News Flash

मनास्लूच्या छत्रछायेत..

काठमाण्डूपासून गोरखा जिल्ह्य़ातील आरुघाटपर्यंत गाडीरस्ता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुदर्शन कुलथे sudarshan.kulthe@gmail.com

पृथ्वीच्या पाठीवर अष्टहजारी (८००० मीटर उंचीवरील) शिखरांची संख्या १४ आहे. त्यात प्रथम क्रमांक लागतो तो एव्हरेस्टचा तर आठव्या क्रमांकावर ‘मनास्लू’ शिखर आहे. ते माउंटन ऑफ स्पिरिट म्हणूनही ओळखले जाते. तिबेटीयन लोक त्याला कांन पुन्गेन म्हणून संबोधतात. पट्टीचे गिर्यारोहक त्यावर आरोहणाच्या मोहिमा आखतात, पण वर्षभरात किमान दोन ते तीन हजार ट्रेकर्स परिक्रमेचा आनंद घेतात. शारीरिक क्षमतेचा कस लागतो, मात्र मानसिक शांतता आणि अनाघ्रात सौंदर्याची अनुभूती घेता येते.

हिमालयातील सर्वात प्रसिद्ध ट्रेक म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प. दरवर्षी तिथे २.५ लाखांपेक्षा जास्त लोक जातात. त्यापाठोपाठ अन्नपूर्णा परिसरात १.३ ते १.५ लाख गिर्यारोहक जातात. त्या तुलनेने मनास्लूच्या छत्रछायेत येणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. दरवर्षी मोजून २ ते ३ हजार ट्रेकर्स इथे येतात. मनास्लू अन्नपूर्णा शिखराच्या ६४ कि.मी. पूर्वेकडे तर लांगटांग आणि गणेश हिमालयाच्या पश्चिमेला आहे.

जगात ५००० मीटरवरून जाणारे मोजकेच पायरस्ते पासेस आहेत. ‘लारक्या पास’ हा त्यातलाच एक. लारक्या पासची उंची ५१०६ मीटर असून हा मनास्लू परिक्रमेतील सर्वोच्च बिंदू आहे. प्राचीन मीठ व्यापारी मार्गामधला हा पास हजारो वर्षांपासून आजही वापरता आहे. आरूघाट ते लारक्या पास या ६०० मीटर ते ५१०० मीटर चढाईतील संपूर्ण प्रवासात आपण हवामानाच्या विविध थरांमधून जातो. मनास्लू परिक्रमेसाठी परिसराचा अभ्यास आणि दिवसांचे गणित मांडावे लागते. मुक्कामाची गावे ठरवणे, पैशांची जमवाजमव आणि नेपाळ सरकारच्या परवानग्यांचा सोपान पार करत राजधानी काठमाण्डूत पोहोचायचे. ट्रेकिंग एजन्सीकडून गाइड आणि पोर्टर्स घेणे बंधनकारक आहे. सशुल्क परवानेही घ्यावे लागतात.

काठमाण्डूपासून गोरखा जिल्ह्य़ातील आरुघाटपर्यंत गाडीरस्ता आहे. आता आरुघाट ते सोतीखोलाही गाडय़ा जातात. त्यापुढे मात्र दोन पायांचीच गाडी! घोडे आणि खेचरांचे तांडे ये-जा करत हे दळणवळणाचे एकमेव साधन. हे अश्वतांडे थेट लारक्यापास ओलांडून खाली धारापानी गावी गाडीरस्ता लागेपर्यंत साथ देतात.

मनास्लू परिक्रमा करणाऱ्यांवर ‘बुढी गंडकी’ नदीचं लक्ष असतं. नेपाळी भाषेत बुढी म्हणजे ‘सुंदर.’ तिच्या त्या खळखळण्याच्या तालावर आपली पावले पुढे सरकत असतात. ती कधी लांब, कधी खोल तर कधी स्पर्श करता येईल एवढी जवळ असते. बुढी गंडकी आणि तिला मिळणाऱ्या असंख्य प्रवाहांना ओलांडण्यासाठी अनेक झुलते पूल आहेत. जगत गावाच्या अलीकडे गंडकीचे पात्र चांगलेच रुंदावते आणि तिच्या एका भागातून डोंगरकडय़ाला लगटून फेब्रिकेटेड पुलासारखी वाट लागते. या ट्रेकला येणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकासाठी हा आकर्षण बिंदू असतो. हा पूल २०१५-१६ मध्ये स्वीस इंजिनीअर्सच्या मदतीने बांधण्यात आला. त्याआधी बुढीच्या प्रवाहातून विविध ठिकाणी लाकडी पूल लावलेले होते. बुढीचा प्रवास जसा फिरणार किंवा कमी-जास्त होत असे, तसा अंदाज घेऊन हे लाकडी पूल ओलांडावे लागत.

आपण जवळपास साडेआठ हजार किलोमीटर उंचीच्या मनास्लू शिखराच्या आजूबाजूने फिरत असतो तरीही ते आपल्याला सहज दर्शन देत नाही. जेव्हा दिसते तेव्हा आपण थक्क होऊन जातो. मनास्लूत मनाचा ठाव घेणारी चुंबकीय शक्ती आहे असे वाटत राहते. सूर्योदय, सूर्यास्ताला सोनेरी वर्खात चमकणारे मनास्लू दिवसभर चंद्राप्रमाणे शुभ्राळ रंग फेकते. लोह गावाजवळून मनास्लूच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्याआधी वीरेंद्र ताल (तलाव) जवळ विसावा घ्यावाच लागतो. तिथून मनास्लू शिखर न्याहाळताना अंतर्मुख व्हायला होतं. लारक्या पासकडे जाणारी वाट थेट आकाशाच्या दिशेने जाते आणि ट्रेकचा सर्वोच्च बिंदू असलेल्या या पासपाशी थांबते. पास ओलांडल्यानंतर पुढे भीमथांग गावापर्यंत मात्र ही वाट थेट पाताळात उतरत जावं अशी तीव्र आहे. शारीरिक क्षमतांचा कस पाहणारा हा ट्रेक रम्य वातावरणात शांततेचा अनुभव देतो.

गावे आणि आदरातिथ्य

* मनास्लू परिक्रमेत वरच्या गावांमध्ये राहणारी माणसे, निसर्गाशी जुळवून घेत कशी जगतात, हे पाहायला मिळते. प्रत्येक गावाच्या वेशीवर स्तुपाच्या आकाराचे प्रवेशद्वार असते. त्यावर बुद्धदेवतांची कथाचित्रं बघताना मनात कुतूहल निर्माण होतं. गावभर भिरभिरणाऱ्या पताकांवरच्या प्रार्थना वाऱ्यावर स्वार होऊन थेट आकाशातील देवापर्यंत पोहोचत असाव्यात.

*  इथे कुठल्याही घरात सुग्रास भोजनाबरोबर मिळणारे आदरातिथ्य थकवा दूर करते. तुम्ही जर मुंबईकर असाल, तर गप्पा अधिकच रंगतात. त्यांना मुंबईचे भलतेच आकर्षण असते. स्वच्छ, सुंदर, टुमदार गावांत मोकाट फिरणारे घोडे, खेचर, याक; जंगलांत नील सांबर, रान ससे, हिमबिबटे, अस्वले आणि पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती दिसतात. खालच्या भागातील खुरटी, आडवी आणि उंचच उंच दाट झाडी आणि वरच्या भागात गवताचे पातेही तगू न देणारे वातावरण अशा सृष्टीच्या वैविध्याचा अनुभव येत राहतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 3:32 am

Web Title: manaslu trek manaslu mountain information trekking in the manaslu region
Next Stories
1 लाल मांस आणि कैर सांग्री
2 टेस्टी टिफिन :  फ्युजन आप्पे
3 शहरशेती : आपला कचरा, आपलीच जबाबदारी
Just Now!
X