करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

coronafight@expressindia.com

पूर्वी मांजरेकर, मालाड

आपल्या सर्वानाच फावल्या वेळेत एखादी गोष्ट करण्याची अथवा आपला छंद जोपासण्याची सवय असते. मला बालपणापासूनच हस्तकलेची आवड असून टाकाऊपासून टिकाऊ अथवा कमीत कमी सामग्रीत सुशोभनीय वस्तू बनवणेही आवडते. करोनामुळे सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडणे अशक्य असल्याने माझ्याकडे वेळच वेळ होता. यादरम्यान समाजमाध्यमांवर वेळ दवडत बसण्याबरोबरच मी त्यांचा माझ्या छंदासाठी कसा उपयोग करता येईल, याविषयीही विचार केला. त्यातूनच मला माझ्या कलाकृतींचा खजिना उघडण्याची कल्पना सुचली. मी फार पूर्वीपासून विविध रंगांचे लोकरीचे धागे गोळा करत असल्याने त्यापासून तोरण आणि भिंतीवर लटकवता येईल असे छान वॉलपीस बनवायला सुरुवात केली. त्यासाठी घराशेजारीच असलेल्या लाकडाच्या पट्टय़ांचा मला फार उपयोग झाला. त्याचप्रमाणे कार्डबोर्ड आणि पुठ्ठय़ाचा वापर विविध आकारांचे भांडेही (वास) तयार केले. घरातल्यांनीही माझे प्रोत्साहन वाढवल्यामुळे मी अधिक उत्साहाने या कामात मग्न झाले. त्यामुळे भविष्यात लोकरीपासून तोरणांव्यतिरिक्त आणखी नवीनवीन शोभेच्या वस्तू अथवा घरात उपयोगी पडतील अशा वस्तू बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे ही सर्व कार्ये करताना सामाजिक अंतराचे भान राखण्याकडेही माझे लक्ष असते आणि शक्य तितक्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करण्यावरच मी भर देते.

गीतेतील तत्त्वज्ञान शिकलो

दिनेशचंद्र हुलवळे, मु. काटाळवेढे, ता. पारनेर, जि. अहमदनगर  : देशोदेशीच्या महान विभूतींना प्रेरणादायी ठरलेली भगवद्गीता माझ्यासाठी कायमच कु तूहलाचा विषय आहे.  माझे काका पोपटअप्पांनी गीता वाचायची कशी हे शिकवले, तर विनोबांच्या गीताईमुळे योग्य तो अर्थबोध झाला. पुढे मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञानातून एम.ए. केल्याने गीतेबद्दलचे आकर्षण आणखी वाढले; पण भगवद्गीता मुखोद्गत करण्याची इच्छा मात्र अतृप्तच होती. १७ मार्च रोजी घरगुती कामासाठी ४ दिवसांकरिता गावी आलो आणि मुंबईला परतण्याचे मार्गच बंद झाले. श्रीदत्त मंदिर आश्रम, काटाळवेढे, ता. पारनेर येथे श्रीधरभाऊ आणि हिराअक्का यांनी थांबण्याची व्यवस्था केली. त्यामुळे दररोजचा आध्यात्मिक नित्यक्रम सुरू झाला. योग-प्राणायाम याबरोबर दररोज भगवद्गीता पठणाला सुरुवात केली.

आरंभी तीन-चार अध्यायांची नित्याने घोकमपट्टी केली. नंतर दररोज संपूर्ण गीतेचे पारायण सुरू केले. सव्वा ते दीड महिन्यांत संपूर्ण भगवद्गीता पाठ झाली. आध्यात्मिक जीवनाचा आनंद घेता आला. आश्रमाच्या परिसरात रात्रीचा अंधार आणि पौर्णिमेचे चांदणे अनुभवता आले. सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असते!

जन्माला आल्या क्षणापासून माणूस ऐहिक संसाधनांच्या प्राप्तीसाठी अव्याहत धडपडत असतो. मन:स्वास्थ आणि आरोग्याकडे त्याचे बरेचदा दुर्लक्ष होते; पण करोना आपत्तीने माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडले. माणसाच्या प्राथमिकता बदलल्या. करोनानंतरच्या जगात वेगळी जीवनप्रणाली आपल्याला आत्मसात करावी लागेल. काही जीवनमूल्ये नव्याने स्वीकारावी लागतील. समाजजीवनातल्या आचारविचारांत मोठे बदल होतील. मैत्री-नातेसंबंधांची नव्याने पुनस्र्थापना होईल. परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे, या परिवर्तनाला धैर्याने सामोरे जा, हीच गीतेची शिकवण आहे. आपणही सारे जागतिक पातळीवर होऊ घातलेल्या आर्थिक, सामाजिक परिवर्तनाला आनंदाने सामोरे जाऊ या!

स्वच्छता आणि स्वयंशिस्त

दुर्गेश देवरे, चाळीसगाव, जि. जळगाव</strong> : करोना विषाणूचा आपल्या जीवनात प्रवेश झाला आणि आपले जगणेच बदलून गेले.  सतत कामासाठी बाहेर असणारे आपण घरात कोंडलो गेलो. करोनाची नकारात्मक बाजू तर आहेच पण बहुतांशी सकारात्मक बाबीसुद्धा आपल्या आजूबाजूला घडत आहेत. प्रदूषण कमी झाले आहे, नद्या स्वच्छ झाल्या आहेत, रस्त्यावरील अपघात कमी झालेत, पक्ष्यांचा किलबिलाट स्पष्ट ऐकू येतो आहे. हे सगळे झाले ते के वळ मानव घरात बसल्याने.

माझी सकाळ हल्ली पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते आणि जोडीला असतो, ‘लोकसत्ता’. कधी नेहमीप्रमाणे कागदी रूपात तर कधी ई-आवृत्तीच्या माध्यमातून. करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक आणीबाणीसदृश परिस्थिती, तेलाच्या दरातील घट, घटलेला जीडीपी या सगळ्यांविषयी आधीही कुतूहल होतेच, पण आता ते आणखीच वाढले. या सगळ्याविषयी लोकसत्तातून तसेच इतर पुस्तकांतूनही वाचत असतो. अच्युत गोडबोले, गिरीश कु बेर यांसारखे लेखक वाचत असतो. नुकतेच लोकसत्ताने आयोजित के लेला साठीचा गझल महाराष्ट्राचा या वेबसंवादाचाही मी आस्वाद घेतला. त्यातही सहभागी झालो होतो. इंटरनेटच्या माध्यमातून वेबमालिका पाहात आहे. अनेक विषयांवरील वेगवेगळे लेख वाचत आहे. वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र यांची माहिती घेत आहे. शाळेत असताना हे सारे विषय कं टाळवाणे भासत होते, पण आता त्याचविषयी मोठय़ा कु तूहलाने वाचतो आहे. या विषाणूने आपल्यातील प्रत्येकाला आरोग्याबाबत जागृत के ले, स्वच्छता आणि स्वयंशिस्तीचे महत्त्व पटवले. या विषाणूपश्चात मानवी जगण्याचे तत्त्वज्ञान, दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल, असे वाटते आहे.

 

कसोटीचा कालखंड

प्रदीप महाडिक, बोरिवली : जगभरात करोना विषाणूचा फैलाव वाढलाय. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस घरदार बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून या विषाणूशी सामना करत आहेत; पण या करोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. आमचे कु टुंब बऱ्यापैकी मोठे आहे.

घरात चार पिढय़ा. घराच्या जवळच राहत असलेले इतर पणतू, नातू भेटत नाहीत, त्यामुळे सत्याऐंशी वर्षांच्या आमच्या आईला म्हणजे शैलजा महाडिक हिलाही फार वाईट वाटते; परंतु आता फोनच्या माध्यमातून थोडी तरी भेट होते, परदेशातील कु टुंबीयांशीही व्हिडीओ कॉलवर बोलते. पूर्वी ती टीव्ही पाहत असे; पण कानांनी ऐकू  येत नाही. त्यामुळे मग वृत्तपत्र आणि पुस्तकांशी तिने दोस्ती के ली. तसा तिला रक्तदाब, मधुमेह यापैकी कोणताही आजार नाही. घरी चालते-फिरते.  सारा वेळ ती पोथीवाचन, नामस्मरण, संत गाडगेबाबा, हिंदू धर्म आणि संस्कृती, संत नामदेव महाराज यांच्या पुस्तकांचे वाचन करते. शरीराला व्यायाम म्हणून घरातल्या घरात काठी घेऊन चालणे, कपडय़ांच्या घडय़ा घालणे, भाजी निवडणे, वाती करणे अशी लहानसहान कामे करत असते. आम्ही सारे प्रत्येक सणाला एकत्र येतो. प्रत्येकाचे वाढदिवस एकत्र साजरे करतो. ते सारे आता होत नसल्याने आई सतत देवाजवळ प्रार्थना करत असते. ही टाळेबंदी कधी संपणार आणि सारे कधी भेटणार, असे विचारत असते. तिच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होवो आणि करोनाचे हे संकट टळो, हीच प्रार्थना.

 

सकारात्मक संधी

ल्ल  प्रा. भाग्यश्री रोडे, भूम

करोनामुळे झालेल्या या टाळेबंदीमध्ये काय करावे ते सुचत नव्हते. खूप दिवसांपासून हिंदीतील अनेक रचना, त्यात राही मासूम रजा यांचे ‘ओस की बुंद’, शिवपूजन सहाय यांचे ‘देहाती दुनिया’, हिंदी दलित साहित्यकार सुरजपाल चौहान यांचे ‘संतप्त’ वाचण्यात आले. या रचना अनेक दिवसांपासून पडून होत्या. सर्वप्रथम या पुस्तकांवरची धूळ झटकली. ही पुस्तके  वाचून काढली. त्यानंतर यूटय़ूबवर अनेक जुनी आणि प्रसिद्ध मराठी नाटके  पाहिली, वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या, प्रेरणादायी विचार ऐकले. ‘लोकसत्ता’चेही जुने अंक वाचले. यासोबत माझी दोन वर्षांची कन्या सिद्धिक्षा हिच्याशी बोबडे बोल बोलण्यात, खेळण्यात कसा वेळ जातो, तेच कळत नाही.

एकू णच या टाळेबंदीकडे नकारात्मक पद्धतीने न पाहता सकारात्मक संधी म्हणून पाहत आहे.

 

लेखनाकडे ओढा

संजय जाधव, धुळे : दीड महिना झाला या करोनावासाला. सुरुवातीला छान, मग चांगले, पुढे बरे आणि शेवटी कं टाळवाणे असा प्रवास झाला.  मी सेवानिवृत्त असल्याने मला फारसा फरक पडला नाही;. पण नुसते बसून, खाऊन आणि झोपून राहणाऱ्यातला मी नाही. त्यामुळे काय करता येईल, यावर विचार के ला.

मला लिखाणाची आवड आहे. मी लिहिलेली चार पुस्तके  आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत. नुकत्याच के लेल्या कोकणच्या दीर्घ प्रवासाचे वर्णन लिहून काढले. गेली सात-आठ वर्षे पत्नीला पायदुखीचा आजार आहे. त्यावर अनेक वेगवेगळे डॉक्टर्स, उपचार के ले आहेत. त्या साऱ्या अनुभवावर आधारित एक विनोदी लेखही लिहून काढला. चांगला वेळ गेला. पाहायचे राहून गेलेले जुने सिनेमे, नाटके  असे सर्व रोज एक या नियमाने पाहत होतो. एवढे करून झाल्यावर कळले की, तरीही आपल्याकडे बराच वेळ शिल्लक असतो. मग ‘क्षणिका’ या शीर्षकाखाली लहान लेख लिहायला सुरुवात के ली. त्यात माझे अनुभव, किस्से यावर आधारित ललित लिखाण करत होतो. अजूनही लिहितो आहे. त्याला मित्र, नातेवाईकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता दिवाळी अंकासाठी लेखनाची तयारी करतो आहे. या सगळ्यादरम्यान पत्नीला कामात मदत करणे आलेच. करोनाविषयक कोणत्याही बातम्या मी वृत्तवाहिन्यांवर पाहत नाही, कारण त्यातून फक्त नकारात्मकता आणि नैराश्यच वाटय़ाला येते. त्यापेक्षा मी ‘लोकसत्ता’च्या बातम्यांवर विश्वास ठेवतो. समस्या सगळ्यांनाच आहेत; पण आपण शक्य तेवढे सकारात्मक राहणे गरजेचे आहे. हा करोना जणू खांद्यावर येऊन बसलाय आणि चार-पाच दिवसांत आपल्याला डेथ सर्टिफिकेट मिळणार आहे, या भावनेने आणि भीतीने जगण्यात काय मजा. आनंद कुठेही मिळू शकतो, तो घेता आला पाहिजे. त्यासाठी घराबाहेरच गेले पाहिजे, असे नाही. घरात बसूनही आपण तो मिळवू शकतो.