24 January 2021

News Flash

करोनाष्टक : गाणी, गप्पा आणि पाककृती

खूप गाणी गाऊन टेपही केली. ऑनलाइन गाण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसेही मिळविली.

करोनाष्टक : गाणी, गप्पा आणि पाककृती

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com 

लेखा तोरसकर , ठाणे : करोनामुळे टाळेबंदी सुरू झाली आणि आपण सारे घरातच अडकलो. मी वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर पणत्या साठवून ठेवल्या आहेत. त्या मी व्यवस्थित पॅक करून ठेवल्या होत्या. त्या सगळ्यात पहिल्यांदा पाहण्यासाठी बाहेर काढल्या आणि त्यांना रंगवायचे काम केले. मी घरीच व्यायाम चालू ठेवला आहे.

गाण्याचीही मला खूप आवड आहे. कराओके ट्रॅकवर गाणी म्हणणे चालू केले आहे आणि व्यवस्थित शिकलेही. खूप गाणी गाऊन टेपही केली. ऑनलाइन गाण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसेही मिळविली. पाककलेचीही मला पहिल्यापासून खूप आवड आहे. पहिले थोडे दिवस आनंदात गेले पण नंतर कंटाळा येऊ नये म्हणून सकाळचा नाश्ता करणे, वेगवेगळ्या प्रकारचा चहा करणे असे प्रयोग मी करू लागले आणि सगळ्यांना ते आवडूही लागले. पाककृतींचे व्हिडीओ तयार करून ते यूटय़ूबवर टाकू  लागले. त्याला छान प्रतिसाद मिळाला.  खूप आनंद मिळाला. घरातच आहोत मग घर तर आवरायलाच पाहिजे. मस्तपैकी घराची सफाई

के ली. बाहेर जायचे नाही हे खरे पण मग घरातच छान राहायला हरकत नाही. त्यामुळे न वापरलेले काही कपडे मुद्दाम वापरून पाहिले. वेगवेगळ्या के शरचना करून पाहिल्या. माझ्याकडे शुगर नावाचा बोका आहे. त्याचीही छान काळजी घेतली. त्याला अजिबात बाहेर पाठवता आले नाही. करोनावरील लढय़ाच्या दरम्यान कविता केल्या. मित्रमंडळी, नातेवाईकांशी फोनवरून संवाद साधताना के वळ गप्पांपुरते मर्यादित न राहता एकमेकांचे विचारही ऐकू न घेतले. अत्यावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडायचे एवढे तत्व मात्र पाळत आलो आहोत.

माझी हरितक्रांती :

मेघना मधुकर वराडकर, भांडुप

मला बागकामाची खूपच आवड आहे, ती आवड मी जोपासत होतेच, त्यातच टाळेबंदी जाहीर झाली. आता घरी राहणे अपरिहार्य होते. मग आपल्या बागेच्याच छंदाला वेळ द्यावा असे ठरवले.  मी सर्व झाडांना व्यवस्थित तपासून, गोंजारून त्यावर  घरीच तयार केलेले कीटकनाशक फवारणी केली, योग्य ती छाटणी केली आणि घरीच तयार केलेले कम्पोस्ट खत घातले. अशा प्रकारे सर्व झाडांना निरोगी व तरतरीत केले. माझ्या सर्व झाडांनी जणू जुनी कात टाकून हिरवी शाल पांघरण्याचे ठरविले, त्याप्रमाणे सर्व बागेनी हरितक्रांती केली. ते पाहून घरातील व बाहेरच्या लोकांचेही डोळे विस्फारले. कारण माझी बाग बाहेरूनही दिसते.

जेमतेम १५ दिवसांनी सर्व फुलझाडांवर छोटय़ा कळ्या अवतरल्या, सोनकेळीने नवीन पानांची चाहूल दिली. अळूला नवीन कोंब फुटले, आले तरारून तयार झाल्याची खूण पटवली, हिरवागार पुदिना रसरशीत झाला, सोनटक्का (जो फक्त पावसाळ्यात फुलतो) उन्हाळा असूनही रोज २० ते २२ फुले देऊ लागले. गुलाब, अबोली, सदाफुली, पिंक लिली, जास्वंद, रेड एक्सोरा, बार्बाडोस ऑरेंज अशी विविधरंगी व विविधढंगी फुले पाहून विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे बागेची शोभा वाढवत आहेत.

टाळेबंदीच्या काळात प्रदूषणही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. त्यामुळे निसर्गही खूश आहे. झाडेही मनमोकळा श्वास घेत आहेत. त्या बदल्यात निसर्गही सुंदर मनमोहक फु ले देत आहे.

स्वयंपाकाचे धडे

शशांक कुलकर्णी, जालना

करोना महामारी आणि त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी यामुळे सगळ्यांना सध्या वेळच वेळ आहे. मला लिखाणाची आवड आहे, पण एरवी वेळ मिळत नसल्याने लिखाण फारसे होत नसे. पण या काळात कधीच असे वाटले नाही, की कं टाळा आला आहे. उलटपक्षी लिखाण जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवता आले. लिखाणात सुधारणा झाली. माझ्या चुकांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेचा अभ्यास करत असल्याने रोजच्या बातम्या पाहताना त्याचा एक प्रकारे प्रात्यक्षिक सरावच मिळत होता. रोज नवनव्या कल्पना सुचत होत्या, लिखाण होत होते. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत पुन:प्रक्षेपित के ले जात आहे. तेही मी आवर्जून पाहतो. समाजमाध्यमांतून ऑनलाइन येणाऱ्या विविध मोठय़ा व्यक्तींना मुद्दाम ऐकतो. पाककलेची आवड असल्याने तोही छंद जोपासत आहे. भरली वांगी, कढी, बिर्याणी असे प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे कधी जर एकटे राहण्याची वेळ आलीच तर स्वयंपाकाच्या बाबतीत मी स्वयंपूर्ण आहे. या टाळेबंदीच्या काळाने मला रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे या संकटकाळातही मी अशा सकारात्मक गोष्टींकडे बघून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे.

पालकत्वाचे नवे आव्हान

शिल्पा बाळकृष्ण कुलकर्णी, लातूर

प्रथम करोनाष्टकाच्या निमित्ताने ‘आमच्यासारख्या’ पालकांना व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मनापासून धन्यवाद ! आता ‘आमच्यासारख्या’ या  शब्दाबद्दल थोडेसे. काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्ये बातमी होती की, ‘स्वमग्न’ मुलांच्या समस्यांमध्ये टाळेबंदीमुळे  कशी वाढ  झालीय. मी आणि माझे कुटुंब स्वमग्न असलेल्या तेजसी या मुलीचे पालक आहोत. अशा विशेष मुलांचे पालक कुटुंबातील सर्वच सदस्य असतात नव्हे ते तसे असले तरच त्या विशेष बालकाचा सर्वागीण विकास होण्यास मोठा हातभार लागतो. आता टाळेबंदीमुळे विशेष मुलांपुढे जे प्रश्न उद्भवतायत ते सर्वसामान्य मुले वा पालकांसमोरील प्रश्नापेक्षा फार वेगळे आहेत. अर्थात त्या सर्वाचा ऊहापोह आत्ता गरजेचा नाही. पण करोनाच्या समस्येमुळे आपणा सर्वासमोर ज्या आरोग्यविषयक समस्या अचानक उभ्या राहिल्या त्यांना तोंड देणे या ‘विशेष’ मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक वेगळाच समस्यांचा डोंगर होऊन बसलाय. इतर सर्वसामान्य जनतेने जे केले तेच मीही सुरुवातीला केले, पण मी एक विशेष शिक्षिकासुद्धा असल्याने माझा दृष्टिकोन थोडा वेगळा होता आणि त्यातूनच मार्ग निघत गेले. उदा. मनबोधाचे व दासबोधाचे पठण, वारानुसार स्तोत्र पठण, वाचन, इ . नुसते हात धुणे तेही २० सेकंद हे माझ्या तेजूला कसे समजावून सांगावे यावर विचार करताना लक्षात आले की, मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोक विशिष्ट लयबद्ध चालीत म्हटला तर तो २०-२१ सेकंद होतो आहे. तेजूला हे श्लोक आवडत असल्याने आणि तिला ते पाठही असल्याने मग एक श्लोक संपेपर्यंत हात साबणाने धुवायचा हे तिला समजले. माझी एक मोठी समस्या सुटली.

दासबोधातील निद्रेचे विवेचन बाबांकडून ऐकून माझा मोठा मुलगा व सून  यांचेही या ग्रंथाबद्दलचे कु तूहल वाढले होते. निद्रेचे हे विवेचन मोठे विनोदी असल्याने त्यांनी दासबोध पुढे आवडीने वाचला, याचे समाधान वाटले. घराच्या बाहेर तर जाता येत नव्हते. पण मग तेजूला घरीच तिच्या आवडीचे काम देऊन त्यात गुंतवणे आवश्यक होते. मी सुनेकडून यूटय़ूबच्या मदतीने पेपर क्विलिंग, थ्रेड ज्वेलरी वगैरे शिकू न घेतले. तेजूलाही मदतीला घेऊन काही वॉलपीस, कानातले, शोपीसेस बनवले. या बदल्यात सुनेलाही काही पदार्थ शिकवले आणि एका गंमतशीर पद्धतीने फिट्टंफाट के ली.

दिलखुलास गप्पा

अनिता अनिल हजारे, ठाणे

करोनाने साऱ्या जगालाच वेठीला धरले पण याआधी कधीही न मिळालेले, रिकामपण आज आपल्याला मिळाले आहे. गेले कित्येक वर्षांपासूनचा हरवत चाललेला संवाद नव्याने गवसला आहे. प्रत्यक्ष भेटून नाही पण फोनवरून सगळ्यांशी संवाद होत आहे. ख्यालीखुशाली विचारली जात आहे. वर्षांनुवर्षे न भेटलेल्या नातेवाईक, मैत्रिणींशी दिलखुलास गप्पा मारल्या.  कपाटातील जुन्या कविता, लेख, कात्रणे पुन्हा एकदा वाचली. कपाटे साफ झाली त्याबरोबर मनाची मरगळही गेली. जुने फोटो कौटुंबिक व्हॉट्सअ‍ॅप गटांवर टाकले गेले. आठवणी दाटून आल्या. आपल्या सुख दु:खात ही सगळ्यांची साथ आहे ही भावना मन सुखावून गेली. पूर्वी मुले, नातवंडे घरी आल्यावर गाणी, गप्पा, अंताक्षरी, कोडी, पत्ते, कॅ रम, ल्यूडो, सापशिडी हे खेळ रंगत असत. तीच मुले आता मोठी झाल्यावर के वळ मोबाइलला चिकटली आहेत. पण या टाळेबंदीच्या काळात सारे पुन्हा एकत्र आलो. मी आर्याला साबुदाण्याच्या पापडय़ा, अनुष्काला खीरीसाठी गव्हले शिकवले तर त्यांनी मला चॉकलेट केक आणि पास्ता शिकवला. या पाककृतींचे व्हिडीओही बनवले. यासोबत वर म्हटलेले कॅ रम, ल्यूडो, सापशिडी हे खेळही घरात रंगत आहेत.

जावे कवितांच्या गावा..

माधव गावित, सुरगाणा (नाशिक)

करोना संकटामुळे टाळेबंदी झाली. सारेच आपापल्या घरात बंद झाले. काहीजण गावी गेले आहेत. मी शिक्षणासाठी औरंगाबादला असतो, पण या टाळेबंदीच्या काळात मीही माझ्या गावाला म्हणजे नाशिकमधील सुरगाणा येथे आलो आहे. खरेतर यानिमित्ताने एक ब्रेक मिळाला. अभ्यास, कार्यशाळा या सगळ्या धावपळीत कं टाळून गेलो. मला कवितांची आवड आहे. कविता वाचायलाही आवडतात आणि लिहायलाही आवडतात. गावी भाऊ-बहीण, आई-वडील सारे एकत्र आहोत.  सारेजण छान गप्पा मारत आहोत. एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. त्यासह प्रत्येकजण आपापल्या छंदाला वेळ देत आहे. मग मीही माझ्या कवितेच्या छंदाला वेळ देण्याचे ठरवले. याआधी मी एका आदिवासी वस्तीच्या व्यथा सांगणारा काव्यसंग्रह प्रकाशित के ला होता. सध्याविविध कवितासंग्रहांचे वाचन करीत आहे. ते वाचन करता करताच मलाही काही कविता सुचू लागल्या. पण लिखाणासाठी वेळ मिळत नव्हता. तो आत्ता मिळाला. मग या काळात मी काही कविताही लिहिल्या आहेत.

अभ्यासाचे वेळापत्रक

दिगंबर नारायण शिंदे, पुसद, जि. यवतमाळ

आज सर्वचजण आपापल्या घरात अडकून पडले आहेत. पण आम्ही मात्र या टाळेबंदीला एक संधी मानून वेळ सत्कारणी लावत आहोत. मागील तीन वर्षांतील उन्हाळी सुट्टीचा आनंद हवा तसा घेता आला नाही. उन्हाळी सुटय़ांमध्येही सारे कु टुंब एकत्र नव्हते. यंदा थोडेसे निवांत आहोत. त्याला अनुसरूनच आम्ही या टाळेबंदीच्या काळाचे वेळापत्रक बनवले आहे. रोज सकाळी किमान अर्धा तास कुटुंबातील प्रत्येकाने सायकलिंग

के लेच पाहिजे, यावर मी लक्ष ठेवून असतो. दुपारच्या वेळेत मोठी मुलगी धाकटय़ा भावाला नववीचे गणित शिकवते तर छोटी विज्ञान शिकवते. मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकत असल्यामुळे त्याला मराठीची आवड निर्माण व्हावी यासाठी मी रोज त्याच्याकडून मराठीतील एक उतारा किंवा कथेचे वाचन करवून घेतो. सायंकाळी त्याच्यासोबत एक तास बॅडमिंटन खेळतो. याशिवाय घरातील सर्व मिळून पत्ते खेळणे, संगणकावर वेबमालिका आणि चित्रपट पाहणे, घरकाम तसेच स्वयंपाकात प्रत्येकाने  सहभाग घेणे, गप्पा मारणे हेसुद्धा सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 3:26 am

Web Title: loksatta readers creative activites at home during lockdown zws 70
Next Stories
1 तारांगण घरात : नव्या माध्यमांसह कामाला सुरुवात
2 करोनाष्टक : व्यंगचित्रांची गंमत
3 तारांगण घरात : वाचन आणि अभिवाचन 
Just Now!
X