News Flash

‘औषधांचे दुष्परिणाम’

वारंवार औषधे घेत राहिल्याने त्याचे रूपांतर व्यसनात होऊन दुष्परिणाम जाणवू शकतात.

|| डॉ. चिन्मय देशमुख

आपण वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधे घेत असतो. काही वेळा आजार होऊ नये म्हणून औषधे घेतली जातात. औषधे त्यांच्यात असलेल्या गुणधर्मानुसार प्रत्येक आजाराशी लढत असतात. परंतु औषधे घेताना काळजी न घेतल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. हे दुष्परिणाम कधी कधी घातक पण असू शकतात. औषधांची अयोग्य मात्रा, अवेळी घेतलेले औषध, चुकीचे औषध, दुसऱ्या औषधांबरोबर घेतलेले औषध, औषधांचा अतिवापर किंवा गरवापर अशी त्यांच्या दुष्परिणामांची काही करणे असू शकतात.

वारंवार औषधे घेत राहिल्याने त्याचे रूपांतर व्यसनात होऊन दुष्परिणाम जाणवू शकतात. तसेच एखादा उपचार वैद्यकीय सल्ल्याशिवाय मधेच थांबवला तरी त्याचे अघटित परिणाम दिसतात. बहुतेक वेळा दुष्परिणाम हे स्वत: घेतलेल्या चुकीच्या औषधोपचारांमुळेदेखील होताना दिसतात. सामान्यत: ते वृद्धांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.

औषधांचे दुष्परिणाम हे सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाचे असू शकतात. औषध पोटात गेल्यावर रक्तामधून ते संपूर्ण शरीरातील प्रत्येक भागाकडे पोचविले जाते. त्यामुळे त्यांचे कोणत्याही भागावर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामध्ये अतिसार, मळमळ, उलटी, निद्रानाश, रक्तस्राव, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी, जळजळ, घशातील कोरडेपणा, त्वचाविकार यांचा समावेश होतो. उदा. एँस्पिरिन हे रक्त पातळ ठेवणारे औषध जास्त घेतल्यावर नाकातून, कानातून, लघवीतून रक्तस्राव होऊ शकतो. इन्सुलिन हे रक्तशर्करा कमी ठेवणारे इंजेक्शन घेतल्यावर रक्तातील साखर प्रमाणापेक्षा खूप कमी होऊ शकते. त्यामुळे किडनी, मेंदू या अवयवांना धोका पोहोचू शकतो. रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या औषधांच्या अतिसेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. वेळीच योग्य तो उपचार केला नाही, तर अशा समस्या जिवावरही बेतू शकतात. औषधांच्या अतिवापराने किंवा अतिसेवनाने विषबाधा होऊन मृत्यूही ओढवू शकतो. बऱ्याच वेळा गरोदर स्त्रिया घेत असलेल्या औषधांचे दुष्परिणाम त्यांच्या बाळांवर होऊ शकतात. त्यात बाळाच्या हाडांची आणि अवयवांची वाढ थांबणे, बाळ अविकसित जन्माला येणे, बाळाचा अशक्तपणा व रोग, बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, बाळ वारंवार आजारी पडणे, बाळाचे मानसिक अनारोग्य असे विविध आजार दिसून येतात. आईच्या दुधातूनदेखील त्यांच्या बाळांवर औषधांचा परिणाम दिसून येतो.

औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी..

  • स्वत: औषधोपचार करणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे.
  • औषधांचा अयोग्य आणि अनुचित वापर टाळावा.
  • औषध योग्य मार्गाने, योग्य वेळी व दिलेल्या मात्रेने घ्यावे.
  • औषधांचे अतिसेवन टाळावे.
  • कोणतेही उपचार वैद्यकीय सल्ल्याशिवाय बंद करू नयेत.
  • औषध दिलेल्या वेळी नियमित घ्यावे.
  • डॉक्टरांना आधीच घेत असलेल्या औषधांची पूर्वकल्पना द्यावी.
  • गरोदर, स्तनदा महिला, वयोवृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
  • काही अकस्मात परिणाम दिसल्यास तातडीने डॉक्टरांना कळवावे.
  • औषधे मुलांपासून दूर ठेवावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:04 am

Web Title: medicine side effect akp 94
Next Stories
1 सण-उत्सवांसाठी सौंदर्य खुलवा!
2 वेगाचे वेड
3 सवलतींचा  ‘टॉप गिअर’
Just Now!
X