सध्या अनेक जण संगणक संचाऐवजी लॅपटॉपचा वापर करतात. कुठेही, कसेही नेता येत असल्याने हे ‘स्मार्ट’ उपकरण वापरणे पसंद केले जाते. लॅपटॉप विकत घेताना त्याचा ब्रॅण्ड, किंमत, डिस्प्ले, प्रोसेसर या सर्व गोष्टी पाहिल्या जातात, मात्र लॅपटॉप घेतल्यानंतर त्याची काळजी घेताना दुर्लक्ष केले जाते.

* लॅपटॉपची धुळीपासून काळजी घेतली पाहिजे. लॅपटॉपच्या आतील चीप, प्रोसेसर आदी महागडय़ा भागांना धुळीपासून धोका पोहचू शकतो. त्यामुळे नियमित लॅपटॉपची साफसफाई करा.

* लॅपटॉप साफ करताना थेट क्लीनिंग सोल्यूशनचा वापर नको. एखादे सुती कापड किंवा स्पंजवर सोल्यूशनचे काही थेंब टाकून हलक्या हाताने लॅपटॉप साफ करावा.

* लॅपटॉप साफ करताना वीजपुरवठय़ासाठी त्याला जोडलेले अ‍ॅटॅचमेंट काढून मगच तो साफ करा.

* काही खाताना किंवा पिताना लॅपटॉपवर काम करू नका. खाद्यपदार्थाचे किंवा चहा-कॉफी यांसारख्या पेयांचे डाग लॅपटॉपवर लागू शकतात. असे डाग पडल्यास तात्काळ साफ करा.

* लॅपटॉपची स्क्रीन काळजीपूर्वक साफ करा. सुक्या, मायक्रोफायबर कपडय़ाचा वापर करून स्क्रीन साफ करावी.

* लॅपटॉपचा की-बोर्ड आणि कडेच्या बाजूंच्या सफाईसाठी ब्रशचा किंवा मायक्रोफायबर कपडय़ाचा वापर करा.

* लॅपटॉपवर काम करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. कारण हाताला लागलेली धूळ, चिकटपणा किंवा तेलकटपणा यांमुळे लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते.

*प्रवासात किंवा बाहेर घेऊन जाताना लॅपटॉपची विशेष काळजी घ्या. शक्यतो लॅपटॉप बॅगचा वापर करा आणि लॅपटॉप नेहमी सुरक्षित जागी ठेवा.