|| बापू बैलकर

आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसत आहे. त्यात कारच्या विक्रीत तर प्रचंड घट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात कार विक्रीत ३०.८७ टक्के घट आली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी आता ही मरगळ हटवन्यासाठी सवलतींचा ‘टॉप गिअर’ टाकला आहे. एक, दोन लाखांपर्यंत काही कंपन्यांनी सवलत जाहीर केली आहे.

गेली दहा महिने वाहन उद्योगात आर्थिक मंदीचा परिणाम जाणवत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात देशभरात जवळपास २२.४५ लाख वाहनांची विक्री झाली होती. यंदाच्या जुलै महिन्यात हे प्रमाण १८.२५ लाख वाहनांवर घसरले. म्हणजे १८.७१ टक्क्यांची ही घट झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ लाख ८३ हजार ६९६ कारची विक्री झाली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये १ लाख ९६ हजार १२० कारची विक्री झाली. म्हणजे कार विक्रीत ३०.८७ टक्के इतकी घट आहे. यावरून प्रवासी वाहनांच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यावर्षी विक्री कमी झाली आहे. मारुती सुझुकी ३६.१४, ह्य़ुंदाई १६.५८, महिंद्रा आणि महिंद्रा ३१.६४, टाटा मोटर्स ५७.८४, होंडा ५१.२९, टोयोटा २४.११, फोर्ड ३१.४०, रेनॉल्ट १३.०७, निसान ५४.५४, वॉक्सवॅगन ३०.८३, फियाट ५६.५०, स्कोडा १२.४८ टक्के इतकी टक्के कार विक्रीत घट झाली आहे.

वाहन उद्योगामध्ये मंदी असली, तरी अद्याप मरगळ आलेली नाही. नवनवीन मोटारी बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मागणी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. पण केव्हा ना केव्हा तिला पुन्हा उभारी येईल आणि मालाला उठाव मिळेल, अशा अपेक्षेवर उत्पादक कंपन्या आहेत. यामुळेच नवीन मोटारींची घोषणा होणे किंवा नवीन कार बाजारात येणे अजिबात थांबलेले नाही. तसेच उठाव मिळावा म्हणून कार उत्पादक कंपन्यांनी सवलतींचा वर्षांव करायला सुरुवात केली आहे. त्यात पुढील वर्षी ‘बीएस ६’ नियम लागू होणार असल्याने कार कंपन्या त्या कार विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. ३१ मार्च २०२० नंतर उत्पादक ‘बीएस ४’ इंजिन असलेल्या कारची विक्री करू शकणार नाहीत़. त्यामुळे जर ‘बीएस ४’ मॉडेलच्या कार शिल्लक राहिल्या तर त्या फेकून द्याव्या लागणार आहेत. यामुळे विविध सवलती देत हा साठा संपविण्याचा प्रयत्न आहे.

मारुती-सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्य़ुंदाई, टाटा मोटर्ससारख्या दिग्गज कंपन्यानी आपल्या विविध कारवर सवलतींचा धडाका लावला आहे. ग्राहकांच्या आकर्षणासाठी बहुतेक कार कंपन्यांनी वाहन विम्याचाही आधार घेतला आहे. काही कंपन्यांनी एक्स्चेंज ऑफर्सवर भर दिला आहे. विमा आणि एक्स्चेंजच्या माध्यमातून ग्राहकांना हजारो रुपयांची सवलत देऊन कार विक्रीचा वेग वाढवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ही उत्तम वेळ आहे.

मारुती सुझुकी ३० हजारापासून सव्वा लाखांपर्यंत सवलत देत आहेत. होंडानेही ४२ हजारांपासू चार लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. ह्य़ुंदाईनेही ४० हजार ते ८० हजारापर्यंत सवलत जाहीर केली आहे. कार उत्पादक कंपन्या सणांच्या काळात पाच ते सात टक्केपर्यंत सवलत देतात. मात्र आता दुपटीने सवलत वाढवली आहे. टोयोटा यारीसने तर २९ टक्केपर्यंत सूट जाहीर केली आहे.

रेनो आणि निसान

या दोन कंपन्यांनी त्यांच्या प्रसिद्ध कार कॅप्चर आणि किकची किंमतही दीड लाख रुपयांनी कमी केली आहे. ही सर्व सूट ‘बीएस ४’ मानक मॉडेलवर देण्यात येत आहे.

टोयोटा

जपानी वाहन निर्माता टोयोटा त्यांच्या लोकप्रिय सेडान यारीस खरेदीवर अडीच लाखंपर्यंत सवलत देत आहे. अलीकडेच कंपनीने टोयोटा यारीस नवीन डय़ुअल टोन कलरमध्ये आणले आहे. या कारची किंमत ८.६५ लाख ते १४.०७ लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी 

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी नवीन बीएस ६ इंजिनसह कार बाजारात आणत आहे. मात्र त्यांच्याकडे बीएस ४  कारचा साठाही मोठा शिल्लक आहे. तो साठा संपवण्यासाठी तसेच बाजारात मंदी असल्याने कंपनीने आपल्या गाडय़ांवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉपरेरेट सूट (अटी व नियम लागू करून) देत  ३०,००० ते १.२ लाख रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. ज्यामध्ये अल्टो ते लक्झरी सेडान सियाझपर्यंतच्या सर्वच गाडय़ांचा समावेश आहे.

 ह्य़ुंदाई

दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता कंपनी ह्य़ुंदाईनेही हॅचबॅक कार ग्रँड आय १० वर संपूर्ण १६ टक्के सूट देत आहे. ह्य़ुंदाई सँट्रो खरेदी केल्यास ४०,००० रुपये वाचू शकतात. सोबत ग्रँड आय १०च्या खरेदीवर ८५,००० हजरांपर्यंत सूट मिळू शकते.

होंडा

कंपनी आपल्या होंडा सीआरव्हीवर जास्तीत जास्त ४ लाख रुपयांची सूट देत आहे. दुसरीकडे, होंडा बीआर-व्ही खरेदीवर एक लाखापर्यंतची बचत होऊ शकते. यात रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉपरेरेट सूट देखील समाविष्ट आहे. कंपनी आपल्या इतर मोटारींवर ४२ हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे.

ऑनलाइन कंपन्यांकडूनही ‘ऑफर’ ड्रूमतर्फे ‘ऑटो मेळा’

सध्या कार खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन मंचही उपलब्ध आहे. अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक करून कार खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन कंपन्या स्थापित केल्या आहेत. त्यांनाही मंदीचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही काही ‘ऑफर्स’ येत आहेत. ‘ड्रूम’ने ‘दिवाळी ऑटो मेळा’ची घोषणा केली. हा सेल ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत चालणार आहे. या मेळ्यात दररोज एक दुचाकी ९९९ रुपयांत, दर आठवडय़ाला एक कार ९,९९९ रुपयांत आणि दर महिन्याला एक लक्झरी कार ९९,९९९ रुपयांत विक्री करण्यासह विमा प्रीमियममध्ये १५ टक्केपर्यंत कॅशबॅक आणि ७५ टक्केपर्यंत सूट देण्यात येत आहे. शिवाय जे ग्राहक ईएमआयद्वारे पैसे भरतील त्यांना पहिले ३ महिने ईएमआय नाही. याव्यतिरिक्त कर्ज किंवा विमा घेणाऱ्या ग्राहकांना प्रोसेसिंग फी ‘ड्रूम माइल्स’मध्ये परत दिली जाणार असल्याचे कंपनीतर्फे दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.  -bapu.bailkar@gmail.com