News Flash

आरोग्यदायी संक्रांत

भोगीच्या दिवशी आपण बाजरीची तीळ घातलेली, लोण्याने माखलेली भाकरी खातो

डॉ. गौरांगी करमरकर

भोगी आणि मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात. शरीराला मुबलक उष्मांक असलेल्या या पदार्थामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळते आणि थंडीपासून शरीराचे संरक्षण होते.

मकरसंक्रांत शिशिर ऋतूत येते. सूर्य मकरास ओलांडून उत्तरेकडे येण्यास सुरुवात करतो. या ऋतूत कडाक्याची थंडी असते. बाह्य थंडीमुळे शरीरात जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. अग्नी म्हणजे अन्न पचवायची ताकद. आहाराचे शरीरांस पोषक पदार्थामध्ये रूपांतर करण्याची शक्ती. अशा या प्रज्वलित अग्नीचे संरक्षण होण्यासाठी अधिकाधिक ऊर्जा देणारा आहार घ्यावा लागतो आणि हा आहार पचवण्यासाठी इतर ऋतूंपेक्षा अधिक व्यायामदेखील करावा लागतो. या ऋतूतील आहार उष्ण वीर्याचा व अधिक उष्मांक देणारा असावा हे सुचवते ‘भोगी आणि संक्रांत.’

भोगीच्या दिवशी आपण बाजरीची तीळ घातलेली, लोण्याने माखलेली भाकरी खातो. हरभरा, मटार, गाजर, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, वांगी यांची तिळकूट घातलेली मिश्रभाजी दालचिनी, लवंग, मिरे घालून खातो; जेणेकरून ती पचायला हलकी होते. याबरोबरीने मूगडाळ-तांदळाची खिचडीदेखील खातात.

लोणी : या ऋतूत अग्नी उत्तम असल्याने भूक अधिक लागते. अशावेळी उष्ण गुणाच्या बाजरीच्या भाकरीबरोबर स्निग्ध गुणयुक्त लोणी अधिक उष्मांक असल्याने खाण्यास सांगितले आहे. थंड ऋतूत निसर्गत: तब्येत चांगली होते. परंतु वजन वाढत नसेल व पचनशक्ती चांगली असेल तर लोणी + खडीसाखर खाण्यास दिल्याने वजन वाढते. लोण्यात १०१.८ किलो कॅलरी ऊर्जा असते. ११.५२ ग्रॅम चरबी असते.

बोरं- पिकलेली बोरं अत्यंत गोड असून पित्ताचे विकार दूर करतात आणि बलदायक असतात.

संक्रांतीची गूळपोळी : गूळपोळीमध्ये गूळ व तिळकूट हे मुख्य घटक असतात. तिळाचे आरोग्यदायी गुण आपण पूर्वी जाणून घेतलेच आहे. गूळदेखील उष्ण, स्निग्ध, वातनाशक, मूत्राचे शोधन करणारा आणि किंचित पित्तशामक असतो. तो उष्ण, स्निग्ध तिळकुटाबरोबर प्रयुक्त करून त्याची गूळपोळी करून साजूक तुपाबरोबर खाल्ली जाते; जेणेकरून ती बाधत नाही.

तीळ :

तीळ कफ-पित्तनाशक असून केसांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी उत्तम असतात. रोज कोमट तीळतेलाने गुळण्या केल्यास दातांचे आरोग्य उत्तम राहते. थंडीत लघवीचे निसर्गत: कमी झालेले प्रमाण वाढवते.ज्या स्त्रियांना मासिक पाळीत कमी रक्तस्राव होतो, त्यांनी तिळाचे पदार्थ प्रमाणात खावे.तेलाची व्याख्या करताना ‘तिलोद्भवतलम्’ अशी केली आहे. अर्थात तिळापासून उत्पन्न होते तेल. तिळाच्या तेलाने थंड ऋतूत नित्य अभ्यंग करण्यास सांगितले आहे. अभ्यंगाने त्वचा तर कोमल होते, पण श्रमवार्धक्यही दूर होते. शरीर धष्टपुष्ट होते. दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. झोप उत्तम लागते आणि आयुष्य वाढते.

तिळापासून ८८४ किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तिळाचे तेल कधी फ्रिजमध्ये ठेवावे लागले असे कधीही ऐकिवात नाही. कारण त्यांत सिसॅमॉल व सिसॅमिन ही नैसर्गिक संरक्षके असतात. याच्या जोडीला यात लिग्नन असल्याने रक्तदाब योग्य राहण्यास मदत होते. तिळाच्या तेलाने नित्य अभ्यंग करणे आवश्यक आहे.

बाजरी :

बाजरी अति उष्ण असल्याने शरीरात रुक्षता (कोरडेपणा) वाढण्याचा संभाव्य धोका असतो म्हणून स्न्ोहयुक्त तीळ आणि स्निग्ध लोणी यांची जोड देऊन शरीराची स्निग्धता व मार्दवता टिकवून ठेवली जाते. बाजरीत प्रथिने ११ ग्रॅम, लोह तीन ग्रॅम, कॅल्शियम आठ मिलिग्रॅम, फॉलिक अ‍ॅसिड ८५ मायक्रोग्रॅम, कबरेदके ७२.८ ग्रॅम असून शरीरास ५७८ किलो कॅलरी उष्मांक पुरवते.

भोगीची भाजी

भोगीच्या भाजीत त्या हवामानात येणारे हरभरा, मटार, गाजर, घेवडा, वांगी, शेवग्याच्या शेंगा यांची तिळकूट, दालचिनी, लवंग व मिरे घालून भाजी करतात. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व जाणून घेऊ या.

हरभरा

भाजलेले व तळलेले हरभरे कफ-पित्तनाशक असतात तर भिजवलेले हरभरे बलदायक व रुचकर असतात. हरभऱ्यात १७.१ ग्रॅम प्रथिने, २.७ ग्रॅम खनिजे, ६१.२ ग्रॅम कबरेदके आणि ५.३ ग्रॅम स्नेह असतो.

मटार

मटार शिजवून खाल्ले तर बलदायकअसतात. मात्र कच्च्या मटारांनी जुलाबाची शक्यता जास्त असते. यामध्ये २३ ग्रॅम प्रथिने, ५४ ग्रॅम कबरेदक आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

गाजर-

गाजर उष्ण असून भूक वाढवण्यास मदत करतात. वातनाशक असतात. कफाचे आजार, मूळव्याध, ग्रहणी या विकारांत उपयुक्त आहेत. गाजर वाफेवर शिजवावे. छोटी गाजरे जास्त उपयुक्त ठरतात. गाजराने सूत्रकृमी मरतात, मासिक पाळीत रक्तस्राव व्यवस्थित होत नसल्यास गाजराचा वापर करावा. गर्भिणींनी टाळावा. गाजरे लघवीचे प्रमाण वाढवतात. गाजरात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.

घेवडा

घेवडा वातनाशक असतो, मधुमेह, किडनीचे आजार असणाऱ्यांसाठी उत्तम. लघवीचे प्रमाण वाढवतो. यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने, ४० ग्रॅम कबरेदके आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

वांगी

छोटी वांगी कफ-पित्तनाशक असतात तर मोठी वांगी पचायला जड व पित्तकारक असतात. या ऋतूत मोठय़ा वांग्यांचे भरीतही उत्तम पचते. वांग्यातून २५ किलो कॅलरी ऊर्जा, ५.८८ ग्रॅम कबरेदके आणि नऊ मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते.

शेवग्याच्या शेंगा :

या उष्ण असून कफ-वातनाशक आहेत, डोळ्यांना हितकर, कृमिनाशक असून लघवीचे प्रमाण वाढवतात. यांच्या बियांमध्ये ३६ र्निगध स्वच्छ तेल असते. जे स्निग्धता टिकवून ठेवते.

tejasveeclinic.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 3:43 am

Web Title: makar sankranti food makar sankranti dishes zws 70
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 पूर्णब्रह्म : रवा दोडाक
2 उपचारपद्धती : होमिओपॅथी
3 आयुर्उपचार : पंचकर्म म्हणजे काय?
Just Now!
X