मायक्रोसॉफ्टने आपल्या ‘विंडोज ७’ या ऑपरेटिंग प्रणालीसाठी तांत्रिक साहाय्य आणि क्रिटिकल अपडेट देणे बुधवारपासून बंद केले. अर्थात त्यामुळे ‘विंडोज ७’ आवृत्तीवर चालणारे कॉम्प्युटर बंद होतील, असे नाही. मात्र, सुरक्षितता आणि तांत्रिक अद्ययतनांसाठी वापरकर्त्यांना लवकरच सातवी विंडो बंद करावी लागेल..

मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि कॉम्प्युटर हे समीकरण इतकं घट्ट आहे की, अनेकांना या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत, हेही माहीत नसतं. याचं कारण साधं आहे. भारतात कॉम्प्युटर आला तोच मुळी विंडोजसोबत. एमएस-डॉस, विंडोज ९५, ९८, २०००, एक्सपी, व्हिस्टा, सेव्हन, एट आणि विंडोज १० असा प्रवास करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या आवृत्त्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या आवृत्यांमध्ये विंडोज सेव्हनचा अव्वल क्रमांक लागतो. २००९मध्ये आलेल्या या आवृत्तीने जलद विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढून स्वत:चा नावलौकिक मोठा केला. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांत जगभरातील अनेक देशांत ही कार्यप्रणाली मुळापर्यंत रुजली. ‘विंडोज ७’नंतर आलेल्या ‘विंडोज ८’पेक्षाही ‘विंडोज ७’वर विश्वास दाखवत अनेकांनी तीच कार्यप्रणाली सुरू ठेवली. तर २०१४मध्ये विंडोज दहा सुरू झाल्यानंतरही ‘विंडोज ७’वर आधारित संगणकांची संख्या कमी झालेली नाही. आजही जगभरात विंडोज सात वापरणाऱ्यांची संख्या ३९ टक्के इतकी आहे. त्यामुळे २०१५मध्ये ‘विंडोज ७’मध्ये नवीन बदल करणे थांबवल्यानंतरही मायक्रोसॉफ्टने ही आवृत्ती पूर्णपणे त्यागली नाही. गेली चार वर्षे या आवृत्तीसाठी मायक्रोसॉफ्टकडून तांत्रिक साहाय्य आणि अपडेट पुरवले जात होते. अखेर, बुधवार, १४ जानेवारीपासून मायक्रोसॉफ्टने ‘विंडोज ७’ला आपल्यापुरता रामराम ठोकला आहे. बुधवारपासून ‘विंडोज ७’साठी कोणतेही नवीन अपडेट व तंत्रसाहाय्य पुरवले जाणार नाही.

याचा अर्थ ‘विंडोज ७’वर काम करणारे संगणक बिघडतील किंवा काम करणे बंद करतील, असा नव्हे. ही कार्यप्रणाली संगणकांवर कार्यरत राहील. मात्र, भविष्यातल्या कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाशी किंवा नवीन सॉफ्टवेअरशी ती सुसंगत राहणार नाही. एवढेच नव्हे तर, ‘व्हायरस’ किंवा ‘मालवेअर’सारख्या सुरक्षाधोक्यांपासूनही ती संरक्षित राहणार नाही. म्हणजेच, ‘विंडोज ७’ वापरणाऱ्यांना आता ‘विंडोज १०’कडे जाण्यावाचून पर्याय उरणार नाही.

बदल करणे आवश्यक का?

तुम्ही जर घरातल्या घरात संगणक वापरत असाल आणि त्याचा वापर मर्यादित कामांसाठी असेल तर, तुम्हाला फार काही त्रास होणार नाही. अर्थात तुमच्या संगणकात शक्तिशाली अँटिव्हायरस असणे आवश्यक आहे. किंबहुना अँटिव्हायरसची सेवा पुरवणाऱ्या कंपन्याही येत्या काळात ‘विंडोज ७’साठी अपडेट पुरवणे थांबवतील.

संगणकाची सुरक्षितता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलते, त्याप्रमाणे व्हायरसच्या घुसखोरीची पद्धतही बदलली जाते. हे व्हायरस रोखण्यासाठी कंपनीकडून कार्यप्रणालीला नवनवीन अपडेट पुरवले जात असतात. मात्र, आता विंडोज सातला हे अपडेट मिळणार नसल्याने नवनवीन व्हायरसशी लढण्याची तिची प्रतिकारक्षमता कमी होईल.

सध्या विंडोज दहा बाजारात सहज उपलब्ध आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी लवकरात लवकर विंडोज दहावर अपग्रेड होणे आवश्यक आहे. गेल्या दोनेक वर्षांत विंडोज दहावर आधारित लॅपटॉप आणि संगणक बाजारात आले आहेत. त्यामुळे त्या संगणकांच्या वापरकर्त्यांना कोणताही त्रास नसेल.

आता काय होणार?

मायक्रोसॉफ्टने जानेवारी २०१५ पासून विंडोज सातसाठी नवीन सुविधा प्रणाली देणे बंद केले होते. त्यासोबतच विंडोज सात असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमची वॉरंटीही बाद करण्यात आली.

गेली पाच वर्षे या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी कंपनीकडून पॅच आणि अपडेट पुरवले जात होते. यात प्रामुख्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बदलांचा समावेश होता. मात्र, यापुढे तो पुरवठाही पूर्णपणे बंद होईल.

आता मायक्रोसॉफ्ट ‘विंडोज ७’साठी ‘KB4493132’ नाावाचे अपडेट जारी करेल. हे अपडेट वापरकर्त्यांना त्यांच्या ‘विंडोज ७’ संगणक अथवा लॅपटॉपमध्ये ‘विंडोज १०’ कार्यान्वित करण्याची सूचना देईल. अर्थात हे अपडेट ऐच्छिक असेल. तसेच ही सूचना वारंवार वापरकर्त्यांच्या संगणकांवर ‘पॉप अप’ होऊ न देण्याची दक्षताही मायक्रोसॉफ्टने घेतली आहे. ज्या वापरकर्त्यांच्या संगणकात ‘ऑटो अपडेट’ची सुविधा कार्यान्वित असेल त्यांना आपोआप हा अपडेट मिळेल.