News Flash

सर्वगुणसंपन्न

वैभव भाकरे कॉम्पॅक्ट एसयूव्हीला बाजारात चांगलीच मागणी दिसून येत आहे म्हणूनच अनेक कार कंपन्या या श्रेणीत गाडय़ा दाखल करीत आहेत. फोर्ड इको स्पोर्ट,  मारुती सुझुकी

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

कॉम्पॅक्ट एसयूव्हीला बाजारात चांगलीच मागणी दिसून येत आहे म्हणूनच अनेक कार कंपन्या या श्रेणीत गाडय़ा दाखल करीत आहेत. फोर्ड इको स्पोर्ट,  मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझ्झा, ह्य़ुंदाई क्रेटा, टाटा नेक्सन या गाडय़ांना ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे. या श्रेणीत आधीपासूनच टीयूव्ही ३०० ही गाडी असतानाच महिंद्राने एक्सयूव्ही ३०० नुकतीच बाजारात दाखल केली. या श्रेणीत आधीपासूनच इतके चांगले पर्याय असताना महिंद्राने ग्राहकांचे लक्ष वेधून घेता येईल असे काय दिले आहे? याबाबत निश्चितच उत्सुकता वाढते. गाडीत देण्यात आलेल्या सुविधांची भलीमोठी यादी ही या गाडीची जमेची बाजू आहे.

एक्सयूव्ही  ३०० वर एक्सयूव्ही  ५००चा असलेला प्रभाव आपल्याला पाहताच क्षणी दिसून येतो. त्याचप्रमाणे ही गाडी टीव्हीयूहून वेगळी असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. महिंद्राची एक्सयूव्हीची रचना ही सांयोंग टीवोलीवर आधारित आहे. ही कोरियन कंपनी महिंद्राच्या मालकीची असून अशा प्रकारचा प्रयोग महिंद्राने आधी केला आहे. परंतु एक्सयूव्ही ३००ची रचना जरी टीवोलीवर आधारित असली तरी त्यात भारतीय बाजार आणि रस्त्यांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. गाडीची लांबी ४.२ मीटर पासून ३.९ मीटर करण्यात आली आहे. ३००चे जवळपास सर्वच बॉडी पॅनल नवीन आहेत. वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे गाडीचे इंजिन आणि सस्पेन्शन महिंद्राने विकसित केले आहेत. गाडी टीवोलीवर जरी आधारित असली तरी महिंद्राने एक्सयूव्ही ३००च्या रूपात नवीनच गाडी बाजारात दाखल केली आहे असे म्हणायला हरकत नाही.

गाडीचे लुक्स कोणाला कसे वाटतील हा वैयक्तिक आवडीचा भाग आहे. बऱ्याच वेळा एखादा वर्ग विशिष्ट गाडीच्या दिसण्याबाबत कौतुकाचा भडिमार करतो, तर काही लोक त्या गाडीच्या एकंदर लुक्सवर नाके मुरडतात. परंतु एक्सयूव्हीचा लुक हा सगळ्यांना विशेषत: भारतीय  ग्राहकांना आवडेल असा ठेवण्यात आला आहे. गाडीच्या समोरील भागातील क्रोम असलेले ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, उभे डीआरएल लक्ष वेधून घेतात. गाडीच्या टेल लाईटसाठी देखील एलईडी लाईटचा वापर करण्यात आला आहे. गाडीची चाके १७ इंचांची आहेत आणि गाडीला डय़ुअल टोन कॅलरिंग असून रूफला देखील वेगळा रंग देण्यात आल्याने गाडीची रंगसंगती उठावदार दिसते. गाडीचे इंटेरिअर चालकाच्या गरजेला लक्षात ठेवून तयार करण्यात आले असले तरी त्याबद्दल भरभरून बोलण्यायोग्य काही दिसून येत नाही. डॅशबोर्डमध्ये उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. गाडीचे स्टिअरिंग चांगल्या प्रतीच्या साहित्यापासून तयार केले असल्याचे हातात घेतल्याक्षणी जाणवते. गाडीच्या डॅशबोर्डसाठी विविध रंगसंगती आणि टेक्श्चरचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारचे डॅशबोर्ड आवडणे न आवडणे हे वैयक्तिक आवडीवर अवलंबून आहे. गाडीच्या सेंटर पॅनेलवर सात इंचाची टाच स्क्रीन देण्यात आली आहे. अँपल कार प्ले आणि अ‍ॅण्ड्रॉइड ऑटोची सुविधा देण्यात आली आहे. परंतु या पॅनेलच्या खालच्या बाजूची रचना तितकीशी आकर्षक नाही. केबिनमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे.

गाडीची जमेची बाजू म्हणजे तिची सुसज्जता. गाडीत देण्यात आलेल्या सोयीची यादी भलीमोठी असून काही सुविधा प्रथमच या श्रेणीतील गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत. गाडीत वातानुकूलित यंत्रणा दोन वेगवेगळ्या तापमानावर ठेवण्याची सोय आहे. बाह्य़ आरशातील उष्मा यंत्रणा. यामुळे हिवाळ्यात आरशांवर थंडीचा परिणाम होणार नाही. गाडीच्या आतील आरशात असलेली ऑटो डिमिंग यंत्रणा, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाईट्स, किलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट, ऑटो वायपर्स, अशा सुविधा आहेत. सुरक्षेच्या मानानेदेखील महिंद्राने विशेष काळजी घेतली आहे. गाडीच्या डब्ल्यू ८ डिझेल मॉडेलमध्ये सात एअरबॅग्स देण्यात आल्या असून गुढघ्याच्या रक्षणासाठी देखील एअरबॅग देण्यात आली आहे.  मागे आणि पुढे पार्किंग सेन्सर्स, मागच्या आणि पुढील चाकण डिस्कब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट अस्सिस्ट आदी सुरक्षा यंत्रणा देण्यात आल्या आहेत. गाडीच्या मागच्या सीट्सवर तीन जण बसू शकतात. मागे बसणाऱ्या तिन्ही प्रवाशांसाठी गाडीत अ‍ॅडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट देण्यात आले आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी गाडीत समाधानकारक लेग स्पेस आहे. गाडीची बूट स्पेस इतर गाडय़ांच्या तुलनेत कमी असल्याचे जाणवते. महिंद्राने एक्सयूव्ही ३०० साठी दोन इंजिनचे पर्याय दिले आहेत, एक १.२ लिटर टबरेचा  जेट पेट्रोल इंजिन आणि १.५ लिटरचे डिझेल इंजिन. हेच डिझेल इंजिन मरादझोमध्ये तुम्हाला आढळून येईल, परंतु ह्यात गीअरच्या गुणोत्तरात बदल करण्यात आला आहे. गाडीत ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. गाडीत नॉर्मल, कम्फोर्ट आणि स्पोर्ट हे तीन मोड देण्यात आले आहेत. गाडीला १८० मिमी ग्राऊंड क्लियरन्स देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सध्या तरी या गाडीचे ऑटोमॅटिक मॉडेल बाजारात उपलब्ध होणार नाही. महिंद्राने एक्सयूव्ही ३०० वर घेतलेली मेहनत आणि जास्तीत जास्त ग्राहकसुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न या गाडीला नक्कीच ह्या श्रेणीतील एक दमदार दावेदार बनवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 6:27 am

Web Title: mahindra tuv300 review
Next Stories
1 नवं काय? : पेट्रोल इंजिनमधील फ्युएल इंजेक्शन सिस्टीम
2 जुन्नरचे कातळसौंदर्य
3 ट्रिपटिप्स : जंगल भ्रमंतीत काय टाळावे?
Just Now!
X