25 February 2021

News Flash

वाढत्या वजनावरील उपाय

कमी खाणारे लोक सतत खाण्याच्या वस्तूंचा, विविध पाककृतींचा विचार करताना आढळतात.

राहा फिट : डॉ. अविनाश सुपे

वाढते वजन ही मोठी समस्या अनेकांच्या मनात घर करून असते. दर काही दिवसांनी नवीन डाएट करण्याच्या आपण मागे लागतो. कमी खाणारे लोक सतत खाण्याच्या वस्तूंचा, विविध पाककृतींचा विचार करताना आढळतात. त्यांच्या चर्चेतही ‘खाणे’, ‘हेल्दी फूड्स’, ‘डाएट फूड’ हा प्रमुख विषय बनतो. फावल्या वेळात वृत्तपत्रे, मासिके, टीव्ही, इंटरनेटवर याच विषयाची माहिती घेणे सुरू असते.

एखाद्या कुटुंबात सगळेच स्थूल असतात. आनुवंशिक गुणधर्मच तो. अशा व्यक्तीने वजन कमी करताना लक्ष्य निश्चित करताना वास्तववादी असले पाहिजे. वातावरणातील अनेक घटक उदा. कामाचे स्वरूप, खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. कामाच्या जागी अनेक मीटिंग, त्यात उत्तम प्रतीचे खाणे आणि ‘पिणे’सुद्धा असले की आपोआप वजन वाढीस लागते. दिवसभर केवळ बसून काम आणि शरीराची काहीच हालचाल न झाल्यास वजन नक्कीच वाढते.

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कायमस्वरूपी बदल घडवणे आवश्यक असते. उदा. तेलकट पदार्थ रोजच्या जेवणात नसणे. त्याचबरोबर आहार संतुलित असावा.  व्यायाम, शारीरिक हालचाल यासोबतच ताणतणाव कमी करण्यासाठी मित्र-मैत्रिणीकडे मन मोकळे करणे, फिरायला जाणे, छंद जोपासणे याचाही फायदा होतो.

वजन वाढण्यासाठी शरीरातील अनावश्यक कॅलरीज कारणीभूत ठरतात. म्हणूनच रोज आपण जेवणात किती कॅलरीज घेतो हे पाहा. शरीराला आवश्यक तेवढय़ाच कॅलरीज निर्माण होण्यासाठी जेवढे अन्न जरुरीचे असते तेवढेच सेवन करावे.

भरपूर पाण्याचे सेवन- प्रत्येक व्यक्तीने दिवसातून प्रति तीस किलोस एक ते दीड लिटर या प्रमाणात पाणी प्यावे, असे सांगितले जाते. म्हणजे सर्वसाधारण पन्नास किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने दीड ते दोन लिटर पाणी दिवसभरात प्यायला हरकत नाही. वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी भरपूर पाणी प्या.  सकाळच्या न्याहरीमध्ये अंडे खावे. शाकाहारी आहारात मूग डाळ डोसा किंवा ओट्स /सोया / पनीर यांचा समावेश असावा.

जंकफूड बंद – जंकफूड खात असाल तर, त्यावर मर्यादा आणाव्यात. हे सहजशक्य होणारे नसले तरी, वजन कमी करण्यासाठी मनावर ताबा मिळवावाच लागेल. कारण, जंकफूड हे शरीरात अतिप्रमाणात कॅलरीज निर्माण करते.

नियमित व्यायाम- कामाच्या वेळा, त्यातही शिफ्टमधले काम यांमुळे वेळेवर व्यायामशाळेमध्ये जाणे, व्यायाम करणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. तरीही, आपण घरच्या घरी दररोज किमान २० ते ३० मिनिटे एरोबिक व्यायाम करू शकतो. नियमित योग केला तरीही प्रकृतीसाठी चांगले असते.

 ग्रीन चहा किंवा ब्लॅक कॉफी (बिनदुधाची व बिनसाखरेची) प्यावी. जेवणात किंवा खाण्याच्या पदार्थामध्ये वरून तेल, मीठ व साखर घेणे टाळावे.

कमी कबरेदके असलेले पदार्थ जसे की मांस, कोंबडी, मासे (सॅल्मन, ट्राउट, हॅडॉक), अंडी, भाज्या- पालक, ब्रोकोली, फुलकोबी, गाजर, फळे :  सफरचंद, संत्री, नास्पती, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी; बदाम, अक्रोड, चीज, दही, नारळ तेल, लोणी, ऑलिव्ह तेल आणि फिश ऑइल याचा आहारात समावेश असावा. जेवणामध्ये फायबरचा वापर अधिक करा. सावकाश जेवा. फसफसणारी पेये किंवा फळांचे रस घेऊ  नयेत. बऱ्याचदा या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

अनेकदा सर्व पथ्ये पाळून, नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नाही. अशा वेळी घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन वाढत्या वजनावर उपाययोजना करणे शक्य आहे.

वजन कमी करण्याची सहा सूत्रे

  •  तुम्ही त्यासाठी वेळ देऊन वचनबद्ध राहिले पाहिजे. काही दिवस करून नंतर ते पथ्य न पाळणे योग्य नाही.
  • मनापासून प्रयत्न करा (अंतर्गत प्रेरणा असणे गरजेचे)
  •  वास्तववादी लक्ष्य निश्चित करा
  •  वरती उल्लेख केल्याप्रमाणे निरोगी पदार्थाचा आनंद घ्या.
  •  सक्रिय व्हा, सक्रिय राहा. हालचाल करत राहा.
  •  आयुष्याचा दृष्टिकोन बदला. नवीन सवयी या जीवन शैलीचा भाग बनल्या पाहिजेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:51 am

Web Title: measures on increasing weight akp 94
Next Stories
1 दिवाळीत वाहन उद्योग सावरला..पण आव्हान कायम
2 व्हिंटेज वॉर : ही गाडी कुणाची?
3 प्राचीन जलव्यवस्थापन सप्तेश्वर
Just Now!
X