24 January 2021

News Flash

करोनाष्टक : व्यंगचित्रांची गंमत

रोजच्या घटनांवर विचार करताना मी काही चित्रं रेखाटायची ठरवली.

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव.. 

coronafight@expressindia.com

अ‍ॅड. नीलेश कानकिरड, (करंजा लाड) जि. वाशिम : व्यवसाय व्यस्ततेमुळे बरेचदा आपण आपल्या छंदांना आणि आवडीनिवडींना न्याय देऊ शकत नाही. पण हे छंदच आपल्याला तारतात. नवी प्रेरणा देतात. मला वाचन, लेखन, व्यंगचित्रे रेखाटणे यांसारखे छंद आहेत. या काळात मला या छंदांना वेळ देता आला. व्यावसायिक कामासोबत या सर्व छंदांची सांगड घालून मी एक नीट वेळापत्रक तयार के ले. त्यामुळे प्रत्येक छंदाला वेळ देता आला. करोनाकाळात मला अनेक गोष्टी नव्याने शिकता आल्या. व्यंगचित्र कलेसाठी भरपूर निरीक्षण, वाचन, वर्तमान परिस्थितीचे आकलन व विसंगतीला विनोदाची झालर असणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यंगचित्र रेखाटायला चित्रकलेचे अंग, विनोदाचे सामर्थ्य, सखोल चिंतन या बाजू महत्त्वाच्या ठरतात. मला करोनाच्या निमित्ताने ही एक नामी संधी वाटली, मग रोजच्या घटनांवर विचार करताना मी काही चित्रं रेखाटायची ठरवली. आपण आस्वादक  आणि साधक अशा दोन्ही अंगाने कलेकडे पाहिल्यास तिच्या कक्षा अधिक रुंदावताना दिसतात, याची प्रचीती आली.  मी के लेली व्यंगचित्रे मलाच एक निर्मितीचा आनंद देऊन गेली. याशिवाय वाचन, आजवर केलेला लेखनप्रपंच पुन्हा वाचणे, पत्रलेखन, संग्रह, मासिके, वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, जुनी छायाचित्रे, पत्रव्यवहार, कात्रणे या सगळ्यासाठी कधी नव्हे ती सवड मिळाली. आवड होतीच, तिला सवडीची जोड मिळाल्याने वेळ छान गेला.

तबलावादनाचा छंद

पार्थ अग्निहोत्री, कल्याण : टाळेबंदीचा काळ हा माझ्यासाठी वेगळा अनुभव ठरला आहे. या करोनाने सारे जनजीवनच विस्कळीत करून टाकले. पण याच टाळेबंदीकडे एक संधी म्हणून मी पाहिले आहे. मी ३ वर्षे तबला शिकलो आहे. पण यंदा दहावी असल्याने तबल्याला विश्रांती दिली होती. तबल्याची शिकवणीही बंद होती. पण आता टाळेबंदीच्या काळात मी घरीच रियाझ करतो. एक वर्ष थांबलेला माझा तबला आता सुरू झाला आहे. सगळ्या तालांची, ठेक्यांची उजळणी करत आहे. एवढेच नाही तर एखादे गाणे लावून त्यावर तबला वादन करण्याचा प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने तबल्याचा सरावही होतो आहे आणि संगीताची जाणही येते आहे. यासोबत वाचन, पाककला, चित्रकला यांचीही आवड जोपासत आहे,  वेगवेगळे पदार्थ कलाकृती करत आहे. या साऱ्यामुळे वेळ अगदी छान जातो आहे.

कवितांचा कोलाज

उषा जगताप, बीड : करोनाच्या संकटामुळे टाळेबंदी लागू के लेली आहे. या काळात मी सकारात्मक राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘लोकसत्ता’मध्ये यापूर्वी छापून आलेल्या कवितांचा मी संग्रह के लेला होता. त्याचे एक छानसे कोलाज तयार करून ते घराच्या दर्शनी भागातच लावले आहे. विविध कवितांचा हा कोलाज साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या कवितावाचनाचा आनंद सारेच घेत आहोत. मलाही कविता करण्याची आवड आहे. अनेक स्वरचित कविताही मी एका वहीत उतरवून ठेवल्या आहेत. यानिमित्ताने मीही काही नव्या कविता रचल्या. या कवितानिर्मितीचा आनंद मनाला सुखावतो आहे. माझा मुलगा व्यवसायासाठी परगावी आहे. त्याला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पाककलेचे धडे देते आहे. या ऑनलाइन शिकवणीतही खूप गंमत येते.  तसेच अनेक जुन्या मैत्रिणींशीही दूरध्वनीद्वारे संवाद साधते आहे, त्यातून गतकाळच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे.

नात्याची नवी सुरुवात

संध्या सिनकर, ठाणे : जगभरात करोनाने हातपाय पसरले. करोनाबरोबर लढण्यासाठी गर्दी न करणे आणि एकमेकांपासून योग्य अंतर राखून या विषाणूची साखळी तोडणे हाच प्रभावी उपाय असल्याने आता आपण सारेच घरात बंद आहोत. करोनानंतर अर्थव्यवस्थेचे काय होईल, आर्थिक मंदी येईल की सारे गाडे पूर्ववत होईल असे सगळे प्रश्न सतावत आहेत. तरीही आम्ही सारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहोत. घरात मी, पती शिरीष, मुलगा सिद्धेश आणि सून रुना असे चौघेजण असतो. मुलगा आणि सून व्यायामाचे नवनवे प्रकार शोधत असतात. परवा ते दोघे चक्क बारा मजले चढून आले. मी आणि शिरीष मात्र चालणे आणि थोडी योगासने करतो. सुरुवातीला सारेच उदास होते. पण त्यानंतर हळूहळू सारेच सरावलो. मुलाला घरूनच काम करण्याचे असल्याने तो उशिरापर्यंत कार्यालयीन कामात मग्न असतो. मी आणि सून रुना स्वयंपाकघरात प्रयोग करून पाहत असतो. कधी यूटय़ूबवर पाहतो तर कधी आई, सासूबाईंच्या जुन्या पाककृती आठवून करतो.  शेजवान फ्राइड राइस, कोल्ड कॉफी असे पदार्थ असतील तर रुना मुख्य स्वयंपाकी असते. तर चिकन मसाला, बटर चिकन वगैरे नॉनव्हेज पदार्थ असतील तर शिरीषकडे जबाबदारी असते. बाकी डोसा, इडली सांबर, पोळी-भाजी यासाठी मी. मग जो मुख्य बनवणारा असेल त्याला इतरांनी भाजी चिरून देणे, वाटण करणे वगैरे मदत करायची असे आपोआपच ठरले आहे. मदतनीस ताईंना सुट्टी असल्याने आम्ही सारेच ही कामे करतो. मुलगा सिद्धेश त्यात मदत करतो. पण या स्वच्छता विभागाचा प्रमुख आहे, शिरीष. यासोबत ‘लोकसत्ता’ची ई-आवृत्ती, पुस्तके  वगैरे वाचन सुरू आहे. काल संध्याकाळी तर खूप दिवसांनी पत्ते खेळलो. खूप मजा आली. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना फोन करून गप्पा होतात. जुने फोटो अल्बम्स बघताना वेळ कसा गेला ते कळतच नाही. आता आम्ही सारे सतत एकत्र असल्याने सहवासाने प्रेम वाढते, याचा प्रत्यय येतो आहे. रुनाचा समंजस, आनंदी, सकारात्मक स्वभाव जाणवला आहे. या टाळेबंदीच्या अर्धविरामामध्ये खरेतर आमच्या नव्या नात्याला छान सुरुवात झाली आहे.

तुज आहे तुजपाशी

अ‍ॅड. धनंजय माने, सोलापूर : मधुमेह असल्यामुळे रोज कमीतकमी एक तास फिरणे हा गेल्या २५ वर्षांचा शिरस्ता होता. करोनाने तो मोडला. खरेतर मोडला असेही म्हणता येणार नाही कारण पूर्वी घराच्या जवळपास फेरफटका मारायला जात होतो ते आता करोनामुळे घराच्या गच्चीत जाऊ लागलो. कारण घराबाहेर पडण्यावर बंधने आलेली. पत्नी रेखा हिच्या दोन्ही  गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेली असल्याने डॉक्टरांनी रोज घरात जिना चढणे-उतरण्याचा आणि चालण्याचा व्यायाम सांगितलेला. मग काय, रोज सायंकाळी गच्चीवर पत्नी आणि आठ वर्षांचा नातू अधिराजबरोबर फे ऱ्या मारायला सुरुवात के ली. नातू आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबद्दल प्रश्न विचारतो. त्याला उत्तरे देताना आमचेही आपोआपच पक्षीनिरिक्षण सुरू झाले. मावळतीला घरांकडे परतणारे पक्षीगण, त्यांचे सुंदर रंग, त्यांची थवा करून उडण्याची पद्धत, त्यांचा किलबिलाट हे सारे दृश्य न्याहाळताना जीव हरखून जातो. घरासमोर सुमारे शंभर वर्षांहून अधिक वयाचे श्री दत्तस्थान असणारे उंबराचे झाड, नारळाचे झाड, वडाचे झाड, जवळच असलेल्या हुतात्मा उद्यान, भुईकोट किल्ला परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षराजी. त्यामुळे चिक्कार पक्षी येतात. सूर्य मावळल्यानंतरही थोडा वेळ वाऱ्यावर बसलो असताना पत्नीसोबत छान गप्पा होतात. खरेच सांगतो, गेल्या ४२ वर्षांच्या वैवाहिक जीवनात एवढय़ा निवांत गप्पा कधीच झाल्या नाहीत. अंधार पडू लागल्यावर आकाशात ताऱ्यांचे आगमन होते. नातवाचे प्रश्न सुरू होतात. इथे मात्र मी आमचे मित्र  प्रा. हेमंत वैद्य यांना शरण जातो. मग तेही फोनवरूनच आम्हाला या नभांगणाची माहिती देतात. अशा प्रकारे आकाशनिरीक्षणही सुरू असते. संधी असूनही गेल्या ४५ वर्षांत जे करण्यासाठी वेळ झाला नव्हता, ते सारे आता या टाळेबंदीमुळे शक्य झाले आहे. अनपेक्षितपणे मिळालेल्या या संधीचे सोने करतो आहे. या सगळ्या गोष्टी खरेतर माझ्या जवळच होत्या. पण ते म्हणतात ना, तुज आहे तुजपाशी.. तशी गत झाली होती. करोनाने मात्र साऱ्यांचेच डोळे उघडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 2:16 am

Web Title: loksatta readers creative activities in lockdown activities in lockdown zws 70
Next Stories
1 तारांगण घरात : वाचन आणि अभिवाचन 
2 करोनाष्टक : माणुसकीचे महत्त्व
3 तारांगण घरात : नव्या रूपात ‘चिवित्रा’
Just Now!
X