बाजारात नवे काय? : जावा पैराकचा ग्राहकांसाठी ‘पैराक फ्रायडेज’

एमजी (मॉरिस गॅरेज) ने त्यांच्या बहुप्रतीक्षित झेडएस ईव्हीची अखेर किंमत जाहीर केली असून झेडएस ईव्ही एक्साइट २०.८८ लाख तर झेडएस ईव्ही एक्स्क्लुझिव्ह २३.५८ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी एमजीने त्यांची बोलती कार हेक्टर भारतीय बाजारात आणली. तिने बाजारातील अनेक मापदंड बदलविले. त्यांनतर या नवीन वर्षांत त्यांनी त्यांची विद्युत कार भारतीय बाजारात उतरवली. डिसेंबर अखेर या कारचे लोकार्पण केले होते. त्यानंतर  २७ दिवसांत २८०० पेक्षा जास्त कारची नोंदणी झाली आहे. या विद्युत इंटरनेट एसयूव्हीच्या किमतीकडे खरेदीदारांचे लक्ष लागून होते. ती किंमत त्यांनी दोन दिसवांपूर्वी जाहीर केली आहे.

यावेळी कंपनी प्रतिनिधींनी २७ जानेवारीपासून दिल्ली/एनसीआर, अहमदाबाद, मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद या ५ शहरांत डिलिव्हरी सुरू करणार असल्याचे सांगितले.

कंपनीने एमजी ई-शिल्ड सुरू केले आहे, जे खाजगीरीत्या नोंदणीकृत ग्राहकांना त्यांच्या कारवर अमर्याद किलोमीटर्ससाठी ५ वर्षांची मॅन्युफॅक्चर वॉरंटी आणि बॅटरीवर ८ वर्षे / १.५ लाख किमीपर्यंत वॉरंटी विनामूल्य देणार आहे. ते खाजगीरीत्या नोंदणीकृत कार्ससाठी ५ वर्षांच्या मुदतीसाठी अहोरात्र रोडसाइड असिस्टंस तसेच ५ लेबर-फ्री सव्‍‌र्हिसेसदेखील देणार आहेत.  झेडएस ईव्हीची रनिंग कॉस्ट १ रुपया प्रति किमीपेक्षा कमी असून याचे मेंटेनन्स पॅकेज ३ वर्षांसाठी ७७०० रु. पासून सुरू होत आहे.

जावा दुचाकीने देशभरातील विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांसाठी ‘पैराक फ्रायडेज’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नुकत्याच लाँच झालेल्या पैराकवर स्वार होऊन ‘नाइट राइड्स’ करता येणार आहे. याद्वारे हौशी ग्राहकांना पैराकची अंधारामध्ये चाचणी घेण्याची संधी मिळेल.  एप्रिल २०२० मध्ये पैराक दुचाकी मालकांसाठी रात्रीच्या प्रवासाचा कार्यक्रम होईल.