‘यू आर अनएज्युकेटेड पीपल, यू आर व्हिलेजर्स, यू डोण्ट नो इव्हन ऑफिशिअल लँग्वेज,’ असे गृहस्थाने म्हटल्यावर प्रणव चिडला! प्रणव त्या गृहस्थाजवळ गेला व म्हणाला, ‘सर इन विच स्टेट यू आर लिव्हिंग, दिस इज स्टेट ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅण्ड मराठी इज ऑफिशिअल लँग्वेज हीअर. ऑल पीपल हू आर वर्किंग हीअर आर महाराष्ट्रीअन, इफ यू आर लिव्हिंग यू शुड लर्न इट.’

मराठी भाषा दिनाचा उत्साह कार्यक्रमांपेक्षा समाजमाध्यमांवर जास्त दिसून आला. अनेकांनी आपले मराठी भाषाप्रेम पोस्ट आणि स्टेट्सद्वारे व्यक्त केले. समाजमाध्यमांनी तरुणाईला मराठी भाषेत विचार व्यक्त करायचे मुक्त व्यासपीठ उपलब्ध केले आहे. या व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या विचारांमध्ये मराठीचा अभिमान प्रकर्षांने जाणवत होता. यातील असे अनेक तरुण आहेत ज्यांनी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले आहेच पण तरीही संधी मिळेल तिथे ते आवर्जून मराठी बोलतात. गरज असेल तिथे इंग्रजी बोलूच पण योग्य ठिकाणी मराठीचाही तितकाच अभिमान बाळगू, अशा अनेक प्रतिक्रिया तरुणांकडून येत असतात.

मराठीचा अभिमान बाळगतो असं म्हणणारे अनेक असतात, पण आपल्या मातृभाषेचा अपमान सहन न झाल्यावर समोरच्याला परखड भाषेत सुनावणारे थोडकेच. प्रणव देशमुख हा त्यापैकीच एक. आईबरोबर प्रणव मॉलमध्ये गेला होता. सगळी खरेदी झाल्यावर रांगेत पैसे देण्यासाठी तो उभा होता. तितक्यात भांडणाचा आवाज येऊ लागला. सुटाबुटातला एक गृहस्थ त्या रक्कम जमा करणाऱ्या तरुणाला इंग्रजीत काहीतरी सुनावत होता. बिलात झालेल्या गोंधळाबाबत हे संभाषण सुरू होते. सुटाबुटातल्या त्या गृहस्थाला मराठी बोलता येत नव्हते आणि त्या रोकड जमा करणाऱ्या तरुणाला इंग्रजी समजत नव्हते. प्रणव हे सगळं लांबून पाहत होता. आता त्या गृहस्थाने व्यवहाराचा मुद्दा बाजूला ठेवून तरुणाच्या भाषेविषयी बोलायला सुरुवात केली. ‘यू आर अनएज्युकेटेड पीपल, यू आर व्हिलेजर्स, यू डोण्ट नो इव्हन ऑफिशिअल लँग्वेज,’ असे गृहस्थाने म्हटल्यावर प्रणव चिडला! प्रणव त्य गृहस्थाजवळ गेला व म्हणाला, ‘सर इन विच स्टेट यू आर लिव्हिंग, दिस इज स्टेट ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅण्ड मराठी इज ऑफिशिअल लँग्वेज हीअर. ऑल पीपल हू आर वर्किंग हीअर आर महाराष्ट्रीय, इफ यू आर लिव्हिंग यू शुड लर्न इट.’ प्रणवच्या या बोलण्यावर तिथे असलेल्या प्रत्येक मराठी नागरिकांनी टाळी दिली. मग काय मराठी भाषेसाठी झाली ना प्रणवची कॉलर टाईट. वर्षभरापूर्वीची ही घटना सांगताना आजही प्रणवला तितकाच अभिमान होता.

मराठी बोलण्यासाठी ‘महाराष्ट्रीय’ असण्याची गरज असते असे नाही. मुळात कुठलीही भाषा शिकण्यासाठी विशिष्ट धर्माचे असणे बंधनकारक कधीच नसते. भाषेविषयी असणारे नितांत प्रेम आणि भाषा शिकण्याची ओढ आपल्याला त्या भाषेत बोलतं करते. मूळच्या उत्तर प्रदेशहून आलेल्या पण मराठीला आपलंस केलेल्या अश्विनी शर्मा हिची कथा हेच सिद्ध करते. अश्विनी मराठी भाषेच्या प्रेमासाठी हट्टाने मराठी माध्यमात शिकली. महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच कलावंत म्हणून घडण्यासाठी लागणारे अनेक पैलू तिच्याकडे होते. सुबक रांगोळी काढणारी ती मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवर विजेती ठरली. तिच्या रांगोळी साकारण्यातही मराठी भाषेचा आविष्कार पाहायला मिळतो. एक दिवस महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत भाषण देण्यासाठी उभी राहिली. स्पष्टपणे आपले मुद्दे आत्मविश्वासाने मांडत आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाने तिने श्रोत्यांची मनेजिंकली होती. त्या स्पर्धेची विजेती ठरल्यावर निवेदकाकडून नाव उच्चारले गेले अश्विनी शर्मा. अमराठी असूनही तिच्या अस्खलित मराठी बोलण्याला श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. मराठी बोलण्यासाठी पहिल्यांदा त्या वेळेला मिळालेले श्रोत्यांचे प्रोत्साहन याविषयीची आठवण सांगताना मराठी भाषेविषयीची आश्विनीची ओढ जाणवते. अनेक श्रोत्यांसमोर मराठी बोलण्यासाठी आश्विनीची सुरुवात झाली आणि तिच्या मराठी बोलण्याला तिच्या मित्रमैत्रिणींनी मनापासून आपलेसे केले. कुटुंबात असताना हिंदी भाषेत बोलणारी आश्विनी मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात कायम मराठीच बोलताना दिसते. याविषयी बोलताना आश्विनी आनंदाने सांगते, ‘मराठी भाषेला आपलेसे केल्यावर मी खूप माणसे जोडली.’

पार्ले टिळक विद्यालयात मराठी माध्यमात शिकलेली सिद्धी आंगोलकर मार्केटिंग क्षेत्रात काम करताना दररोज अनेक अमराठी ग्राहकांना भेटते. या क्षेत्रात संवादकौशल्य आणि विशेषत: इंग्रजीला प्रचंड महत्त्व असल्याचं सिद्धी सांगते. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे सुरुवातीला अस्खलिखित इंग्रजी बोलता येतं नव्हतं, पण नंतर सरावाने कोणताही उच्चाराचा गोंधळ न घालता उत्तम इंग्रजी बोलते असं सिद्धी सांगते. पण सिद्धीला तिच्या व्यवसायातील काही गोष्टी पटत नाहीत. तिचे काही सहकर्मचारी स्वत: मराठी असूनही मराठी ग्राहकांशी, सहकर्मचाऱ्यांशी, कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी इंग्रजीतूनच बोलण्याचा अट्टहास करतात. पण तिच्या मते जिथे शक्य आहे तिथे आपण मराठीत बोलायला काय हरकत आहे. अनेकदा काही मराठी ग्राहक मराठीतच बोलण्याचा अट्टहास करतात त्या वेळी खरंतर तिला आनंद होतो. मातृभाषेत संवाद साधल्यामुळे गोष्टी समोरच्याला समजावणे सोपे जाते असं ती म्हणते. आपण मराठी आहोत हे सांगितल्यावर त्यांच्या मनातही आपल्याविषयी आपुलकीचे नाते तयार होते आणि भविष्यात कोणत्याही मदतीसाठी ते केवळ आपल्यालाच संपर्क करतात असेही सिद्धीने नमूद केले. लुक डिझायनर हे तसे करिअरच्या दृष्टीने अद्याप अनोळखीच क्षेत्र पण या क्षेत्रात प्राजक्ता तांडेल नावाची तरुणी काही उत्तम डिझाइन तयार करते. प्राजक्ता म्हणते माझ्याकडून लुक डिझाइन करून घेणारे ग्राहक हे उच्चभ्रू वर्गातील असतात. त्यामुळे आमच्या बैठकाही उच्चभ्रू रेस्टॉरंट अथवा कॉफी शॉपमध्ये होतात. अशा वेळी मी ग्राहकांशी जरी इंग्रजीतून संवाद साधत असले तरी ज्या रेस्टॉरंटमध्ये मी गेले आहे तेथील कर्मचारी वर्ग जर मराठी असेल तर मी आपसूकच मराठी बोलते आणि मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. मला माझ्या मातृभाषेचा अभिमान वाटतो आणि त्याचा उपयोग माझ्या कामातही व्हावा म्हणून मी नेहमी प्रयत्नशील असते.

संकलन : किन्नरी जाधव, अश्विनी पारकर, अक्षय जाधव