मयूरेश शिर्के, रेडिओ जॉकी

‘आरजे’ असल्यामुळे प्रसंगावधान राखावे लागते. या वेळी ताण येणे साहजिक आहे. मात्र माझ्यासाठी ताण हा शब्दच निर्थक आहे. एखाद्या सोप्या गोष्टीचा जितका ताण घेतो तितकी ती गोष्ट कठीण होते. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. ताण न घेता मन आणि बुद्धी यांची सांगड घातली तर प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. ताण घेऊन गोष्टी बिघडविण्यापेक्षा ताण न घेता शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमीच खडतर वाट सोयीस्कर करतात.

ताण आल्यानंतर पाच गोष्टींच्या गुरुकिल्लीचा वापर मी करतो. कितीही ताण आला तरी सकारात्मक विचार करणे सोडत नाही. एखादा प्रसंग समोर उभा राहिल्यानंतर त्या प्रसंगातून चांगलेच घडणार आहे हे लक्षात ठेवतो. मुळातच एखादी गाडी सुटली आता घरी जायला उशीर होणार, असा विचार करण्यापेक्षा दुसऱ्या गाडीत कोणत्यातरी अनोळखी व्यक्तीची सोबत होईल आणि ओळख वाढेल, असा विचार करणे अधिक ससुह्य़ होते. स्वत:च्या श्वासावर नियंत्रण करणे जास्त गरजेचे असते. थायलंड येथील गुहेत अडकलेल्या मुलांनी एवढय़ा मोठय़ा कठीण प्रसंगात स्वत:ला वाचविण्यासाठी योग आणि प्राणायाम केला होता. एखादा प्रसंग घडल्यानंतर प्रसंग घडताच क्षणी तुम्ही कसा प्रतिसाद देता हे अतिशय महत्त्वाचे असते. पहिल्या दहा सेकंदात तुम्ही त्या प्रसंगावर पकड मिळविली की त्या प्रसंगातून निभावणे सहज शक्य होते.

मला आत्मचरित्र वाचण्याची सवय आहे. त्यामुळे माझ्यावर ओढवलेल्या एखाद्या कठीण प्रसंगात मी त्या व्यक्तीवर ओढवलेला कठीण प्रसंग आठवतो आणि त्या तुलनेत माझ्यावर आलेला प्रसंग अत्यंत मामुली आहे असे म्हणून ताणमुक्तीसाठी स्वत:चीच मदत करतो. ‘विंदा’ त्यांच्या एका कवितेत, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी असे म्हणतात. निसर्ग आपला गुरू आहे. हिरव्यागार निसर्गाचे वर्णन ऐकले की आपसूकच ताण हलका होतो.

खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे, सकस आहार घेणे या पर्यायांचा वापरही मी ताणमुक्तीसाठी करतो. नाटक, चित्रपटातून वास्तवाशी लढण्याचे बळ मिळते. यातूनही ताणमुक्ती होत असते.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान