गेले दहा महिने खरेदीदारांकडून मागणी नसलेल्या वाहन विक्रीच्या घसरणीचा क्रम सप्टेंबर महिन्यातही कायम राहिला. कार उत्पादक कंपन्यांनी दसरा, दिवाळी या मोठय़ा सणांच्या पाश्र्वभूमीवर सवलतींचा गिअर टाकला, मात्र तरीही उठाव दिसूनआला नाही.

आघाडीच्या मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री २६.७ टक्क्यांनी रोडावत १.१२ लाखांवर येऊन ठेपली. मात्र मारुतीने ही मरगळ झटकून काढण्यासाठी सवलतींबरोबर गेल्या आठवडय़ात आपल्या कारच्या किमतीही कमी केल्या आहेत. सप्टेंबरमध्ये याचा काही परक पडला नाही, मात्र दसरा-दिवाळीत उठाव मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.

गेले दहा महिने वाहन उद्योगाला, त्यातही कार उत्पादक कंपन्यांना आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला आहे. देशातील कार उत्पादनात व विक्रीत आघाडीची कंपनी असलेल्या मारुती सुझुकीलाही मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून मारुती सुझुकी सातत्यानं उत्पादन कमी कमी करतेय. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या निर्मितीत ३३.९९ टक्क्यांनी कपात केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १ लाख ६८ हजार ७२५ गाडय़ांची निर्मिती करणाऱ्या मारुतीनं या वेळी १ लाख ११ हजार ३७० कार तयार केल्या. विक्रीमध्येही गेल्या ऑगस्टच्या तुलनेत ३२.७ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये मारुतीनं १,०६,४१३ कार विकल्या. गेल्या वर्षी कार विक्रीचा आकडा १,५८,१८९ इतका होता. ऑल्टो, वॅगन आर या मिनी कारची विक्री तर ७१ टक्क्यांनी घटली आहे. कॉम्पॅक्ट कार या वर्गात मोडणाऱ्या स्विफ्ट, इग्निस, बलेनो आणि डिझायर यांच्या विक्रीतही २३ टक्क्यांची घट झाली. मारुती सुझुकी सियाजची फक्त १ हजार ५९६ युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ही संख्या ७ हजार इतकी होती. या पाश्र्वभूमीवरच कंपनीला हरियाणातील दोन्ही प्लान्टमध्ये दोन दिवसांचा ‘नो प्रॉडक्शन डे’ घोषित करावा लागला. २०१२ नंतर गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच ‘मारुती’ला आपल्या गाडय़ांचं उत्पादन बंद ठेवावं लागलं आहे. त्यात पुढील वर्षी ‘बीएस ६’ नियम लागू होणार असल्याने कार कंपन्या त्या कार विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. ३१ मार्च २०२० नंतर उत्पादक ‘बीएस ४’ इंजिन असलेल्या कारची विक्री करू शकणार नाहीत़. मारुती सुझुकी नवीन बीएस ६ इंजिनसह कार बाजारात आणत आहे. मात्र त्यांच्याकडे बीएस ४  कारचा साठाही मोठा शिल्लक आहे. त्यामुळे जर ‘बीएस ४’ मॉडेलच्या कार शिल्लक राहिल्या तर त्या फेकून द्याव्या लागणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री २६.७ टक्क्यांनी रोडावत १.१२ लाखांवर आली आहे. ऑगस्ट महिन्यात १.०६ लाख कारची विक्री केली होती. सणांच्या पाश्र्वभूमीवर जाहीर केलेल्या सवलतींमुळे काहीसे आशादायी चित्र दिसत आहे. कार विक्रीत झालेली वाढ ही उल्लेखनीय नाही, मात्र पुढील दोन महिन्यात यात खरेदीदार वाढतील अशी आशा कंपनीला आहे. जीएसटी दरातील कपातीच्या पाश्र्वभमीवर भूमीवर इतर कार उत्पादक कंपन्यांनी किमती कमी करण्याच्या बाबतीत धोरण जाहीर न करता सावध पवित्रा घेतला असताना पहिले पाऊल टाकत आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत.  मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत कधीही तडजोड केल्याचे ऐकिवात नाही. मात्र आर्थिक मंदीमुळे निर्माण झालेली ही मरगळ दूर करण्यासाठी तसेच पुढील दसरा, दिवाळी सणांचा काळ असल्याने कंपनीने सवलतींचा गिअर टाकला असून जीएसटी दरात कपातीचे कारण सांगत नुकत्याच गाडय़ांच्या किमतीही कमी केल्या आहेत. मारुती सुझुकीने ५० ते ६५ हजारांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. तर कारच्या किमतीत ५ हजार रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.

या नवीन किमती २५ सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या आहेत. यात ऑल्टो ८००, ऑल्टो के १०, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या कारचा समावेश आहे.

यात बलेनो आरएस या कारची किंमत तर एक लाखाने कमी करण्यात आली आहे. या मॉडेल्सशिवाय, कंपनीच्या इतर कार आणि डिजायर, स्विफ्ट आणि बलेनोच्या पेट्रोल मॉडेल्सच्या किमतीत कोणतीही कमी करण्यात आलेली नाही. कंपनीने कार खरेदी करणाऱ्यांना कॉर्पोरेट करात झालेल्या कपातीचा फायदा दिला आहे. कॉर्पोरेट करात झालेल्या कपातीनंतर कंपनीने कारच्या किमती कमी करण्याची पहिली घोषणा केली आहे. किमतीमध्ये जी कपात करण्यात आली आहे, ती कंपनी डीलरशिपवर मिळणाऱ्या प्रमोशनल सवलतींशिवाय आहे. किमती कमी झाल्याने खरेदीदार वाढतील तसेच सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढेल असा कंपनीला विश्वास आहे.