News Flash

घरातलं विज्ञान : शिसेविरहित शिसपेन्सिल

घर्षणाचा उपयोग खडूने फळ्यावर लिहितानादेखील होतो. खडू हा कॅल्शिअम काबरेनेटपासून बनलेला मृदू सच्छिद्र पदार्थ आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुधा मोघे-सोमणी,

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

जून महिना आला की दोन महिन्यांची शाळा/कॉलेजची सुट्टी संपून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. नवीन शैक्षणिक वर्ष व त्यासाठी उत्साहाने केलेली वह्या-पुस्तक, पेन्सिल – पेन ही खरेदी घरोघरी चालूी असते. आजच्या लेखात आपण लिहिण्यासाठी आवश्यक असलेले पेन्सिलविषयी जाणून घेणार आहोत.

पेन्सिल म्हटली की, शिसपेन्सिल असे अगदी सर्रास म्हटले जाते. वस्तुत: कोणत्याही पेन्सिलमध्ये शिसे कधीच नसते व नव्हते. सन १५६५ मध्ये ग्रॅफाइटचे मोठे साठे इंग्लंडमध्ये सापडले. कागदावर हा ग्रॅफाइट उत्तमरीत्या उमटत होता म्हणून ह्याचा वापर पेन्सिलमध्ये करण्यात आला. त्या काळी रसायनशास्त्र प्रगत नव्हते व सापडलेला खनिजसाठा शिसे Lead असावा, असे समजले गेले. ग्रॅफाइट हा कार्बनचा अपरूप आहे व अतिशय मृदू आहे. त्यामुळे जरी कागदावर चांगल्या प्रकारे उमटत असला तरी मृदू असल्याने ह्याला आवरणाची गरज आहे हे लक्षात आले. मग दंडगोलाकार किंवा षटकोनी आकाराच्या लाकडी आवरणामध्ये ग्रॅफाइट असलेली पेन्सिल बाजारात आली व शिसपेन्सिल असा शब्द वापर रूढ झाला. ग्रॅफाइटने कागदावर लिहिताना घर्षणामुळे ग्रॅफाइट झिजते व त्याचे कण कागदाला चिकटून राहतात. रंग काळा असल्याने ही अक्षरे/चित्र उठून दिसतात.  केवळ ग्रॅफाइट असलेली ही पेन्सिल खूप लवकर झिजते व त्यासाठी घन ग्रॅफाइटची गरज भासते.

अशा प्रकारचे ग्रॅफाइटचे साठे केवळ ब्रिटेनकडे होते. नेपोलियनच्या काळात (इ.स.१८०० ते १८१५) फ्रान्सला ते निर्यात करण्यावर बंदी होती. ह्या परिस्थितीवर मात करण्याकरिता नेपोलिअनच्या एका सैन्य अधिकाऱ्याने तोडगा शोधून काढला. त्याने उपलब्ध असलेली ग्रॅफाइटची पूड व माती (clay) ह्याचे मिश्रण तयार करून भट्टीत भाजले. अशा प्रकारे जगातील पहिली एचबी (HB) पेन्सिल तयार झाली. माती (clay) मुळे ग्रॅफाइटचा मृदूपणा कमी होऊन त्याला एक काठिण्य प्राप्त झाले. पुढे ग्रॅफाइट व मातीचे प्रमाण कमी-जास्त करून एचबी, एच, बी अशा विविध प्रकारच्या पेन्सिली तयार करण्यात आल्या. मातीचे प्रमाण वाढवल्यास काठिण्य वाढते पण त्याचबरोबर काळ्या रंगाचा गडदपणा कमी होतो. कलाकार, अभियंते, गणितज्ञ यांना त्यांच्या गरजेनुसार विविध पेन्सिली उपलब्ध झाल्या. यातील ‘एच’ म्हणजे ‘हार्ड’ अर्थात कठीण तर ‘बी’ म्हणजे ‘ब्लॅक’ अर्थात काळा. अशा प्रकारे ९बी, ८बी, एचबी, १एच, ९एच अशा विविध वापरासाठीच्या विविध प्रकारच्या शिसपेन्सिली बाजारात आल्या. हे टोक जरी ग्रॅफाइट व माती यांच्या मिश्रणाचे बनले असले तरी शिसपेन्सिल असा रूढ झालेला शब्द वापर आजही कायम आहे.

घर्षणाचा उपयोग खडूने फळ्यावर लिहितानादेखील होतो. खडू हा कॅल्शिअम काबरेनेटपासून बनलेला मृदू सच्छिद्र पदार्थ आहे. खडबडीत असलेल्या काळ्या फळ्यावर खडूने लिहिल्यास खडूचे कण फळ्याला चिकटतात. ग्रॅफाइटचे कण कागदाला चिकटतात त्यापेक्षा खडूचे कण फळ्याला कमी घट्टपणे चिकटतात. या कारणास्तव फळा पुसल्यास लगेच स्वच्छ होतो. तुलनेने पेन्सिलीने कागदावर लिहिलेले अक्षर पुसणे सोपे नसते. यासाठी रबरचा बनलेला खोडरबर (Eraser) चा वापर होतो. १७७० साली खोडरबरचा शोध लागला. रबर टिकावे म्हणून त्यात गंधक (Sulphur) व लवचीक राहावे म्हणून वनस्पतीजन्य स्निग्ध पदार्थ मिसळतात. अक्षरे खोडताना खोडरबर कागदाच्या पृष्ठभागाच्या तंतूंवर घासला जातो व चिकटलेले ग्रॅफाइटचे कण कागदापासून सुटे होतात. वनस्पतीजन्य स्निग्ध पदार्थामुळे कागद फाटत नाही. रबरातील चिकटपणामुळे ग्रॅफाइटचे कण त्याला चिकटतात. काही प्रमाणात रबरला चिकटलेले ग्रॅफाइटचे बारीक कण कागदावर राहतात. खोडून झाल्यावर आपण कागद झटकून साफ करतो तेव्हा ते कण आपण बाजूला करीत असतो.

पेन्सिलने केलेले लिखाण हळूहळू पुसट होत जाते. ह्याचे कारण घर्षणामुळे कागदाला चिकटलेले ग्रॅफाइटचे कण जसा काळ जाईल तसे कागदापासून वेगळे होतात व अक्षरांचा गडदपणा कमी होतो. यावर उपाय म्हणून आपण पेन वापरतो. पुढील लेखात आपण पेन व त्याचे विविध प्रकार याविषयी चर्चा करूयात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 12:11 am

Web Title: lead pencil school abn 97
Next Stories
1 ऑफ द फिल्ड : चाहत्यांचा रुद्रावतार! 
2 धाक नको, दक्षता घ्या..
3 स्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा
Just Now!
X