News Flash

कॉलेज आठवणींचा कोलाज : अभिनयाची पहिली वीट महाविद्यालयात रचली गेली

दहावीनंतरच मी व्यावसायिक नाटकात काम करायला लागले होते.

मधुरा वेलणकर

मधुरा वेलणकर

मी रुपारेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी. शाळेत असल्यापासून मी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. दहावीची परीक्षा संपल्यानंतरच्या सुट्टीत मी एका व्यावसायिक नाटकात काम केलं. तिथे नाटककार चेतन दातारने माझं काम पाहिलं. तेव्हा त्याने मला विचारलं, कुठल्या महाविद्यलयात प्रवेश घेणार आहेस? मी त्याला सांगितलं की मी रुपारेलला प्रवेश घेतलाय. त्या वेळी रुपारेल महाविद्यलयात नाटक मोठय़ा प्रमाणात होत होतं. माझी आई आणि बहीण यांनी रुपारेल महाविद्यालयातच एकांकिकांची अनेक बक्षिसं मिळवली होती. त्यामुळे एकांकिकांची, नाटकांची रुपारेलची परंपरा किती समृद्ध आहे, हे मी घरी पाहतच होते. साहित्याशी जोडलेले वेगळे विषय, खूप मोठमोठे कलाकार त्या वेळी रुपारेल महाविद्यालयातून बाहेर पडले होते. ही महाविद्यालयाची पाश्र्वभूमी असताना तिथे गेल्यावर नाटकाच्या ग्रूपमध्ये प्रवेश कसा मिळवायचा? कसं बोलायचं? ते मला माहीत नव्हतं. तेव्हा नाटकासाठी निवड करताना ‘मोनो अ‍ॅक्टिंग’ची स्पर्धा घेतली जायची. मग कार्यशाळा घेतली जायची. त्यामुळे कोण चांगलं काम करतंय ते कळायचं. त्यानंतर त्या मुलांची पुढे नाटकासाठी निवड व्हायची. पण माझ्या बाबतीत असं झालं की चेतनने माझं काम बघितलं असल्यामुळे त्याने आधीच सांगून ठेवलं होतं की मधुरा माझ्या नाटकात भूमिका करणार. कारण ते नाटक त्यानेच लिहिलं होतं. त्यामुळे तिथे नाटकाचा ग्रूप मला शोधत होता, की कोण आहे मधुरा, तिला बोलवा, मग त्यांनी माझ्या मावस भावाकडून नंबर घेऊन घरी फोन केला. फोनवर सांगितलं गेलं की उद्या जिमखान्यात ये. तिथे गेल्यावर सगळ्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले. माझ्या सगळ्यांशी ओळखी झाल्या, तिथे चेतन होताच, त्याच्याबरोबर दीपक राजाध्यक्ष, कपिल भोपटकर, सचित पाटील, प्रियदर्शन जाधव अशी मंडळी नाटकाच्या दिग्दर्शनासाठी होती. त्या दिवसापासून माझी नाटकात काम करायला सुरुवात झाली. नाटकात काम करताना दिग्दर्शकांकडून खूप शिकायला मिळालं तसं नाटक जगणं म्हणजे काय असते, तेही मी अनुभवलं. नाटकाची संकल्पना काय आहे, विषय काय आहे, सेट कसा लावायचा या सगळ्या गोष्टी शिकले. एक सेट तर आम्ही ठोकाठोकी करून बनवला होता. नाटकासाठी वेशभूषा करताना तुझा हा ड्रेस दे, तिचा हा ड्रेस दे अशी जमवाजमव करायचो. फक्त अभिनयच नव्हे तर इतर अंगांचाही विचार करायचो. महाविद्यालयात सगळ्यांनी मिळून स्पर्धेत भाग घेणं, तालमी करणं या सगळ्यातून एक प्रकारे नाटकाची नशा चढते. मी पहिलीच एकांकिका केली त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. मग तिथे नाटकात काम करतानाच बाहेर व्यावसायिक स्तरावरही मी काम करत होते.

दहावीनंतरच मी व्यावसायिक नाटकात काम करायला लागले होते. शाळेतल्या मर्यादित वातावरणातून तुम्ही महाविद्यालयात गेल्यावर मोकळे होता, तिथे खूप वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने रंगकर्मी घडण्याची प्रक्रिया महाविद्यलयातच सुरू होते. कुलकर्णी सरांनी मला महाविद्यालयातील अभ्यास, तिथे नाटकात काम करताना आणि त्याच वेळेस बाहेरही काम करत असतानाही मला सांभाळून घेतलं, पाठिंबा दिला. काहीजणं अभ्यासात हुशार असतात, पण काहीजणं अभ्यासात हुशार असूनही त्यांची हुशारी विविध कलांमध्ये दडलेली असते, ती पारखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे शिक्षकपण महत्त्वाचे असतात. कुलकर्णी सरांमुळे मी नाटकात स्वत:ला झोकून देऊन काम करू शकले. त्याचबरोबर दीपक, चेतन, कपिल आणि प्रियदर्शन या समविचारी दिग्दर्शकांबरोबर काम करीत असताना वाचनही खूप झालं, त्यांच्याकडून शिकायलाही मिळालं.

एक आठवण अशी आहे दीपकने आमची हिंदी एकांकिका बसवली होती. त्या वेळी सादर करताना पहिल्याच वाक्याला मी गोंधळले, मग पुढची काही वाक्येही आम्ही कलाकारांनी हिंदीमिश्रित मराठीत म्हटली. सगळेच खूप घाबरलो होतो. त्यामुळे एकांकिका अक्षरश: फसली. आणि दीपक आमच्याकडे रागाने बघत होता. तो चिडला होता. त्या एकांकिकेला आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. त्यानंतर दीपकने श्याम मनोहरांच्या ‘कळ’ कादंबरीवर ‘स्वप्नवंत’ ही एकांकिका बसवली. ती इतकी सुंदर पद्धतीने सादर केली, की अनेक वर्षांनी आम्ही रुपारेलला पहिलं बक्षीस मिळवून दिलं. त्यानंतर कपिलने ‘झेप’ ही एकांकिका बसवली होती. या दोन एकांकिका त्या काळात खूप गाजल्या. पहिलं पारितोषिक मिळालं. त्या वेळी महाविद्यालयात नाचत आलो होतो. कॅन्टीनवाला आम्हाला नाटकाच्या तालमी करताना त्याच्या पैशाने हळद दूध आणून द्यायचा. रात्री कितीही वाजले तरी तो काहीना काही जेवणाची सोय करायचा. सगळे शिक्षकही सहकार्य करायचे. ‘झेप’ एकांकिकेमुळे मला हिंदी चित्रपटात काम मिळालं. एकांकिंका करताना रोज नवं शिकायला मिळतं. अभिनयाची पहिली वीट महाविद्यालयात रचली गेली.

शब्दांकन : भक्ती परब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2019 1:32 am

Web Title: madhura velankar remember his college days
Next Stories
1 स्वादिष्ट सामिष : एग बोंडा
2 जीवनशैलीतील पेयपान
3 घरचा आयुर्वेद : अपचन
Just Now!
X