|| किन्नरी जाधव

बॉलीवूडमधील कलाकारांनी समाजमाध्यमांवर फिटनेस मंत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि शारीरिक तंदुरुस्तीला एक वेगळे वलय प्राप्त होऊ लागले. जॅकलिन फर्नाडिस, करिना कपूर यासारख्या अभिनेत्री ‘इन्स्टाग्राम’वर अनेकदा व्यायामाच्या चित्रफिती, छायाचित्रे प्रसिद्ध करीत असतात. व्यायाम करून शरीर तंदुरुस्त बनवायचे आणि जिममधले छायाचित्र ‘वर्कआऊट पॅशन’, ‘डिड यू रन टुडे’ असे करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करायचे, हा तंदुरुस्ती प्रसिद्धीचा नवा ट्रेंड अलीकडे रुळत आहे. आपली तंदुरुस्ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक अनोखी इच्छा असावी किंवा व्यायामाची उमेद पाहून इतरांनीही त्याविषयी सजग व्हावे, हा त्यामागे हेतू असावा. मॅरेथॉन धावणे असो, शहरातील निसर्गरम्य परिसरात खासगी प्रशिक्षकांकडून व्यायामाचे धडे गिरवणे असो. तरुणांचा तंदुरुस्त होण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

तरुणांची धाव कुठंवर? तर फास्ट फूड, मॉल आणि मद्य ठेवलेल्या टेबलांपर्यंत!

हे वर्णन तसे नेहमीचेच. पण आता वस्तुस्थिती तशी राहिलेली नाही. तरुण तंदुरुस्त होतायत. शरीर कमवायचेच, पण त्याबरोबर मानसिक आरोग्यही संतुलित ठेवण्याचा तरुणांचा कार्यक्रम आहे. तरुणवर्गात  याविषयी सतर्कता आली आहे. बाजारात आलेली नवनवीन ब्रँडची व्यायामाची उपकरणे त्यासाठी ते घरी आणीत आहेत. तरुणाईची ही वाट शरीरसंपदा कमावण्यासाठी आहेच, याशिवाय व्यायामातून सौंदर्य खुलविण्याचा राजमार्गही यात दडलेला आहे..

व्यायाम हेच ध्येय झाले

शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम, योगासने सजग व्यक्तींकडून हमखास उपयोगात आणले जातात. व्यायाम करीत असतानाच पुढच्या पिढीलाही ‘पोरांनो व्यायाम करा रे’ असा कानमंत्र ज्येष्ठांकडून ऐकायला येत असतो. पूर्वी केवळ करिअरच्या मागे धावणारी आणि पाटर्य़ामध्ये आपली ताणमुक्ती शोधणारी तरुण पिढी हे जगणे बदलू लागली आहे. व्यायामाला विशेष महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. काही तरुणांचे व्यायाम हेच करिअर होऊ लागले आहे. व्यायामाच्या ऊर्मीतून एखादा व्यायाम प्रशिक्षक तयार होतो आणि तेच त्याचे करिअर बनते. एका खासगी जिममध्ये प्रशिक्षक असलेला सागर महाडिक सांगतो, दहावी झाल्यानंतरच मी व्यायाम सुरू केला. उत्तम शरीरयष्टीसाठी सुरुवातीला व्यायामशाळेत जाऊ लागलो. आता जिममध्ये रमतो. व्यायामाविषयी खास आवड निर्माण झाल्यावर याची रीतसर माहिती घेतली आणि व्यायाम क्षेत्रातच करिअर करायचे ठरवले. सागर सांगतो, तरुणांसाठी व्यायाम हे ध्येय झाले आहे. अनेक तरुण-तरुणी आपले शरीर उत्तम दिसावे यासाठी व्यायामाकडे वळतात. त्यामुळे तरुणांचा व्यायामाकडे कल वाढत आहे, हे निश्चित. अ‍ॅथलेटिक खेळाडू मोठय़ा प्रमाणात व्यायामाकडे येऊ लागले आहेत.

‘गॅजेट्स’ची मदत

व्यायामासाठी मोहिल चव्हाण हा व्यायाम उपकरणांचा वापर करतो. मोहिल सांगतो,  ‘‘बाजारात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांमुळे मला सुदृढ राहण्यास फारच मदत झाली आहे. हातात असलेल्या या घडय़ाळामुळे मी दिवसभरात किती वजन कमी करू शकलो हे वारंवार मला कळत राहते. दिवसाअखेर ठरवलेला पल्ला गाठू शकलो याचे समाधानही मिळत असते. मग लोकांकडून पार केलेल्या या पल्ल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारण केले जाते. हे प्रसारण लोकांना दाखविण्यासाठी असले तरी केलेल्या कामगिरीचे कौतुक लोकांकडून व्हावे, हा त्यामागील उद्देश असतो. मग लोकांकडून शाबासकी मिळाली की पुन्हा मेहनत करण्यासाठी मनाची आपोआपच तयारी होत असते. या सर्व आधुनिक उपकरणांचा किंवा तंत्रज्ञानाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्यात काहीही वावगे नाही.

समाजमाध्यमातून प्रेरणा मिळाली

अलीकडे फेसबुक, इन्स्टाग्रामसारखे खाते उघडल्यावर कुठल्यातरी एका मित्र-मैत्रिणींचे जिममधील व्यायाम करतानाचे छायाचित्र किंवा चित्रफीत हमखास पाहायला मिळते. आपण किती धावलो, किती उष्मांक जाळले, याविषयी तरुण समाजमाध्यमांवर सतत सांगत असतात. तंदुरुस्तीविषयी मिळालेले लाइक्स, प्रतिक्रिया वाचण्यात एक वेगळा आनंद असतो, असे तरुणांचे म्हणणे आहे. याशिवाय समाजमाध्यमांवर बॉडी बिल्डर अशी ओळख होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी पडतात.

नियमित व्यायाम करणारा ओंकार शेवडे सांगतो, सध्या करतो त्या सर्वच गोष्टी समाजमाध्यमांवर टाकण्याचा कल आहे. व्यायाम करतानाची छायाचित्रे किंवा चित्रफीत हा त्याचाच एक भाग. व्यायाम करतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर टाकल्यावर इतर मित्र- मैत्रिणींकडून मिळणारी प्रशंसा नेहमीच प्रोत्साहन देते. त्यातही एखादा मित्र व्यायाम करण्यात नियमित असेल तर मग आणखी चांगल्या पद्धतीने व्यायाम कसा करावा, वा अजून कोणता व्यायाम करावा हे सल्लेही मिळतात. समाजमाध्यमांतून अशा गोष्टी प्रसारित केल्याने आपणही अनेकांना प्रोत्साहन देत असतो. व्यायामासारख्या गोष्टीला प्रोत्साहनाची खूपच गरज असते. प्रोत्साहनाबरोबरच सध्या उपलब्ध असलेले विविध ‘फिटनेस गॅजेट्स’ही तितकेच महत्त्वाचे असतात. या आधुनिक उपकरणांमधून वारंवार मिळणाऱ्या सूचनांमुळे व्यायामाला दररोज तितकेच महत्त्व देत असतो.