करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

गावाची ओढ

साईनाथ महाडवाड, नांदेड : करोनामुळे मिळालेल्या सुट्टय़ांच्या निमित्ताने अनेक जण शहरांकडून खेडय़ांकडे चाललेले दिसले. आम्हीसुद्धा दहा भावंडे वेगवेगळ्या ठिकाणांहून गावी जमलो. करोनामुळे हा एकत्र येण्याचा वेगळाच योग जुळून आला. शेतात मस्त फेरफटका मारला. बाबांनी भाजून दिलेला ‘हरभऱ्याचा  हुळा’, ‘गव्हाच्या ओंब्या’ची चव काही निराळीच होती. शेवटी ‘माधव’ने उठवलेला ‘मोहोळ’ खाऊन, भर उन्हाळ्यात तुडुंब भरलेल्या विहिरीतील नितळ पाणी पिऊन समाधानाची ढेकर दिली. नुकतेच जमिनीतून उगवलेली कलिंगडाची रोपे कॅमऱ्यात कैद करून घेतली. त्यानंतर झाली जनता कर्फ्यूची घोषणा. ती मात्र आम्ही तंतोतंत पाळली. स्वच्छतेचे महत्त्व आम्हाला या करोनाने चांगलेच समजावले.

दिवसभर मातीत खेळून तश्शीच पाय न धुता जेवायला बसणारी गावातली अनेक मुले हल्ली घराच्या बाहेर न निघता चार-चार वेळेला हात धुताना पाहतो आहे. घरातला कचरा भसक्कन रस्त्यावर टाकणाऱ्या अनेक  जणी शिस्तीत तो उकिरडय़ावर नेऊन टाकताना पाहतो आहे. हे पाहून फार चांगले वाटते. ओस पडलेली अनेक खेडी, पुन्हा गजबजलेली दिसत आहेत. माणसांतली तुटलेली नाळ पुन्हा जोडली जाताना दिसते आहे. हे सगळे मी फक्त लिहीत नसून स्वत: अनुभवतो आहे. करोनाचे संकट लवकरात लवकर निवारू  दे, हीच अपेक्षा आणि स्वच्छतेच्या या चांगल्या सवयीसुद्धा अशाच कायम ठेवल्या पाहिजेत.

वाचनानंद

मृणाल पोतदार, नवी मुंबई</strong> : लेकीची परीक्षा संपली की, दोन दिवसांसाठी कुठे तरी बाहेर जाऊन यावे म्हणून सुट्टी काढली होती. तर हे करोनासंकट दाराशी उभे ठाकले. खरे तर अशा सुट्टीची सवयच नाही. आत्तापर्यंत आजारपण, परीक्षा, बाहेरगावी जाण्यासाठीच सुट्टी घेतलेली आहे. या सक्तीच्या सुट्टीमुळे घरी राहण्याची ही पहिलीच वेळ. ही संधी तर मिळाली, पण तिचे करायचे काय? हाताशी असलेल्या या वेळाचे नेमके काय करायचे, हे समजत नव्हते. मला वाचनाची प्रचंड आवड. मुले नुसती मोबाइलमध्ये गुंग. त्यामुळे त्यांना वाचनाची आवडही नाहीच. मग एक कल्पना सुचली. त्यांनी घरची इंग्रजी पुस्तके वाचायची, त्या बदल्यात मी माझ्याकडची गूढकथेची पुस्तके त्यांना वाचून दाखवणार असे ठरले. त्यानुसार मुलांनी रोज दोन पाने वाचायची, त्या बदल्यात मी दोन गोष्टी वाचून दाखवणार असा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. त्यातही गोष्टीचा शेवटचा परिच्छेद मी मुलांना वाचायला देते. त्यांच्या उच्चारातील, आवाजातील चढ—उतारांच्या चुका माझ्या लक्षात येतात, मग मी त्या समजावून सांगते. हे वाचन करताना जाणवले की, आपण आता किती तरी मराठी शब्द वापरतच नाही. त्यामुळे अगदी साध्यासाध्या शब्दांचे अर्थही समजावून सांगावे लागत होते. ते सांगताना माझीही भंबेरी उडत होती. उदा. किंकर्तव्यमूढ. अजूनही या शब्दाचा अर्थ मला समजावून देता आलेला नाही. गुगलबाबाने दिलेले भाषांतर पाहून तर मला भोवळच यायची बाकी होती. तर अशा प्रकारे या सक्तीच्या सुट्टीत आम्ही वाचनानंद घेत आहोत. पुढचे दिवसही तो असाच सुरू राहील, अशी आशा.

अग्निहोत्राची परंपरा

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य, परळी वैजनाथ, बीड : महाविद्यालयीन अध्यापनसेवेसोबतच सामाजिक कार्यातही सहभाग असल्याने मला नेहमीच बाहेर फिरावे लागते, पण करोनामुळे घरातच थांबायची वेळ आली. शिक्षणासाठी बाहेर असलेला मुलगाही घरी आला. मग सर्वाचे मिळून प्रात:भ्रमण, व्यायाम, प्राणायाम हे गच्चीवरच सुरू झाले. दुपारी, संध्याकाळी मुलांसोबत गप्पा, विविध विषयांवर चर्चा, संवाद होऊ लागला. वाचन व लेखनाची सवय असल्याने विविध ग्रंथांसोबतच दैनिक ‘लोकसत्ता’सारख्या दर्जेदार वृत्तपत्राचे नेहमीच सान्निध्य मिळाले. वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर ते रद्दीला न देता सहा-सहा महिने त्यांचे गठ्ठे बांधून ठेवण्याची माझी सवय आहे. याचे कारण म्हणजे त्यातील महत्त्वपूर्ण संपादकीय लेख व इतर माहितीपूरक साहित्य यांची कात्रणे काढून ठेवणे होय. हे कार्य पूर्ण करणे या दिवसांत शक्य झाले. या कामात सहकार्य मिळाले ते पत्नी व मुलांचे. यासोबतच त्यांच्यासमवेत विविध शंकांचे निरसन, सामाजिक व राष्ट्रीय जबाबदाऱ्यांची जाणीव, वैयक्तिक जीवननिर्माण, मूल्यसंस्कार आदी विषयांवर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यास वेळ देता आला. तसेच त्यांना सोबत घेऊन घरातील स्वच्छता, पुस्तकांचे व्यवस्थापन, विविध वस्तूंची मांडणी, अंगणातील कुंडय़ांची निगा अशी विविध कामे सारे मिळून अगदी आनंदाने करीत आहोत. तसेच पर्यावरणशुद्धीसाठी वैज्ञानिक पद्धतीने यज्ञ या संकल्पनेचा संस्कार पूर्वापार रुजल्याने घरी काही वर्षांपासून अग्निहोत्राची परंपरा सुरू आहे, पण हा अग्निहोत्र किंवा यज्ञ वैज्ञानिक पद्धतीचा आणि तोदेखील अंधश्रद्धाविरहित असा.

करोनाच्या काळात या विशुद्ध यज्ञाची परंपरा आम्ही सध्या सकाळी व संध्याकाळी जपली आहे. सारे मिळून आम्ही दोन्ही वेळा मोठय़ा श्रद्धेने यज्ञ करतोय. या यज्ञात विविध औषधी वनस्पतींचे संमिश्रण असलेली सुगंधित द्रव्यसामग्री, तूप आणि आंबा, वड, पिंपळ यांच्यासारख्या उपयुक्त वृक्षांच्या समिधा यांच्या आहुत्या प्रदान करतो. यज्ञाच्या शेवटी संध्यावंदना व ध्यान करून वैश्विक कल्याणासाठी मंगलकामनाही केली जाते. या करोनाने साऱ्यांना घरात बसवले आहे खरेच, पण यानिमित्ताने कुटुंबाशी समरस होण्याची संधीसुद्धा चालून आली आहे. आम्ही त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहोत.

काळजी करू  नका, काळजी घ्या

सई फौजदार, बांद्रा : मी कधी एखाद्या गोष्टीबाबत काळजी करत असेन किंवा अस्वस्थ असेन, तर माझ्या सासूबाई नेहमी त्यांच्या वडिलांनी दिलेला कानमंत्र मला देतात, ‘काळजी करायची नाही, काळजी घ्यायची’.  सध्या करोनाप्रकरणी जे काही सुरू आहे, त्यामुळे सर्वाचेच मन निराश, अस्वस्थ, नकारात्मक बनले आहे. या परिस्थितीतसुद्धा सकारात्मक राहण्यासाठी आम्ही याच मंत्राचा अवलंब केला आहे, ‘काळजी करत नाही, पण काळजी घेत आहोत’.

आमचे एकत्र कुटुंब आहे. घरात चार लहान मुले आहेत. दोन सहा वर्षांची, तर दोन आठ महिन्यांची! त्यामुळे करोना प्रतिबंधक काळजी आम्हाला दुपटीने घ्यावी लागते आहे. आम्ही ती घेत आहोत. पुन:पुन्हा बाजारात जाऊन धोका वाढू नये म्हणून आठवडाभराचा भाजीपाला, औषधं आणून ठेवली आहेत, परंतु मुलांना शाळेला सुट्टी मिळाल्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली आहे. मुले घरी असल्यावर आपण त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी एक तर निरनिराळे वर्ग लावतो, मॉलमध्ये नेतो किंवा खेळायला पिटाळतो; पण यातले काहीच न करता मुलांचे मनोरंजन करायचे, त्यांना रमवायचे हा खरे तर यक्षप्रश्नच होता; परंतु सहज विचार केला की, एवढा अखंड वेळ मुले कधीच घरी नसतात, असली तरी आपल्याला त्यांना द्यायला पुरेसा वेळ नसतो. मग या संधीचे सोने का नाही करायचे? मग काय, कधी आजीबरोबर गीता अध्याय, रामरक्षा म्हणण्यात, गोष्टी ऐकण्यात ते रमतात, कधी काका-काकूबरोबर खेळतात, चित्रं काढतात, कधी आठ महिन्यांच्या भावाबहिणीसोबत मनसोक्त खेळतात, आईबाबांसोबत वेळ घालवतात. घरात वेळ कसा जातो ते कळतच नाही. आपल्याच मुलांना वाढताना बघण्याचा आनंद आणि त्यासाठीचा भरपूर वेळ या करोनामुळे मिळाला असे वाटते. त्यांच्यातली निरागसता आपल्यात यावी असे वाटते. चार दिवस सलग सुट्टी मिळाल्यानंतर फक्त लाँग वीकेंडचे प्लॅन बनवणारे, फॅमिली गे्ट टुगेदर करणारे आपण, सलग इतक्या दिवस फक्त आपल्याच घरात आणि आपल्याच कुटुंबासोबत वेळ घालवतोय, ही संधी कदाचित ‘न भूतो न भविष्यति’ अशी आहे. आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत, आपले छंद जोपासण्यासाठी वापरायला हवा. स्वाइन फ्ल्यू काय किंवा करोना काय, यांसारखी अजूनही संकटे येतील, आपण त्यांना परतवूनही लावू, पण एक धडा नक्कीच घेण्यासारखा आहे. आपण निसर्गापेक्षा मोठे नाही. आपले जीवन किती क्षणभंगुर आहे याची जाणीव निसर्गाने अलगद आपल्याला करून दिली आहे. ती लक्षात घेऊन निसर्गाला जपायला हवे.

दुधावरची साय

चंद्रकांत ठाकूर, सांताक्रूझ : मुलीचा १३ मार्चला संध्याकाळी ठाण्याहून फोन आला- बाबा, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? तिच्या प्रश्नाने माझ्या मनातही चिंतेची पाल चुकचुकली.  तिची लेक म्हणजे आमची नात, आमच्यासाठी दुधावरची साय असलेली मिहिका (वय वर्षे आठ), हिच्या पाळणाघराला करोनामुळे सुट्टी देण्यात आली होती. मुलीला तर कामाला जायचे, त्यामुळे मिहिकाला कोण सांभाळणार, अशी तिला चिंता होती. त्याचे उत्तर अर्थातच आम्ही होतो. ही हवीशी जबाबदारी मी आणि पत्नीने अगदी आवडीने स्वीकारली. मुलगी आणि नात त्यांच्या घरून निघाल्यावर हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत त्यांची कार कधी पोहोचेल, याचा अंदाज लावून मी बरोब्बर कार येण्याच्या वेळेत सोसायटीच्या दारात उभा होतो. आमचे हे तंत्रप्रेम पाहून, मुलगीसुद्धा आश्चर्यचकित झाली. सोमवारपासून मिहिकासोबत आमची सुट्टी सुरू झाली. आजीने भेंडी बारीक चिरायचे काम मिहिकाला दिले. वेळ मस्त जाणार आणि परतलेली भेंडी खायला मिळणार म्हणून मिहिका खूश. त्यानंतर पोळ्या करायलाही पोळपाट-लाटणे घेऊन मिहिकाची स्वारी स्वयंपाकघरात पोहोचली. जेवण झाल्यानंतर आजीला भांडी आवरायलाही मिहिका मदत करते. तिचाही वेळ मजेत जातो आणि कामही होते. दुपारी उनो हा पत्त्यांचा खेळ खेळू लागलो. आजीबरोबर विश्रांती झाल्यानंतर तिच्यासाठी मी वाचायला काही पुस्तके आणली. दुसऱ्या दिवशी परत तिचा प्रश्न, आज काय करायचे? मग दुकानात जाऊन चित्र काढायची कोरी वही आणली, ती भरून झाली. दुपारी बदाम सत्ती, गुलामचोर, झब्बू वगैरे खेळत वेळ गेला. पत्ते, अंताक्षरी, शब्दांच्या भेंडय़ा, चित्रपटांच्या नावांच्या, गाण्यांच्या भेंडय़ा खेळताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. करोनामुळे बाहेर जाता येत नाही, पण घरातच आमचा वेळ आम्ही चांगल्या पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करतो आहोत. सोबत ही दुधावरची साय – आमची नात असल्याने तर आनंद द्विगुणित आहे.

घरचा अभ्यास

दीपक महाजन, चिकलठाणा, औरंगाबाद</strong> : केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा तब्बल ७५ दिवसांवर आलेली असताना अभ्यासिकेत जास्तीत जास्त वेळ अध्ययन करणे क्रमप्राप्त होते. अशा वेळी चीनमधील वुहान येथे  करोनाची बातमी आली. काही दिवसांतच ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊनचा आदेश आला. त्यानंतर आमची अभ्यासिका २२ तारखेपर्यंत बंद असल्याचा संदेश प्राप्त झाला. पदवी परीक्षा आणि आयोगाची परीक्षा जवळ आलेली असताना, असा निर्णय येणे काळजात धडकी भरवणारे होते. घरी कसा अभ्यास होणार, याची काळजी होती, पण दुसरा पर्याय नव्हताच. सरकारचा निर्णयही अत्यंत योग्य होता. मग अभ्यासाचे वेगळे परिपत्रक तयार केले आणि त्याचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष दिले.

फे रफटका मारण्यासाठी बाहेर जाण्याऐवजी घरीच शक्य ते व्यायाम व योगासने केली. लहान भावाला महाविद्यालयास सुट्टी असल्यामुळे आमची बाकीच्या वेळी दुर्लभ असणारी भेटही सहज शक्य झाली. त्याने मला नवे योग  प्रकारही शिकवले. घरी अभ्यास होईल की नाही, अशी शंका होती, पण घरीसुद्धा चांगला अभ्यास होतो आहे याची खात्री या दिवसांनी दिली आहे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयीही लागत आहेत. सर्वानी एकत्र जेवण्याचा आनंदही मिळतो आहे. हा संघर्षांचा काळ खूप काही शिकवणारा असेल, हे मात्र नक्की.

स्वावलंबनाचे धडे

बाळकृष्ण शिंदे , पुणे : मी आणि पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने आमची मुले पाळणाघरात असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र पाळणाघरे बंद त्यामुळे सगळे घरीच. मी एका नामांकित रुग्णालयात कामाला जात असल्याने मला घरून काम करण्याची मुभा नाही. पत्नीला मात्र नशिबाने ती मिळाली आहे.

मी नेहमीप्रमाणे कामावर जात असलो तरी घरातील एक जुना मोबाईल संच मी चालू करून घेतला आहे आणि तो माझ्या मुलांकडे सोपवला आहे. कामावरून वेळोवेळी मी मुलाशी संपर्क साधून ते काय करत आहेत याची चौकशी करत राहतो. वाचन आणि गडकिल्यांची भटकं ती हे माझे दोन आवडते छंद. मुलांमध्येही या आवडी उतरल्या आहेत. भटकं ती तर सध्या शक्य नाही. तेव्हा वाचनाची आवड मुले जोपासतात. त्यांना भरपूर बालवाङमय उपलब्ध करून दिले आहे. तसेच कोरे कागद, रंग, हस्तकला साहित्य आणून दिले आहे. घरातील नको असलेल्या, अडगळीतील अनेक वस्तू मुलांकडे सोपवल्या आहेत. यातून त्यांना जे जमेल जसे सुचेल तशा आकाराचे प्राणी, खेळण्याचे साहित्य इत्यादी बनविण्यास सांगितले आहे. उपक्रम पूर्ण झाला की मुलांनी मला फोन करायचा अथवा फोटो पाठवायचा. यामुळे मुले आपल्या कामात तर गढून जात आहेतच वर  पत्नीलाही काम करणे थोडे सोपे जाते.

मदतनीस ताईंनाही सुट्टी दिली आहे. त्यामुळे काहीही खाल्यानंतर आपले ताट धुऊन ठेवणे, कपडे धुणे ही कामे मुलांवर सोपवली आहे.

घरातील लादी आम्ही चौघे आळीपाळीने पुसत असतो. भाज्या निवडणे,कपडय़ांच्या घडय़ा घालणे,भांडी लावणे, पसारा आवरणे या साऱ्याच कामांमध्ये मुलांचा छान सहभाग मिळतो आहे. एकू णच या पुढच्या पिढीला या निमित्ताने स्वावलंबनाचे धडे मिळत आहेत.