भारतात आयुर्वेदासोबतच सिद्ध ही प्राचीन उपचार पद्धती मानली जाते. सिद्ध उपचार पद्धती दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात सर्वाधिक प्रचलित आहे. सिद्ध म्हणजे कार्यसिद्धी. ज्या व्यक्तींना या औषधांची सिद्धी प्राप्त आहे, त्यांच्याकडून उपचार करून घेणाऱ्या या पद्धतीला सिद्ध असे म्हणतात. ज्या व्यक्तींना ही उपचार प्रणाली माहीत आहे, अशा व्यक्तींना सिद्धार असे म्हटले जाई. सध्या या उपचार पद्धतीत १८ सिद्धारांनी योगदान दिले आहे.

सिद्ध उपचार पद्धती आणि आयुर्वेद जवळपास सारखेच आहे. आयुर्वेदाप्रमाणेच मानवी शरीरातील तीन रस, सात मूळ मांसपेशी आणि शरीरातील अपचिष्ट उत्पाद जसे मल, मूत्र, घाम यांचा अंतर्भाव या उपचार पद्धतीत आहे. या उपचार पद्धतीच्या औषधांमध्ये धातूशास्त्राचा उपयोग करण्यात आला आहे. धातू आणि खनिजांच्या वापरावर भर देऊन औषधे तयार करण्यात आली आहेत.

अनेक विकारांवर सिद्धद्वारे उपचार करता येतात. त्वसेसंबंधी अनेक विकारांवर या उपचार पद्धतीने मात करता येते. सोरायसिस, मूत्रसंसर्ग, यकृतविकार, गॅस्ट्रो, अतिसार, अ‍ॅलर्जी आदी विकारांवर उपचार करण्यासाठी सिद्ध उपचार पद्धतीचा वापर केला जातो.