22 April 2019

News Flash

‘त्या’ दिवसांत ‘टेक’ काळजी!

पुढील पाळी कधी येणार त्याची अपेक्षित तारीख या अ‍ॅपद्वारे सांगितली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

दिशा खातू

महिलांना मासिक पाळीसंदर्भातील तारखांची आठवण करून देणारे, मासिक पाळीची लक्षणे सांगणारे अ‍ॅप महिलांमध्ये कमालीचा लोकप्रिय ठरत आहेत. केवळ तारखांचे स्मरण करून देण्यासाठीच नव्हे, तर ‘त्या’ दिवसांत कशी काळजी घ्यावी याच्या टिप्सही हे अ‍ॅप देतात.

भारतात स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे अ‍ॅप येऊ  लागले आहेत. मनोरंजन, माहितीपूर्ण प्रशिक्षणसंदर्भातील तसेच दैनंदिन वापरात साहाय्यक ठरणारे अनेक अ‍ॅप मोठय़ा प्रमाणात येत आहेत. त्यात आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या अ‍ॅपचाही समावेश आहे. अगदी पाणी कधी प्यावे इथपासून दिवसाला किती उष्मांक जात आहे याची माहिती देणाऱ्या अ‍ॅपचा समावेश आहे. आरोग्याशी संबंधित विविध अ‍ॅप्सचा वापर जवळपास २७.३ टक्के एवढा आहे. याच वर्गवारीत लोकप्रिय असलेले अ‍ॅप म्हणजे मासिक पाळीसंदर्भातील अ‍ॅप. मासिक पाळीच्या तारखा सांगणे, लक्षणे नमूद करणे केवळ इथपर्यंत हे अ‍ॅप मर्यादित नसून या अ‍ॅपमधील नोंदींच्या आधारे महिलांना आजार आणि त्यावरील उपचार यांचीही माहिती मिळू लागली आहे.

‘पीरिअड रेग्युलेटिंग अ‍ॅप’, ‘मेनस्ट्रअल अ‍ॅप’, ‘पीरिअड ट्रॅकर अ‍ॅप’ अशा विविध नावांनी हे अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. पुढील पाळी कधी येणार त्याची अपेक्षित तारीख या अ‍ॅपद्वारे सांगितली जाते. पाळी येण्याच्या १५ ते २० दिवस आधी हार्मोनमध्ये बदल होतात, अंडकोशातून स्त्रीबीज तयार होण्यापासून बाहेर पडण्यापर्यंतचा कालावधी (ओव्ह्य़ुलेशन), शरीरातील बदलांचे संकेत अ‍ॅपद्वारे दिले जातात. अ‍ॅपद्वारे महिलांचे आरोग्य कसे आहे आणि काय उपाय करायचे तेदेखील सुचवले जातात.

अशा अ‍ॅपचा वापर प्रामुख्याने शालेय-महाविद्यालयीन मुली व तरुणींकडून जास्त होताना दिसतो. सध्या धकाधकीच्या जीवनात मासिक पाळीच्या तारखा मागे-पुढे होत असतात. अशा वेळी आधीच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवणे आवश्यक असते. याकामी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतात. या अ‍ॅपचा सर्वाधिक वापर १४ ते ३० वयोगटांतील महिलांमध्ये दिसतो आहे. अ‍ॅप किती मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाले हे याची आकडेवारी अ‍ॅपवर प्रसिद्ध होत असते तसेच अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर वापरकर्त्यांची माहिती घेतात. त्यावरून समजते की, १४ ते ३० वयोगटांतील स्त्रियांची संख्या ९५ टक्के आहे, असे डिजिटल माध्यमतज्ज्ञ मोहन पवार यांनी सांगितले.

पाळीची नोंद

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सवर परिणाम होऊन थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएससारखे आजार होऊ  लागले आहेत. हे आजार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो. तसेच अनियमित मासिक पाळी, पायातून गोळे येणे, पोट दुखणे, अवेळी भूक लागणे, कोणता तरी पदार्थ सतत खावासा वाटणे, झोप न लागणे, ऊर्जेची पातळी कमी होणे, केस अधिक गळणे इत्यादी गोष्टी घडत असतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञ मयूरी जोशी यांनी सांगितले.

या अ‍ॅपमध्ये दर महिन्याच्या मासिक पाळीचा तपशील (रेकॉर्ड), शरीरातील बदलांची नोंद होत असते, असे अ‍ॅप विकसित करणाऱ्या ख्रि्रस्टिना डिसुझा हिने सांगितले. दर महिन्याला किमान ३ ते ५ मुली या अ‍ॅपच्या आधारे माहिती घेऊ न तपासणीसाठी येत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ मयूरी जोशी यांनी सांगितले.

अ‍ॅपच्या वापरात वाढ

मासिक पाळी अ‍ॅपच्या वापरात मागील दोन वर्षांत १२.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१५ साली ४.१ टक्के महिला याचा वापर करत होत्या, तर डिसेंबर २०१८ पर्यंत या वापरात १२.९ टक्क्यांनी वाढ झाल्याची दिसून येत आहे, असे डिजिटल माध्यमतज्ज्ञ मोहन पवार म्हणाले.

पूर्वी या अ‍ॅपबाबत तेवढी जागरूकता नव्हती, मात्र जसजसे इंटरनेट, स्मार्टफोनच्या वापरात वाढ झाली, सर्व काही मोबाइलवर अशा प्रकारची संकल्पना नव्या पिढीत रुजू लागली तेव्हापासून अशा प्रकारच्या अ‍ॅपमध्ये वाढ झाली. या अ‍ॅपमध्ये मोठय़ा प्रमाणात संशोधन होत आहे, जेणेकरून ते अधिकाधिक वापरस्नेही (युझर-फ्रेंडली) व्हावेत आणि अ‍ॅपच्या निकालामध्ये अचूकता (अ‍ॅक्युरसी) यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आयओएस आणि अँड्रॉइड मोबाइलच्या स्टोअरमध्ये साधारण दीडशे ते दोनशे अ‍ॅप्स आहेत. यात वरील काही अ‍ॅप्सव्यतिरिक्त प्रसिद्ध असलेले अ‍ॅप्स म्हणजे पीरियड ट्रॅकर, पी लॉग, पिंक पॅड, लव्ह सायकल मेनस्ट्रअल कॅलेंडर, माय फ्लो पीरियड ट्रॅकर, माय फ्लो पीरियड ट्रॅकर, माय पीरियड कॅलेंडर, माय मेनस्ट्रअल डायरी इत्यादी होय.

काही प्रमुख अ‍ॅप

१. क्ल्यू-

हे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे अमेरिकेतील एका महाविद्यालयात तयार केले गेले होते. या अ‍ॅपची माहिती अनेक संशोधन पत्रिकांमध्ये ही छापून आलेली आहे. यात स्त्री बीज बनण्याचा कालावधी (ओव्हुलेशन), पाळीची तारीख यासह स्वभावातील बदल, पाळीपूर्वीची लक्षणे इत्यादींबाबत निष्कर्ष वा अंदाज मांडले जातात.

२. इव्ह ट्रॅकर अ‍ॅप-

या अ‍ॅपमध्ये पाळीशी निगडित कोणत्याही बाबीबद्दल प्रश्न, शंका विचारता येतात. त्याची तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातात. वापरकर्त्यांकडून आलेले प्रश्न डॉक्टरला पाठवून त्यांच्याकडून उत्तरे देण्यात येतात हे या अ‍ॅपचे वैशिष्टय़ आहे.

३. पीरियड डायरी-

हे अ‍ॅप मुलींची ३० हून अधिक मासिक पाळी पूर्वीची लक्षणे तसेच २० प्रकारचे स्वभावातील बदल ट्रक करतात, जेणेकरून शरीरातील बदल समजण्यास सोप्पे होते आणि त्यामुळे मुलींना पाळीदरम्यानच्या कालावधीत फार त्रास, चिडचिड होत नाही. तारखेची खातरजमा करण्यासाठी हे अ‍ॅप उघडून बघण्याची गरज नाही, कारण हे अ‍ॅप मोबाइलमधील कॅलेंडरसोबत जोडलेले असल्यामुळे ही माहिती कॅलेंडर संकेतामार्फत समजते.

४. डॉट-

‘डायनॅमिक ऑप्टिमल टायमिंग’ हे अ‍ॅप सर्वाधिक अचूक कॅल्युक्युलेशन करून तारीख सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे. मोठय़ा प्रमाणात डेटा साठवून त्याचे विश्लेषण करून दर महिन्याला तारीख सांगतात.

अ‍ॅप वापराचे प्रशिक्षण

अनेक ऑनलाइन टय़ुटर डिजिटल हॅक्स, लाइफ हॅक्स, मोबाइल-लॅपटॉपमधील तंत्र कसे वापराल या गोष्टी शिकवत असतात. अनेक वापरकर्त्यांच्या मनात मासिक पाळी अ‍ॅप कसे वापरावे? माहिती द्यावी का? त्याच्या चुकीच्या माहितीने काही त्रास होणार नाही ना? वगैरे अनेक शंका सुरुवातीला असतात. याचे निरसन करण्यासाठी अनेक टय़ुटोरीअल यूटय़ूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहेत. हेल्थ, फिटनेस व्हिलॉगर, ब्लॉगर्सचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टय़ुटोरीअल चलचित्रे पाहता येतात. यांस प्रेक्षकांकडून मोठय़ा प्रमाणात पसंती मिळत आहे.

First Published on February 7, 2019 12:32 am

Web Title: menstrual period days tech care