News Flash

मन:शांती : विचार- वर्तनोपचार पद्धती

त्यंत दु:खी नजरेने, खाली मान घालून रंजना माझ्या समोर बसली होती, रडत होती.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अद्वैत पाध्ये

अत्यंत दु:खी नजरेने, खाली मान घालून रंजना माझ्या समोर बसली होती, रडत होती. मला सांगत होती की ‘डॉक्टर, काय हो अर्थ या जगण्याला? माझ्याच्याने काहीच नीट होत नाही! मी काहीच करू शकत नाही.’

‘म्हणजे नक्की काय, जरा सविस्तर सांगाल का? ‘डॉक्टर लग्न झालंय इतक्या उशिरा. तेपण जमायला किती उशीर झाला. सतत नकार पचवले. माझ्यासारखी कमनशिबी मीच. लग्न होऊन या घरात आले, पण माझे नष्टचर्य काही संपले नाही. मला सतत बोलणी सहन करावी लागतात, तिघांची. आई (सासूबाई), सासरे, नणंद आणि आमचे हे म्हणजे अगदी आईच्या ताटाखालचं मांजर! घरात काम करायला आणि शरीरसुख उपभोगायला आणलेली जणू मला! मुलगा झाला पण परिस्थिती काही बदलली नाही. आता तर इच्छापण होत नाही, तरी जुलमाचा रामराम करावा लागतो. एक मुलगाच तेवढा फक्त आनंद देतो. माझं भाग्य कधी उजळणार नाही आणि माझ्या जगण्याला अधिकच काळा रंग येणार याची खात्री झाली आहे माझी. कशाला जगायचे असे विचार येतात मग माझ्या मनात. लग्नाआधीही कमनशिबी, सामान्य रूपाची, कशीबशी शिक्षण पूर्ण केलेली म्हणून आईवडिलांची नावडतीच होते. मी वाईटच आहे, कमनशिबी आहे,’ असं म्हणून रडायला लागली.

थोडक्यात त्यांना स्वत:विषयी, स्वत:च्या भविष्याविषयी पूर्णपणे नकारात्मक विचार येत होते. माझ्यामुळे सर्वाना त्रास होतो, मी कोणालाच आवडत नाही आणि माझं पुढेही भविष्य काही सुधारणार नाही ही जी विचारसरणी झाली होती ती त्यांचे नैराश्य वाढवतच होती.

१९५० पासून सातत्याने या विषयावर अभ्यास करणाऱ्या डॉ. अ‍ॅरन बेक या पेनिनसिल्वानिया विद्यापीठातील मनोविकार विभागाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले होते आणि १९६७ मध्ये बौद्धिक विचारवर्तन सिद्धांत मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वत:विषयी, स्वत:च्या आजूबाजूच्या लोकांविषयी आणि भविष्याविषयी नकारात्मक विचार ही त्रिसूत्री नैराश्य कायम ठेवायला वा वाढवायला कारणीभूत ठरते. त्यामुळे या विचारांना ओळखणारी व बदलणारी, त्यातून होणारे वर्तनही बदलणारी बौद्धिक विचार वर्तनोपचारपद्धती म्हणजे सीबीटीचा (Cognitive Behavior Bherepy) पाया त्यांनी रचला. अ‍ॅरन बेक यांची ही उपचारपद्धती अल्बर्ट एलिस यांच्या पद्धतीशी थोडी मिळतीजुळती आहे. ही उपचार पद्धती विकसित करताना बेक यांच्यावर केली, लॅझॅरस, लेविन्सन या मानसशास्त्रज्ञांच्या तत्त्वांचापण प्रभाव होता.

बेक यांच्या मते कोणतीही घटना / परिस्थितीला सामोरं जाताना काही तात्कालिक विचार/प्रतिक्रिया उमटते आणि त्यातून पुढील भावनिक, वार्तनिक आणि शारीरिक परिणाम होत असतात. बऱ्याचदा निराश अवस्थेत माणसाच्या मनात विचार येतात, मला यश मिळत नाही म्हणजे मी एक अपयशी माणूस आहे. स्वत:ला लेबल्स चिकटवली जातात, जसं मगाशी वर सांगितलेल्या उदाहरणात दिसते. मी कमनशिबी आहे, मी पराभूत आहे. बऱ्याचदा चांगले काम करूनही असे म्हटले जाते की ते केवळ नशिबामुळे घडले त्याचा अर्थ असा नाही की मी सक्षम आहे! किंवा उगाचच भावनिकतेने कारणं दिली जातात, की मी चांगलं काम करू शकत असलो तरी खरंतर मी अपयशीच आहे.

काही वेळा ‘राईचा पर्वत’ किंवा ‘पराचा कावळा’ केला जातो किंवा काही वेळा एखाद्या व्यक्तीचा आलेला वाईट अनुभव सर्वसाधारण समजला जातो म्हणजे एखादी क्यक्ती वाईट वागली, भांडण झाले आणि ती व्यक्ती पुरुष असेल तर सर्वच पुरुष वाईटच असतात, असे म्हटले जाते.

एखाद्याची जवळची व्यक्ती मृत्यू पावली तर नंतर तिचा मृत्यू माझ्याचमुळे झाला, मीच तिच्यासाठी योग्य ती काळजी घेतली नाही, असे अपराधी विचार येतात. मी चुकू शकतो हे मला मान्यच नाही. मी कायम बरोबरच असलो पाहिजे, अचूकच असलो पाहिजे, असे विचार. मुलाला एखाद्या विषयात कमी गुण मिळाले, बाकी विषयात चांगले मिळाले तरी ते का कमी मिळाले, त्याचे शिक्षकच त्याला नीट शिकवत नाहीत असा विचार करणे. असे सर्व तात्कालिक विचार येतात आणि येत राहतात. इतरही विविध मानसिक आजारांत असे विविध विचार येतात, तेपण अ‍ॅरेन बेक यांनी मांडून ठेवले आहेत.

मग जेव्हा असे विविध आजार घेऊन व्यक्ती समुपदेशनासाठी येते, त्या वेळी त्याचे असे विचार त्याला शोधून लिहायला सांगितले जातात. त्यामागचा मूळ नकारात्मक विचार आणि त्यावरून केले गेलेले अंदाज, मते शोधून काढली जातात. त्यासाठी व्यक्तीने कोणत्या चुकीच्या समायोजन शैली वापरल्या त्याचा विचार वा शोध घेतला जातो.

प्रत्येक समुपदेशन सत्रामध्ये वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये येणारे विचार शोधून त्या वेळच्या भावना, वर्तन यांचा विचार करून त्याप्रमाणे योग्य विचार कसा असावा यासाठी मार्गदर्शन केले जाते आणि त्याप्रमाणे वर्तनात बदल आणण्यासाठी वर्तनोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.

नैराश्य, चिंता, व्यसने, स्किझोफ्रेनिया, व्यक्तिमत्त्व दोष यांसारख्या विकारांत ही पद्धती यशस्वीपणे राबवली गेली आहे. अर्थात औषधोपचाराच्या जोडीने! अर्थात व्यक्तीचे मनापासून सहभागी होणे आणि सातत्य ठेवणे हेपण तितकेच महत्त्वाचे असते.

Adwaitpadhye1972@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 4:15 am

Web Title: mann shanti article by dr advait padhye
Next Stories
1 गाडी सव्‍‌र्हिसिंगला देताना..
2 सॅलड सदाबहार : पंचमी सॅलड
3 एक पाऊल पुढे
Just Now!
X