बाजारात काय? : सुहास धुरी

घर, कार्यालयाचे सौंदर्य वाढविणाऱ्या, उपयोगात येणाऱ्या अनेक नवनवीन वस्तू बाजारात येत असतात.  यामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंना मोठी मागणी असते. सण, उत्सव असले की या वस्तूंनी बाजारपेठ फुलून जाते. बाजारात येणाऱ्या अशा काही वस्तूंचा माहितीपूर्ण आढावा ‘बाजारात काय’ या पाक्षिक सदरातून घेण्यात येणार आहे.

प्रदूषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. मग ती ध्वनी, जल असो किंवा वायू वा इतर या प्रदूषणातून सुटका होण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. यातील वायुप्रदूषण तर धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.  श्वसनाच्या आजाराने माणूस बेजार झाला आहे. दुर्लक्षित होणाऱ्या घरांतील, कार्यालयांतील हवाप्रदूषणही त्याला मारक ठरू लागले आहे. घरात पाणी उकळून व गाळून प्या हा डॉक्टरी सल्ला आता हवेच्या बाबतही लागू होत आहे. त्यासाठी हवा शुद्ध करणाऱ्या यंत्राचा वापर करणे प्रत्येक कुटुंबाची गरज झाली आहे. अनेक कंपन्यांनी अशी हवा शुद्धीकरण उपकरणे बाजारात आणली आहेत. यामध्ये एमआय एअर प्युरिफायर, फिलिप्स, डेसन इंडिया, कोवे सिल्क, हनीवेल आदी कंपन्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो.

‘एअर प्युरिफायर’ हे घरगुती वापरासाठी हवा शुद्धीकरण करणारे यंत्र म्हणून त्याकडे पाहिले जाते. इंटेलिजेंट ऑटो प्युरिफिकेशन मोड आणि स्मार्ट सेन्सिंग अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करून हे यंत्र तयार करण्यात येते. हे हवा शुद्धीकरण यंत्र विशेषत: मुले आणि प्रौढांमध्ये दमा आणि अ‍ॅलर्जीची लक्षणे कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे, असा कंपन्यांचा दावा आहे. एकदा बटन सुरू केले की ते स्वंयचलित होते. ते ऑटो मोडमध्ये केल्यावर हवेमध्ये जसजसे बदल होतात तशी त्याबद्दलची प्रतिक्रिया हे यंत्र देत असते. त्यासाठी काही कंपन्यांनी चार रंगाचे सूचना दर्शक इंडिकेटर्स दिले आहेत. जे चांगले आणि वाइटाचे प्रमाण दर्शविते.  या यंत्रामुळे हवेतील धुळीसारख्या प्रदूषित घटकांवर नियंत्रण आणता येते इतकेच नव्हे, तर ते दूषित घटक दूर करता येतात. हवेतील प्रदूषण नियंत्रणासह पीएम २.५ मायक्रोमीटर आकाराचे हवेमध्ये असलेले धूळीचे कण जे आरोग्याला घातक असतात तसेच वाहनांतील कार्बन उत्सर्जनासह सूक्ष्म आकाराचे म्हणजे ०.००३ मायक्रॉन इतक्या आकाराचे हवेतील प्रदूषक घटकही हे यंत्र काढू शकते

हे यंत्र ३५० ते ५३२  हून अधिक चौरस फुटांच्या घरात, कार्यालयात कोणत्याही कोपऱ्यात सहज ठेवता येते. हे यंत्र नवीन थ्रीडी एअर सक्र्युलेशन सिस्टमद्वारे तयार करण्यात आले आहे, जे १५ ते २० मिनिटांपेक्षा कमी वेळात जलद आणि कार्यक्षमरीत्या हवेचे शुद्धीकरण करते. ९९.९५ टक्के हवेतील अशुद्ध घटक काढण्याची या यंत्राची क्षमता आहे.

कंपन्या आणि त्यांची वैविध्यपूर्ण हवा शुद्धीकरणे यंत्रे यांच्या किमती वेगवेगळय़ा असतात. मात्र, सर्वसाधारणपणे पाच हजार रुपयांपासून ३५ हजार रुपयांच्या श्रेणीत ही यंत्रे उपलब्ध होतात.

वैशिष्टय़े

  •  हवेतील ०.००३ मायक्रॉन इतक्या आकाराचे हवेतील प्रदूषक घटक काढणे शक्य
  •  ९९.९५ टक्के हवेतील अशुद्ध घटक दूर करणे
  •  १६ मिनिटांपेक्षा कमी वेळात हवेचे शुद्धीकरण
  • आवाजावर पूर्णपणे नियंत्रण

suhas.dhuri@expressindia.com