प्रफुल्ल पाटील

पुस्तक जीवन बदलू शकतं. पुस्तक मित्र होऊ शकतं. वाटाडय़ा होऊ शकतं. काहींचं जीवन पुस्तकांनी घडवलं. अवांतर वाचनाचा ध्यास हा तो मार्ग. उनाडक्या करणारं आयुष्य सरत गेल्यावर एक ‘मॅच्युअर’ तरुण अशी जेव्हा स्वत:ची ओळख स्वत:ला होते. तेव्हा खऱ्या अर्थाने बदलास सुरुवात होते. तरुणतरुणींमधला या बदलाचा पट उलगडून दाखविणारे सदर दर बुधवारी.

या विषयावर लिहायला सुरुवात केली आणि लिहायचं काय हा प्रश्नच पडला? मी मूळचा धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला एका छोटय़ाशा खेडेगावातला. पहिले ते चौथी गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यानंतर पाचवी ते थेट पदवी शिक्षण हे साक्रीलाच झाले. त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा योग आला नाही. पण दहावी झाल्यानंतर मी उगाच काहीतरी मोठा झालोय असं वाटायला लागलं होतं. या वयात जसे शारीरिक बदल होतात, तसेच वैचारिक बदलही होण्याचे हे दिवस असतात हे मी अनुभवलं आहे. म्हणजे दहावीपर्यंत फक्त उनाडक्या आणि इतर गोष्टीत रमायला आवडत असणारा मी, आता थोडा मोठा झालोय असं मला वाटायला लागलं होतं. मला चांगलं आठवतंय..अवांतर वाचन करणे हे शालेय जीवनात असताना खूप जिवावर यायचं. म्हणजे शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी घरी होती. ती वाचायला सुरुवात केली आणि तब्बल दोन महिन्यांनी ती संपली होती. पण पहिल्यांदाच म्हणजे अकरावीत आल्यावर मनीषा टिकेकर यांचं ‘कुंपणा पलीकडला देश : पाकिस्तान’ हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवलं होतं. त्याआधी पाकिस्तान म्हणजे भारताचा एक कायमचा शत्रू हे माझं मत होतं पण ते पुस्तक वाचून हे मत पूर्णत: बदललं. अनेक राजकीय जाणिवा तयार झाल्या. गावात असल्यामुळे जाती-जातींमध्ये असणारे हेवेदावे जरा जास्त समजायला लागले होते. कॉलेजच्या काळात प्रदीप पाटील म्हणून एक शिक्षक आम्हाला गणित शिकवायला होते. ते गणितासारखा रटाळ विषय इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवायचे ना की, एकदा शिकवलं म्हणजे समजलंच. अशा मान्यवर शिक्षकांविषयी आदर वाटायला लागला. अरुण शेवते संपादित ‘नापास मुलांचे प्रगती पुस्तक’ हे पुस्तकही त्याच काळात मी वाचलं होतं. आठवी-दहावीच्या वर्गात असताना बातम्या हा प्रकार मला टाइमपास वाटायचा. तो कॉलेज जीवनात आल्यावर अतिशय महत्त्वाचा वाटायला लागला. पुढे याच जाणिवा प्रगल्भ होत एक उत्तम माणूस होण्याच्या प्रक्रियेला हातभार लावू लागल्या. नरेंद्र जाधव सर आले त्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटनांचा उल्लेख करत भाषण केलं. तेव्हापासून मी विचारवंतांना ऐकू लागलो.

सामाजिक परिस्थितीकडे

बघण्याचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने निर्माण झाला तो कॉलेज जीवनातच. बऱ्याच खटकणाऱ्या गोष्टी बदलाव्या असं वाटत होतं. त्यामुळे सामाजिक प्रश्नांचा अभ्यास सुरू केला. पण सायन्सला असल्यामुळे कॉलेजचे लेक्चर, प्रॅक्टिकल यांमुळे या अभ्यासावर मर्यादा येत होत्या. त्यानंतर बी.एस्सी.ला जाईपर्यंत अनेक प्रश्नांकडे डोळसपणे पाहायला शिकलो. पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.