|| प्रशांत ननावरे

ह्य़ुज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने १८५० साली माथेरान हे ठिकाण शोधून काढलं आणि मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानची पायाभरणी केली. माथेरान हे कायमच ट्रेकर्स आणि प्रेमी युगुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. शिवाय थंड वातावरणामुळे अनेक कुटुंबं एक-दोन दिवसांच्या सहलीसाठी इथं येतात.

माथेरानमध्ये अनेक लहान-मोठी हॉटेल्स आहेत. छोटय़ा टपऱ्या आहेत. तिथं तुम्हाला वडापाव, मॅगीपासून संपूर्ण जेवणाचे पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला काही तरी विशेष खायचं असेल तर १९७८ सालापासून सेवेत असलेल्या ‘शब्बीर भाई बिर्याणीवाला’ला भेट देणं अपरिहार्य आहे. शब्बीर भाईची बिर्याणी असं उच्चारलं तरी कुणीही तुम्हाला त्यांचा पत्ता सहज सांगतं. मुख्य बाजारातील मशिदीच्या मागच्या बाजूला शब्बीर भाईचं छोटेखानी हॉटेल आहे. इथला मेन्यू बराच मोठा असला तरी नावाप्रमाणेच इथली बिर्याणी प्रसिद्ध आहे. अतिशय चांगल्या प्रतीचा तांदूळ, योग्य पद्धतीने आणि योग्य तापमानाला शिजवलेलं मांस (चिकन आणि मटण) यांचं उत्तम मिश्रण म्हणजे ही बिर्याणी! मुख्य म्हणजे ही बिर्याणी फार मसालेदार नाही. खरं तर मसाल्यांची मात्रा योग्य प्रमाणात असल्यामुळेच भात मसाल्यांवर आणि मसाले भातावर कुरघोडी करताना दिसत नाही. कुठल्याही बिर्याणीची प्रत ती कशाच्या तरी (रायता, चटणी) सोबत खावी लागते का यावरून ठरते. ज्या बिर्याणीला सोबतीची गरजच भासत नाही, ती उत्तम बिर्याणी! ‘शब्बीर भाई’ची बिर्याणी या वर्गातली आहे.