करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

पद्मा पाटोळे, नवी मुंबई : करोनाच्या या तापाने सगळ्यांनाच अगदी वात आणला आहे. आमचे कुटुंबीयही त्यात आहेतच. मी राष्ट्र सेवा दलाची कायकर्ती आणि अंनिस शाखा पनवेल येथील उपाध्यक्ष आहे. घर, संसार, नोकरी आणि समाजसेवा हे करताना खूपसे छंद-आवडीनिवडी जपताच आल्या नाहीत. या संचारबंदीच्या काळात त्या कराव्यात असे मनात आले. माझ्या घरात मी, मुलगा, सूनबाई आणि दीड वर्षांची माझी नात राहतो. मुलाला कायम घरात किराणा आणि भाजीपाला भरून ठेवण्याची सवय आहे. मी त्याला कायम ओरडायचे. अरे कशाला एवढे भरत राहतोस, लागेल तसे आणत जाऊ. पण या संचारबंदीच्या काळात मात्र त्याच्या या वृत्तीचा फायदाच झाला.

आता आमच्याकडे उठल्यावर प्रत्येकजण त्याच्या वेळेनुसार व्यायाम करतो, सूर्यनमस्कार घालतो, व्यायामाची सायकल चालवतो. स्वयंपाकघरात प्रत्येक वेळेस एकेकजण आवडीचा पदार्थ सर्वासाठी बनवतो. त्यामुळे खाण्यापिण्याची तशी मजा आहे. जेवणानंतरचा वेळ प्रत्येकाचा आपापला. घराची साफसफाई, कपाटे आवरणे, गॅलरी आवरणे झालेच तर आपला मोबाइल आवरणे अशी अनेक कामे असतात. मोबाइल आवरायचा म्हणजे त्यातील अनावश्यक पोस्ट, फोटो डिलीट करून टाकणे. संध्याकाळी एकत्र चहा घेतो. दहा दिवसांनंतर घरातल्या भाज्या जवळजवळ संपल्या, पण कांदे-बटाटे आणि काही किराणा शिल्लक आहे. आम्ही खेडय़ात राहिल्याने दररोज वेगवेगळी भाजीच हवी, असे कोणाचेच नाही. भाजी नसण्याचे प्रसंग खेडय़ात अनेकदा येतात. मग सुक्या भाज्या, डाळींचे निरनिराळे प्रकार, चण्याची डाळ भिजवून सुके पिठले, कुरडयांची सुकी भाजी, डाळीचे आंबटगोड वरण असे प्रकार आम्ही करतो. फक्त दूध मात्र दररोज येते. त्याचे दही लावणे, त्याचीच कधी कढी करणे असे काय काय प्रकार करत असतो. एकूण जेवणाचे काम भागते. राष्ट्र सेवा दल आणि अंनिसमध्ये काम केल्याने तिथली अनेक सुंदर गाणी मला तोंडपाठ आहेत. त्यामुळे संध्याकाळी ‘युगायुगांची गुलामी चाले’, ‘संविधान वाचलं का हो संविधान’, अशी प्रेरणा आणि उत्साह देणारी गाणी मोठय़ाने म्हणते. समाजसेवा करताना आलेले भलेबुरे अनुभव मी मुलांना सांगते. राष्ट्र सेवा दलाने संविधानावर एक ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला आहे. नात झोपली असेल तर तो कार्यक्रम मी नक्की पाहते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेली ४० वर्षे मी समाजसेवेचे काम करत आहे. पण ते अनुभव कधी लिहून काढले नाहीत. मृणाल गोरे, एसएम जोशी अशा अनेकांनी मला लिखाण करायला सांगितले, पण ते कधी जमलेच नाही. या संचारबंदीच्या काळात मात्र ते करण्याचा प्रयत्न करत आहे. रोज एक पान लिहून काढते.

करोनाच्या या संकटकाळात हे घरात राहणे सुस व्हावे, यासाठी आमच्यासारखे अनेकजण वेगवेगळे उपक्रम घरात राबवत आहेत. सर्वानीच घरात बसून सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. घरबसल्या देशसेवा करण्याची ही एक संधी आहे, असेच समजूया आणि सारे घरीच थांबूया!

झोके  आणि बुद्धिबळामध्ये रमले!

अजित कुलकर्णी, अहमदनगर  : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्वाप्रमाणेच अनामप्रेम या संस्थेतील दिनक्रमही असाच बदलला आहे. ही संस्था अंध-अस्थिव्यंग-मूकबधिर-अपंग मुला-मुलींसाठी काम करत असते. सध्या ‘अनामप्रेम’च्या सर्व प्रकल्पांतील लाभार्थी हे ‘सत्यमेव जयते ग्राम’ निंबळक  ता. जि. अहमदनगर येथे एकत्रित झाले आहेत.  येथे रोज कॅरम, झोका, बुद्धिबळ, मोबाइल, टीव्ही ऐकण्यात ते मन रमवत आहेत. सध्या ‘सत्यमेव जयते ग्राम’मध्ये ६० दिव्यांग मुले-मुली असून करोना प्रकरण कधी संपेल याची वाट पाहत आहेत. करोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय ही मुले-मुली करत आहेत. साबणाने सतत हात धुणे, मास्क वापरणे,  सामाजिक अंतर पाळणे, रोज प्राणायाम व योगासने करणे हे सुरू आहे. अंध व अस्थिव्यंग मुला-मुलींसाठी करोनापासून बचाव करण्याचे उपाय अमलात आणणे खूप कठीण जात आहे. अनामप्रेमसारख्या सामाजिक संस्थांना सद्य:स्थितीत व पुढील काळात सेवाकाम करणे आव्हानात्मक असणार आहे. या संचारबंदीच्या काळात सर्व दिव्यांग मुले-मुली सतत बातम्या ऐकत आहेत. जगातील करोनाविषयीची अद्ययावत माहिती मिळवत आहेत.  ‘सत्यमेव जयते ग्राम’मधील मोकळ्या परिसरात सर्व दिव्यांग मोकळा श्वास घेत आहेत.

वाचनात रंगलो..

मनोज पाचंगे, खराडी, पुणे.

मी एका हॉस्पिटलमध्ये काम करतो. माझे काम मार्केटिंगचे असल्यामुळे आता सध्या काही दिवस घरातच आहे. पहिले दोन दिवस छान वाटले कारण बरेच दिवस मी सुट्टी घेतली नव्हती. त्यानंतर मात्र प्रश्न पडला आता काय करायचे दिवसभर. मला वाचनाची खूप आवड होती. घरात खूप पुस्तके पण आहेत. परंतु कामामुळे गेली तीन वर्षे त्यातील एकही पुस्तक हातात घ्यायलाही वेळ झाला नव्हता. करोनाच्या सक्तीची सुट्टीची संधी साधून मी ‘मृत्यूंजय’ हे पुस्तक हाती घेतले. पुस्तक वाचनात वेळ निघून जातो कळतच नाही. आता मी ठरवले आहे, या लॉकडाऊनच्या काळात जेवढी पुस्तके  वाचता येतील तेवढी वाचून घ्यायची. अशी संधी पुन्हा मिळेल असे नाही. सुरुवातीला या करोनाची खूप भीती वाटली होती पण आता तितकीशी वाटत नाही. आता मी सकाळी के वळ थोडाच वेळ बातम्या पाहतो. बाकीचा वेळ वाचन, कुटुंबासोबत घालवतो. मुलांसोबत खेळतो. महत्त्वाचे म्हणजे सरकारने सांगितलेले सर्व नियम पाळतो.

जिंकण्या-हरण्यातील मजा

अरुण गोडबोले, सातारा : माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस, सिनेनिर्मिती, लेखन, प्रकाशन आणि सामाजिक काम यामुळे घरच्या मंडळींसाठी कधी पुरेसा वेळ देता आला नव्हता, ती दुर्मीळ संधी आता सक्तीनेच मिळाली. एके काळी मी चांगला कॅ रमपटू होतो. अनेक बक्षिसेही मिळवत असे. पण गेल्या २५ वर्षांत खेळलोच नव्हतो. पण आता सगळेच बंद झालेले, घरातून बाहेरच पडायचे नाही. त्यात माझे वय ७६ त्यामुळे तर अधिक काळजी. मग काय घर एके  घर. मुलगा, सून आणि नातू कॅ रम खेळत होते. मलाही त्यात सहभागी व्हावे, असे वाटले, परंतु खाली बसायचे म्हणजे, गुडघे कु रकु रत होते. पण तरीही जिद्दीने बसलो आणि खेळलो. फारसे जमले नाही आणि हरलोच, पण त्यानिमित्ताने आयुष्यात प्रथमच हसणे, हरणे, टोमणे आणि मजा आली. आता आज पुन्हा खेळायचे म्हणतोय, आज जिंकीनच म्हणतो! आमचा हा फोटो माझ्या बायकोने काढला आहे, हेही विशेषच की!

ज्ञानशिदोरी

रवी जंगम, फलटण, सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात निंबळक येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षक  म्हणून आपल्याकडील ज्ञानभांडार अद्ययावत असावे या जाणिवेने माझ्यात काही सवयी रुजल्या. काही आवडी-छंद मी सहेतुक  जोपासले.  विधायक गोष्टींचा संग्रह करण्याची वृत्ती वाढत गेली. या छंदाचा आणि संग्रावृत्तीचा भाग म्हणून माझ्याकडे बँकिंग क्षेत्र, औषध कंपन्या यांच्याकडून दरवर्षी येणारी चित्रमय कॅलेंडर मी गोळा करून ठेवली आहेत. यात काही संग्रा मासिकेसुद्धा आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या नियमित, नैमित्तिक, साप्ताहिक अशा वाचनीय पुरवण्या आहेत. या सर्वामधली हजारो वेचक कात्रणेही माझ्या संग्रही आहेत. याउपर मला भावलेली पुस्तकेही आहेत. हा सारा खजिना कपाटात-पोत्यांत-पिशव्यांमध्ये-खोक्यांत जमेल तसा भरून ठेवला आहे. जवळपास पंचवीस वर्षे अव्याहतपणे हे सुरू आहे. आमच्या घरातील एक खोलीच या संग्रहाने भरून गेली आहे.

या अनमोल संग्रहांचा मला वेळोवेळी उपयोग होतो. २६/११ ला मुंबईवर हल्ला झाला. त्याबाबतची भित्तिपत्रके याच छंदातून तयार झाली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा ग्रंथ महोत्सव, पोलीस कवायत मैदान या ठिकाणी त्यांचे प्रदर्शन भरविता आले. स्व. आर.आर. पाटील,  प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्यासह अनेकांनी कौतुक करून भरभरून दाद दिली होती.  विश्वास मेहंदळे यांच्यासारख्या  माध्यमतज्ज्ञांनी उपयुक्त दस्तऐवज  म्हणून उल्लेख केला होता. प्रसंगानुरूप काही संदर्भ हवे असल्यास माझा हा संग्रह कामी येतोच, पण जरा शोधाशोधही करावी लागते. खोलीभरातील या पसाऱ्यातून शोध घेताना नाकीनऊ येतात. ही समृद्ध अडगळ सुव्यवस्थित ठेवावी असे अनेकदा वाटत असे, पण सलग निवांतपणा मिळतच नव्हता.

करोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीत मात्र मी हे काम करण्याचे ठरवले आहे. या संग्रहाची विभागनिहाय वर्गवारी करत आहे.  शैक्षणिक, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक, कृषी, विज्ञान, सांस्कृतिक, व्यक्तिविशेष, आहार , ऐतिहासिक,  क्रीडाविश्व, महिलाजगत, बालजगत,  मनोरंजन, बोधात्मक, विधायक, चिंतानात्मक असे निरनिराळे विभाग केले आहेत. हाती येईल ते पाहतोय, वाचतोय, पारखतोय आणि विभागनिहाय नीट ठेवतोय. उगाच भरताड आणि कालबाह्य़ झालेले साहित्य रद्दीत काढतो आहे. मी जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तके  जपून ठेवली होती, पण आता मंडळाच्या संके तस्थळावर ती उपलब्ध असल्याने त्याचीही संख्या कमी केली आहे. आधी अगदी पाय ठेवायला जागा नसणारी ही खोली आता मोकळा श्वास घेत आहे. आवडीच्या कामात दिवस कसा जातोय ते कळतही नाही.

एवढा वेळ सलग एका जागी बसण्याची सवय नसल्याने मान-पाठ एक होते, अंग अवघडते आहे. पण काहीतरी चांगले के ल्याचा आनंद जरूर मिळतो आहे. त्यापुढे हे सारे शारीरिक ताण-तणाव विसरायला होते. या कामात माझी शिक्षिका पत्नी मनीषा, आई, काकू, मुलगा पार्थ, बंधू अमृतराज या साऱ्यांचाच चांगला सहभाग आणि सहकार्य लाभत आहे. त्यामुळे या सक्तीच्या सुट्टीच्या काळातही आम्हाला कं टाळा येत नाही, शिवाय काही चांगले के ल्याचे समाधानही मिळत आहे.

झुकझुक आगीनगाडी

पराग पुरोहित, पुणे : ‘करोना’ने आपल्या साऱ्यांनाच आपल्याच घरात बंदिस्त के ले. घरातच बसून राहायचे म्हटल्यावर मग करायचे काय, असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. मला मात्र तो पडत नाही, कारण मी माझ्या जुन्या छंदाकडे वळलो आहे. रेल्वेगाडय़ांची मॉडेल्स तयार करण्याची मला आवड होती. त्या माझ्या छंदाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी या ‘लॉकडाऊन’ने पुन्हा मिळवून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामातील व्यग्रतेमुळे या छंद जोपासणीत बराच खंड पडला होता. त्याकडे परत वळताना मिळत असलेला आनंद काही औरच! त्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातील वेळ चांगल्या प्रकारे जाऊ लागला आहे आणि उत्साही वाटत आहे.