शब्द लिहिताना का चुकतात, याचे स्पष्टीकरणही यात आहे. या ‘अ‍ॅप’मध्ये तुम्ही तुमचा शब्द लिहायला सुरुवात करताच त्यानुसार खाली त्या अनुषंगाने शब्द यायला सुरुवात होईल आणि काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य लेखन, सामान्यरूपे, असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्यक त्या बाबींसह समोर येईल.

‘फायरफॉक्स’मध्ये शुद्धलेखन चिकित्सा

केवळ अ‍ॅपच नव्हे तर इंटरनेट ब्राऊजरमध्येही तुम्ही शुद्ध शब्द जाणून घेऊ शकता. ‘फायरफॉक्स’या ब्राऊजरमध्ये मराठी डिक्शनरीचे ‘अ‍ॅड ऑन’ जोडून घेऊन तुम्ही मराठीतून टाइप केलेल्या मजकुरात काही शुद्धलेखनाच्या चुका आहेत का, हे तपासून पाहू शकता. हे अ‍ॅड ऑन मिळवण्यासाठी ँ३३स्र्२://ंल्लि२.े९्र’’ं.१ॠ/ील्ल-वर/ऋ्र१ीऋ७/ ंल्लि/ 12797 या लिंकवर जावे लागेल. ‘अ‍ॅड ऑन’ करताच तुम्ही टाइप केलेल्या मजकुरातील अशुद्ध मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. या शब्दांवर राइट क्लिक करून तुम्हाला योग्य शब्दाची निवड करता येईल. एखादा शब्द योग्य असूनही तो लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द तुम्ही आपल्या व्यक्तिगत संग्रहात ‘अ‍ॅड टू डिक्शनरी’ हा पर्याय वापरून जमा करू शकता.

‘कल्चरअ‍ॅली’

बहुसंख्य लोकांना एखादी तरी परदेशी भाषा शिकायची इच्छा असते. पण आपल्या वेळेनुसार निवांतपणे भाषा शिकण्याची फारशी साधनंच उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी येतात. यावर  उपाय म्हणून जयपूरस्थित निशांत पटणी आणि प्रांशू भंडारी नावाच्या तरुण इंजिनीअर जोडप्याने इंग्रजी शिकविणाऱ्या ‘कल्चरअ‍ॅली’ नामक अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे वेगवेगळय़ा परदेशी भाषा शिकता येतात. वापरकर्त्यांनी  ‘कल्चरअ‍ॅली’त एकदा लॉग इन केलं की ट्विटर तसंच फेसबुकवरच्या न्यूजफीडमध्ये त्या भाषेतले शब्द टाकले जातात. यामुळे विद्यार्थी भाषा जास्त चांगल्या प्रकारे जाणून घेऊ  शकतो. फेसबुकवर ब्राऊझिंग करतानाही तो भाषेच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे त्या भाषेत संवाद साधणं सोपं होऊन जातं.

जॉनी ग्रामर वर्ड चॅलेंज

ब्रिटिश कौन्सिलच्या या अ‍ॅपमध्ये इंग्रजी शब्द, उच्चार, स्पेलिंग आणि व्याकरण यांची माहिती दिली आहे. प्रत्येकात एका मिनिटात जास्तीत जास्त किती प्रश्न तुम्हाला सोडवता येतात हे बघणारा खेळ आहे. व्याकरणातील बारा वेगवेगळ्या पाठांवरील प्रश्नमंजूषा यात आहेत. वर्ड्स या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे शब्द ओळखायचे असतात. तसेच स्पेलिंग या विभागात लिहिताना हमखास चुकणाऱ्या स्पेलिंगपैकी योग्य स्पेलिंग निवडायचे असते. एखाद्या  प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडून पुढील प्रश्नावर जाता येते. या अ‍ॅपमधील प्रश्नमंजूषा सोडवताना तुम्ही लॉगिन केले असेल तर तुमचा स्कोर लीडर बोर्डवर पोस्ट करू शकता.  तो स्कोर फेसबुकवरही  शेअर करण्याचा पर्याय आहे.

लॅबस्टर्झ इंग्लिश ग्रामर टेस्ट

हे टू इन वन इंग्लिश लर्निग अ‍ॅप आहे. यात इंग्रजी भाषेतील काही मूलभूत गोष्टी शिकायला मिळतील. जसे की अवतरण चिन्हांचा वापर, घडय़ाळातील वेळ सांगण्याची योग्य पद्धत,  याशिवाय १८ भागांत विभागलेले व्याकरणाचे पाठ शिकायला मिळतात. तसेच व्याकरणाच्या पाठांवर आधारित असलेल्या २० प्रश्नमंजूषा येथे उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षांमधे रुची असलेल्यांसाठी येथे टेस्ट दिल्यावर गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशी डिजिटल पदके प्रदान केली जातात.

सेव्हन लिंक्स इंग्लिश ग्रामर टेस्ट

या अ‍ॅपमध्ये व्याकरणाचे २० वेगवेगळ्या पाठांत विभाजन केले आहे आणि प्रत्येक पाठात ३० प्रश्न आहेत. तसेच सर्व पाठांवर आधारित मिश्र प्रश्नमंजूषादेखील आहेत. प्रश्नमंजूषा सोडवून झाल्यावर किती उत्तरे बरोबर आली, किती चुकली आणि किती सोडून दिली याचे प्रगतिपत्रक दिसते. चुकलेल्या प्रश्नांचे अतिशय सोप्या शब्दांत स्पष्टीकरण दिले जाते.

– प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on July 11, 2019 1:09 am

Web Title: language learning apps on mobile mobile app to learn a language zws 70
Just Now!
X