वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष असो, तरुण असो की वृद्ध. कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. तेल चोळणे, शेक घेणे, वेदनाशामक गोळ्या घेणे असे नाना उपाय केले तरी आराम पडत नसल्यावर मग डॉक्टरांची वाट धरली जाते. कंबरदुखी अनेक कारणांनी होऊ शकते. त्यामुळे या दुखीच्या कारणाचे योग्य निदान करून त्याप्रमाणे उपचार करणे योग्य आहे. कंबरदुखीची विविध कारणे जाणून घेऊया.

कंबरदुखीची तक्रार सर्वात जास्त आढळून येते ती श्रमजीवी वर्गामध्ये. या व्यक्तींमध्ये सतत निरनिराळ्या तऱ्हेची ओझी उचलल्यामुळे कंबरदुखी निर्माण होते. (अर्थात, मध्यमवर्गीयांमध्येदेखील गॅस सिलिंडरसारख्या वस्तू उचलणे, पाणी भरणे इत्यादी काही जड कामे केल्यानेही कंबरदुखी निर्माण होऊ  शकते.) सततच्या उभे राहण्याने कंबरेचे दुखणे निर्माण होऊ  शकते. तसेच सततच्या बैठकीमुळेही हे दुखणे त्रास देऊ  शकते. कार्यालयातील खुर्चीची रचना योग्य नसल्यास पाठीचा खालचा भाग दुखण्याचा त्रास होऊ  शकतो.

दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावरून सतत आणि बराच काळ दूपर्यंत प्रवास करण्याची गरजही वाढत चालली आहे. सततच्या वाहन चालवण्याने कंबरेचे दुखणे सुरू होते आणि काही वेळा तर वाहन चालवणे सोडायचीही वेळ काही जणांवर येते. रस्त्यांची दुरवस्था, दुचाकी वाहनांचे शॉक अ‍ॅबजॉर्स योग्य नसणे अशी बरीच दुय्यम कारणेही कंबरदुखीस कारणीभूत ठरू शकतात. पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते. मणक्यांना सूज येणे, त्यातील अंतरात बदल होणे, दोन मणक्यातील चकती सरकणे अशा कारणांनीही कंबरदुखी होते. या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यासदेखील तीव्र स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते, म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे की, स्नायूंतील विकृतीमुळे आहे हे वैद्यकीय सल्लागारांकडून निदान करावे.

शरीरातील चरबीची वाढ झाल्याने, स्थूलता वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ  शकतो. स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते. गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात. यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे (ज्यास श्वेतप्रदर म्हटले जाते.) अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात. अशा प्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते. बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किवा सौम्य अशा वेदना जाणवतात. कंबरदुखीसाठी स्वत:हून औषधोपचार करण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.

कंबरदुखीच्या कारणाचे निदान झाल्यानंतर दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते. योग्य प्रकारे विश्रांती घेणे हा या उपचारातील एक प्रमुख भाग ठरतो. आपली हालचाल नियंत्रित ठेवणे, अधिक श्रम न करणे, वजन न उचलणे या काही गोष्टी पाळाव्यात लागतात. त्यानंतर प्रत्यक्ष उपचाराचा भाग येतो त्यामध्ये सांधेदुखीत उपयोगी पडणारे काही गुगुळ कल्प महत्त्वाचे ठरतात. त्यामध्ये लाक्षादी गुगुळ इ.चा सामावेश आहे. लक्षादि गुगुळ लाक्षा म्हणजे लाख नावाचे वनस्पती द्रव्य असते कंबरेच्या ठिकाणी असलेल्या अवयवांचे (अस्थी व तत्सम घटक) व्यवस्थित रीतीने पोषण करण्याचे कार्य या लाखेमुळे होते. याचा डोस मात्र प्रकृतीनुसार ठरवावा लागतो. तेल लावून शेक घेणे हेदेखील यावर उपयुक्त ठरते. परंतु शक्यतो वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करावे. कारण तेल कोणत्या प्रकारचे वापरावे, शेक कसा घ्यावा याचा निर्णय कंबरेतील विकृती नेमकी कशाची आहे, हे ठरवून मग घ्यावा लागतो.

कंबरेचे दुखणे असणाऱ्यांनी आणखी महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी, ते म्हणजे निजण्याची गादी वापरताना ती फोमची नसावी. वैद्यकीय सल्ल्यानुसार अगदी सपाट फळीवर निजावे.