15 August 2020

News Flash

शहराएवढा एक छोटा देश

भारताचा स्वातंत्र्य दिन जसा १५ ऑगस्ट रोजी साजरा होतो, तसा लिच्टेन्स्टाईनचा स्वातंत्र्य दिनही १५ ऑगस्ट रोजीच असतो.

(संग्रहित छायाचित्र)

विजय दिवाण  

एखादा देश छोटा असावा म्हणजे किती छोटा असावा? लिच्टेन्स्टाईन् नावाचा युरोपातला एक देश हा केवळ १६० चौरस किलोमीटर एवढय़ाच क्षेत्रफळाचा आहे. हा छोटासा देश ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या इतर दोन देशांच्या मधोमध वसलेला आहे आणि जगातल्या सर्वात छोटय़ा सहा देशांपैकी तो एक आहे.

आपल्याकडे आपले राहते शहरसुद्धा युरोपातल्या छोटय़ा देशांपेक्षा मोठे असते. असा हा छोटा लिच्टेन्स्टाईन् देश एकूण ११ छोटय़ा छोटय़ा शहरांचा आहे. त्यातील सर्वच्या सर्व अकरा शहरांची एकत्रित लोकसंख्या अवघी ३८ हजार एवढीच आहे. पण तरीही हा देश जगातला एक महाश्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. जर्मन भाषा ही या देशाची अधिकृत भाषा आहे. त्याचे वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्न हे आज अमेरिकेपेक्षाही दुप्पट आहे. या देशात गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. लिच्टेन्स्टाईन् आता संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्यही झाला आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन जसा १५ ऑगस्ट रोजी साजरा होतो, तसा लिच्टेन्स्टाईनचा स्वातंत्र्य दिनही १५ ऑगस्ट रोजीच असतो. यंदाच्या २०१९ या वर्षी त्यांचा ३०० वा वर्धापन दिन होता. तो तिथे नुकताच साजरा झाला.

युरोपातला हा छोटेखानी देश मुळात निर्माण कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे. हा सारा प्रदेश पूर्वी ऑस्ट्रिया या देशात होता. तिथे व्हिएन्ना शहरातल्या काही कर्त्यां राजपुरुषांनी इसवी सन १६९९ ते १७१२ या काळात दक्षिण ऑस्ट्रियाच्या ‘वडूझ’ आणि ‘शेलेनबर्ग’ परगण्यांतील साऱ्या जमिनी खरेदी  केल्या. त्या काळी तिथे हिज होली हायनेस चार्ल्स (६ वा) या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या एका नव-रोमन सम्राटाचा अंमल होता. त्या सम्राटाने १७१९ साली वरील दोन्ही परगण्यांना एकत्र करून त्यांचे लिच्टेन्स्टाईन् हे एक नवे छोटे राष्ट्र निर्माण केले. तिथल्याच वडूझ नावाच्या एका मध्यम शहराला त्याने त्या नव्या देशाच्या राजधानीचा दर्जा दिला आणि त्या जमिनींचा मालक असणाऱ्या व्हिएन्नाच्या राजपुरुषास तिथला राजा म्हणून घोषित केले. त्याच पहिल्या राजाचा सध्याचा वारस हिज हायनेस प्रिन्स हॅन्स-अ‍ॅडम् (दुसरा) हा आज तिथल्या राजपदावर विराजमान असून, त्याने स्वत:च्या कारकीर्दीत या शांत, स्वच्छ आणि निसर्गसुंदर देशाला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले आहे. तिथला सध्याचा हा राजा मोठा रसिक आहे. नुकत्याच साजऱ्या झालेल्या या देशाच्या ३०० व्या वर्धापनदिनी त्या राजाने वर्धापन समारोहाच्या निमित्ताने अख्ख्या देशातील नागरिकांना स्वत:च्या किल्ल्यावर बोलावून त्यांना जंगी वाईन पार्टी दिली होती, असे लोक सांगतात.

या छोटेखानी देशाची राजधानी ‘वडूझ’ प्रेक्षणीय आहे.

आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेल्या या देशाला अप्रतिम निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेली आहे. त्यासोबतच इथे चित्रकला आणि मूर्तिकलेचा वारसाही जपला गेला आहे. वडूझ या राजधानीच्या शहरात असणाऱ्या किल्ल्याच्या परिसरात एक अप्रतिम कला-संग्रहालय साकारण्यात आले आहे. त्यात गेल्या ४०० वर्षांपूर्वीपासूनच्या रुबेन्स, रॅफेल, डाईक, रॅमब्रॉन् अशा श्रेष्ठ कलाकारांची चित्रे, रंगचित्रे, शिल्पे अशा कलाकृती संग्रहित केलेल्या आहेत. तसेच तिथे एक ऐतिहासिक संग्रहालयदेखील आहे. त्याशिवाय इथल्या बाल्झर्स नामक एका गावात छोटय़ा टेकडीवर बांधलेला गटेनबर्ग कॅसल नावाचा आणखी एक किल्लाही पाहण्याजोगा आहे. पर्यटकांसाठी इथे अवतीभोवतीच्या डोंगरांतून ट्रेकिंग किंवा स्कीइंग करणे, जुने किल्ले आणि संग्रहालये पाहणे, पारंपरिक पॉटरी आणि वाईनरी प्रतिष्ठाने पाहणे आणि एकंदरीतच आल्प्स पर्वतरांगांचे अद्वितीय सौंदर्य पाहणे, या गोष्टी मनसोक्त करता येऊ  शकतात.

उद्योग, व्यवसाय

आज हा छोटासा देश युरोपातला एक समर्थ औद्योगिक देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. अनेक मोठय़ा कॉर्पोरेट उद्योगसमूहांनी आणि छोटय़ा उद्योजकांनी या देशात उत्पादन सुरू केले आहे. इथे तयार झालेल्या सिरॅमिकच्या कृत्रिम दातांना साऱ्या जगभरातून मागणी असते. तसेच या देशात द्राक्ष बागायती आणि वाईन उद्योगासाठी योग्य असे हवामान आहे. इथे तयार केल्या जाणाऱ्या रिजलिंग, मरलोव् किंवा झ्वायगेल्ट यांसारख्या वाईन्स संपूर्ण युरोपात निर्यात होतात.

vijdiw@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 12:16 am

Web Title: liechtenstein small country europe abn 97
Next Stories
1 डोनेर कबाब
2 टेस्टी टिफिन : मॅगी सँडविच
3 शहरशेती : अभिवृद्धी
Just Now!
X